शिवजयंतीचे औचित्य साधून प्रजासत्ताक राष्ट्राचा अमृतमहोत्सव सदाबहार देशभक्तिपर गीतांनी साजरा करण्यात आला. ‘शिवनेर’चे संपादक व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेला ‘ऐ मेरे वतन के लोगों...’ हा कार्यक्रम आज मुंबई मराठी पत्रकार संघात रसिकांची दाद घेऊन गेला. विशेष म्हणजे ‘शिवनेर’चा शुभारंभ ८ मे, १९५४ रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर झाला होता. असा त्रिवेणी योग या कार्यक्रमानिमित्ताने रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांचे १० वर्षीय सुपुत्र समर चव्हाण याचा पत्रकार संघाचे विश्वस्त राही भिडे व देवदास मटाले यांच्या हस्ते बॅट व हॅण्ड ग्लोव्हज देऊन सन्मान करण्यात आला. समर भविष्यात क्रिकेटमध्ये आपले नाव उंचावेल, असा आशीर्वाद वाबळे यांनी त्याला दिला. ‘शिवनेर’चे हितचिंतक जोएबभाई उदयपूरवाला यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक राष्ट्राच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या कार्यक्रमाचे ७५ खेळ करण्याचा संकल्प यावेळी वाबळे यांनी सोडला. या कार्यक्रमाला ८९ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक अनुसया निकाळजे आवर्जून उपस्थित होत्या.
‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती..., दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये..., ये देश है वीर जवानों का..., संदेसे आते हैं..., शूर आम्ही सरदार आम्हाला..., वेडात मराठे वीर दौडले सात’ आदी वीररसयुक्त गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायक अमोल चव्हाण, शशिकांत मुंबरे, स्वाती हरवंदे आणि विश्वास चव्हाण यांनी आपल्या सुमधूर आवाजात ही गीते सादर केली. त्यांना रवि पवार, रोशन कांबळे, राजेश चिखलकर, चंद्रकांत पांचाळ यांची साथ लाभली. विनीत देव यांनी हिंदी आणि मराठीत उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमातील बच्चा कंपनीची साथ वाखाणण्याजोगी होती. गायिका स्वाती हरवंदे यांनी ‘नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ...’ हे गीत गाताना बच्चा कंपनीला स्टेजवर बोलाविले. या मुलांनी हरवंदे बाईंना साथ देत गीतावर चांगलाच ठेका धरला.
0 टिप्पण्या