राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाच्या प्रचारासाठी रायगडावर मेगा इव्हेंट करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार दोन्ही गटांना भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती असं संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे," असंही संजय राऊत म्हणाले. “भाजपाने अजित पवार गट आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलेला की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील. शिंदे गटाला धनुष्यबाण मिळालं असलं तरीही लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. तसेच अजित पवार गटाला घड्याळ जरी दिलं असलं तरीही तुम्हाला लोक मतदान करणार नाही. त्यामुळे तुम्ही कमळावरच लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे. पी. नड्डांनी दिला असंल्याचे राऊत म्हणाले, तसेच "हे जर खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं”, असं आव्हानही संजय राऊतांनी दिलं आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जागावाटपाबद्दल चर्चा केली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप हे चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे होते. ज्या मतदारसंघांमध्ये संभ्रम असेल तिथे महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील, असा प्रस्ताव नड्डांनी शिंदेंना दिला आहे. यामुळे उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढेल आणि महायुती अधिक जागा जिंकू शकेल, असं नड्डांकडून शिंदेंना सांगण्यात आलं आहे. शिंदेंनी नड्डा यांच्या प्रस्तावावर अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रस्तावावर येत्या काही दिवसांत आणखी चर्चा होऊ शकते. ईटीव्ही भारतनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. यावरुन खासदार गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली. आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. आम्ही गेल्या निवडणुकीत २३ जागा लढवल्या. त्यातल्या १८ जिंकल्या. मग यावेळी आम्ही १२ जागा का घ्यायच्या, असा सवाल किर्तीकर यांनी उपस्थित केला.
राज्यात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेनं २३ जागा लढवल्या आणि १८ जिंकल्या. तर भाजपनं २५ जागा लढवत २३ जागांवर यश मिळवलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर १८ पैकी १३ खासदार शिंदेंसोबत गेले. तर ५ खासदार ठाकरेंसोबत राहिले. गेल्या वर्षी अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यांच्यासोबत केवळ १ खासदार आहे. महायुतीत अजित पवारांची एंट्री झाल्यानं जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. भाजप नेतृत्त्व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४, शिंदेंच्या शिवसेनेला १२ जागा देईल. उर्वरित ३२ जागांवर भाजप लढेल अशी चर्चा आहे. सध्या लोकसभेचे १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल त्यांच्या बाजूनं लागला आहे. पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळालं आहे. अशा परिस्थितीत त्यांचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास त्याचा फटका शिंदेंना बसेल. त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल. त्यामुळे भविष्यात त्यांचं बळ घटेल. शिवसेनेत फूट पाडली, पक्ष, चिन्ह मिळवलं आणि निवडणुकीत उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढवले, असा संदेश मतदारांमध्ये गेल्यास तो शिंदेंना महागात पडेल. तर दुसरीकडे भाजपला यामुळे फायदा होईल. राज्यातील त्यांची खासदारांची संख्या वाढेल. त्यामुळे भविष्यात त्यांना शिंदेंची तितकीशी गरज भासणार नाही. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“ज्या गटांनी चिन्हं चोरली आहेत त्या चिन्हांवर निवडणूक लढण्याची त्यांची हिंमत नाही. भाजपालाकडेही फुटलेल्या 2 गटांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर निवडवणूक लढवण्याचं धाडस नाही. महाराष्ट्रात खरी शिवसेना ही मशाल चिन्हावर लढेल. तसेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात सोबत आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' गटाला अत्यंत चांगलं चिन्ह मिळालं आहे. या चिन्हाला ऐतिहासिक महत्व आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच उत्साहाचं वातावरण होतं. आता महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे” - संजय राऊत
0 टिप्पण्या