जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन झाली पाहिजे. मातंग समाजाला ८% आरक्षण मिळाले पाहिजे ह्या मागण्यासाठी मातंग क्रांती महामोर्चा महाराष्ट्रच्या माध्यमातून दिनांक १८ जानेवारी पासून मोहन वामन राव आणि त्यांचे सहकारी आमरण उपोषण आंदोलन करीत आहेत. याबाबत वारंवार मागणी करूनही मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्याने हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत होते. मात्र आज दि.९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयातून, त्यांच्या विविध मागण्यांबाबत तात्काळ योग्य ती कारवाई करावी आणि सदर कार्यवाहीबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करावे असे लिखित स्वरुपात पत्र देण्यात आल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्र साठे यांनी दिली.
मातंग क्रांती महामोर्चा महाराष्ट्र हे मातंग समाज व तत्सम जाती समाज उन्नतीसाठी प्रामुख्याने विकासाच्या विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात काम करत आहेत. मातंग समाज गेले अनेक वर्षापासून धरणे, आंदोलन, मोर्चा, पाय दिंडया, काढून सरकार कडे वेळो वेळी न्यायसाठी मागणी करीत आहेत. पण सरकारने अध्यापपर्यंत समाजाची एकही मागणी मंजुर केली नाही. त्यामुळे समाजात एक प्रकारचा सरकार विरोधात आक्रोश वाढत आहेत.
महाराष्ट्रात अनुसुचित जातीच्या प्रवर्गात ५९ जाती असून या प्रवर्गासाठी असलेल्या नोकरी व शिक्षणातील आरक्षणाचा लाभ पुरेपुर मिळत नाही. त्यामुळे आम्ही आरक्षणापासून वंचीतच आहोत. संविधानातील संधीची समानता या तत्वानुसार सर्व जातींना आरक्षण मिळणे आवश्यक आहेत. त्यात मातंग समाजही अनुसुचित जातीच्या प्रवर्गातील दुसऱ्या क्रमांकावर असून आरक्षणाच्या लाभापासून वंचीत आहे. ही बाब संविधानाला अनुसरुन नसून खऱ्या अर्थाने संविधानातील अनुच्छेद १४, १५, १६, ३८(२), कलमांचा भंग करणारी आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने कल्याणकारी भुमिकेतून संविधानाला अनुसरु आम्हाला न्याय द्यावा. अशी मागणी संघटनेने निवेदाद्वारे केली आहे.
तसेच १९५१, १९६१, १९८१, १९९१ , २००१, शेवटी २०११ ला जो सर्वे झाला त्यात मातंग समाजाची लोकसंख्या १४,८८,५३१ दाखवली आहे. ही माहिती खोटी आहे असा आमचा समज आहे. म्हणून समाजाची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे. मातंग समाजाच्या पदव्युत्तर शैक्षणीक स्तर उंचवण्यासाठी UPSC MPSC व इतर स्पर्धात्मक परिक्षेत यश संपादन करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कौशल्य विकास प्रशिक्षण इत्यादी विविध योजनातून मातंग समाजाचा विकास होण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन झाली पाहिजे. मातंग समाजाला ८% आरक्षण मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन मातंग क्रांती महामोर्चा महाराष्ट्र (कोर कमिटी) च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या याबाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश करण्याचे लेखी पत्र मुख्यमंत्री सचिवालयामार्फत देण्यात आल्याने हे उपोषण आंदोलन स्थगित करीत असल्याचे साठे म्हणाले.
0 टिप्पण्या