ओबीसी, भटके, विमुक्त, बलुतेदार अलुतेदार विशेष मागासवर्गाचे मागासलेपण दूर करून त्यांच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी, त्यांच्यावरील दडपशाही आणि शोषणाविरुद्ध लढण्यासाठी समाज आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याकरिता ओबीसींच्या हक्काचा पक्ष म्हणून ओबीसी बहुजन पार्टीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पक्षांचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. यावेळी प्रकाश अण्णा शेंडगे, चंद्रकांत बावकर, टी.पी.मुंडे, जे.टी.तांडेल, अरविंद जफळे, दिपक म्हात्रे, मच्छिंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
आरक्षणाचे जनक राजर्षि शाहू महाराज, समाजक्रांतीचे अग्रणी महात्मा जोतिबा फुले आणि संविधानाद्वारे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विशेषाधिकार देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून पक्ष आपली वाटचाल करील. वर नमूद केलेल्या मुख्य उद्दिष्टांच्या अनुषंगाने सामाजिक आणि आर्थिक बदलाद्वारे दुर्बल घटकांचे शोषण आणि वंचितांवरील दडपशाही संपवण्याची चळवळ करील. व त्यांसाठी या घटकांचे राजकीयदृष्ट्या सशक्तीकरण आणि प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठीच या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाचा ध्वज पिवळ्या रंगाचा असेल, तसेच राजकीय चिन्ह म्हणून तुतारी वाजवणारा माणूस असेल असे निवडणूक आयोगाला कळवण्यात आले असल्याची माहिती पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली.
पक्षाच्या पुढील ध्येयधोरणे आणि वाटचालीबाबत पत्रकारांना माहिती देताना शेंडगे पुढे म्हणाले राजकीय सत्ता उपभोगणान्या प्रस्थापितांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात संविधानाला अभिप्रेत असलेल्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साधण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ७५-८० टक्के लोकसंख्येच्या मागासलेल्या वर्गाला सत्तेपासून दूर ठेवून केवळ स्वायांसाठी त्यांच्या मतांचा वापर केला गेला, त्यांच्या समस्यांकडे कधीच गांभिर्याने पाहिले गेले नाही, त्यामुळे वंचित वर्ग सर्वच बाबतीत वंचित राहिला, राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाचे कल्याण अजिबात साधले जाणार नाही, सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची सत्तेची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय व स्वतः राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. या करीता या पक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
'आपलीच मते, आपलाच पक्ष, आपलाच नेता आणि आपलीच सत्ता' आणावयाची असेल, तर देशातील व राज्यातील या वर्गाला राजकीयदृष्ट्या संघटीत करण्याची व राजकीय सत्ता काबिज करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने महाराष्ट्रातील वंचित समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत 'ओबीसी बहुजन पार्टी'ची स्थापना करण्यात आली आहे.सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषीविषयक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकास आणि सुधारणा करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाजघटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आमचा पक्ष कटीबद्ध आहे.
देशातील अशा सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला अर्थात ओबीसींना, भटके-विमुक्तांना, बलुतेदार अलुतेदारांना तसेच विशेष मागास प्रवर्गाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय बहाल करुन, प्रस्थापितांच्या जोखडातून मुक्त करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा या राजकीय पक्षाद्वारे संकल्प करण्यात आला आहे. या पक्षाद्वारे जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेचे चळी ठरलेल्या वर्गातील विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी वर्गाचे हित साधले जाणार आहे.
इतर मागास वर्ग जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती (VJNT), विशेष मागास वर्ग, बलुतेदार, अलुतेदार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक असलेले इतर मागास घटक हे भारतातील सर्वात अत्याचारित आणि शोषित लोक आहेत. त्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन भारतातील अशा लोकांचा समूह बहुजन समाज म्हणून ओळखला जातो. हा ओबीसी आणि बहुजन समाज ७५-८० टक्के असूनही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात प्रस्थापितांनी त्यांना राजकीयदृष्ट्या अतिशय नगण्य स्थान दिले, सत्तेपासून दूर ठेवले. केवळ मतांसाठी आणि आपले पक्ष वाढविण्यासाठीच त्यांचा वापर केला गेला, देशात व राज्यात ओबीसी-बहुजनांचे राज्य प्रस्थापित केल्याशिवाय या शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाला पर्याय नाही. राजसत्तेचा मार्ग अवलंचिल्याशिवाय देशात-राज्यात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व प्रस्थापित होणार नाही, याची खात्री इाल्याने 'ओबीसी बहुजन पार्टी' ची स्थापना करून त्याद्वारे राजकीय क्रांती करण्याचा निश्चय सर्व ओबीसी-बहुजनांनी केला असल्याचे शेंडगे शेवटी म्हणाले.
0 टिप्पण्या