मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही, जर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेंच राहणार असतील तर राज्यात गुन्हेगारांचं राज्य येईल, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गुन्हेगार पाळून ठेवले आहेत. त्यांनी दुसऱ्याचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे. माझं राजकीय जीवन संपविण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे सनसनाटी आरोप करत भाजप नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. आहे.
हिललाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील द्वार्ली गावात एक जमीन आहे. त्याचे मालक एकनाथ जाधव आणि कुटुंबीय आहेत. एकनाथ जाधव आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये वाद सुरु होते. त्यांच्यात बोलणी सुरु होती. याचदरम्यान कंपाऊंड टाकण्यावरुन वाद झाला, हा वाद उल्हासनगरमधील हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये सुरु असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच गोळीबार झाल्याने या प्रकरणी गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी गणपत गायकवाड, हर्षल केणे ,संदीप सर्वांकर या तिघांना अटक केली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी गणपत गायकवाड पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, माझ्या विकासनिधीतून झालेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे स्वत:चे बोर्ड लावतात. मी राजकारणातून संपावं, माझ्या राजकीय जीवनावर गंडांतर यावं, म्हणूनच बापलेकाची जोडी मला विरोध करतात. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून भाजपशी हातमिळवणी केली आहे. जो माणूस उद्धव ठाकरे यांचा झाला नाही, तो भाजपचा काय होणार? असा प्रश्न गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने कायदा हातात घेणं बरोबर नाही. आपण शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड किंवा स्वत: मुख्यमंत्र्यांची तक्रार आपल्या पक्षनेतृत्वाच्या कानावर घातली होती का? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर गणपत गायकवाड म्हणाले, "मी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर बोललो. परंतु माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही" अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सध्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी व्यवस्थित वागलं गेलं पाहिजे. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून, इतक्या टोकाची मजल त्यांनी का मारली, याची माहिती घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले. वृत्तवाहिन्यांशी ते जे बोलले ते देखील योग्य नव्हतं, - उपमुख्यमंत्री अजित पवार
सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे, भाजपवाल्यांचे बॉस "सागर" बंगल्यावर आणि शिंदे गटाचे "बॉस" वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे.गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता, - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे आम्ही काही करू शकतो, असं त्यांना वाटतं. पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होत असेल तर गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी लोकसभेत हा मुद्दा मांडणार आणि केंद्रीय गृहमंत्री यांना भेटणार, यांची चौकशी झाली पाहिजे याची मागणी करणार आहे, आमची टीका वैयक्तीक नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या आधी महाराष्ट्रात असं कधी झालेलं नाही. राज्यात सध्या भयानक गँगवॉर सुरू आहे. राऊत जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, कॅबिनेटमध्ये नाही तर आता गँगवार रस्त्यावर आले आहेत. त्यांना आता कुणाचीही भीती राहिलेली नाही. पोलिसांची भीती नाही, कॅमेऱ्यासमोर ते गोळ्या झाडतात. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा राज्यात गुन्हे वाढतात. गेल्यावेळी ते गृहमंत्री होते तेव्हा नागपूर इज क्राइम कॅपीटल ऑफ महाराष्ट्रा असं अनेक चॅनल्स म्हणायचे. हा गुंडाराज तुमच्यासाठी असेल. आम्ही अजूनही स्वाभिमानाने जगतो. सरकार त्यांना काही शिक्षा करणार नसेल तर आम्ही त्यांच्याविरोधात लढू, - खासदार सुप्रिया सुळें
"महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांमध्ये माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढलं जात आहे. महेश गायकवाड कोण आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांच्यावर आमदारानेच गोळीबार केला, हा प्रकार धक्कादायक आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहे. ते आम्हाला कायदा शिकवतात. अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन, हे प्रकरण फक्त गृहमंत्र्यांसोबत चर्चा करण्यापुरतंच मर्यादीत नाही. आज महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ पोलिसांच्या कॅबिनमध्ये गोळीबार होतो. देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात, ज्ञानी आहात. राम तुमच्या बाजूने आहे, तुमचं राज्य कायद्याचं आहे का? ज्या आमदाराने गोळीबार केला आहे त्याला जामीन मिळेल. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचं निवेदन सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी गोळीबार केला, असं ते म्हणत आहेत. कारण मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना पाठिशी घालत आहेत आणि मदत करत आहेत", - खासदार संजय राऊत
0 टिप्पण्या