नागपूर नगरीची राष्ट्रीय जलतरणपटू कुमारी ईश्वरी कमलेश पांडे हिने २ फेब्रुवारी रोजी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर विक्रमी वेळात पार करून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. आपल्या अंधत्वावर मात करून तिने हा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एलिफंटा येथून सकाळी ६ वाजता ती गेटवे ऑफ इंडिया कडे झेपावली. सागरामध्ये प्रचंड लाटा उसळल्या असताना खाऱ्या पाण्याची तमा न बाळगता त्याचा सामना करीत ईश्वरी मिनिटाला 84 च्या वेगाने पोहत होती. सकाळी 10 वाजून 32 मिनिटांनी ईश्वरीने गेट वे ऑफ इंडिया चा किनारा गाठला. शार्क अॅक्वेटिक स्पोर्टिंग असोसिएशनचे प्रशिक्षक संजय बाटवे यांच्या कुशल मार्गदर्शनात एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १७ किलोमीटर अंतर ईश्वरीने ४ तास ०२ मिनिटात पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड विजेते सुखदेव धुर्वे यांच्या निरीक्षणाखाली ही मोहिम सुरु होती. एशियन बुक ऑफ रेकॉर्ड निरीक्षक करीशमा शहा यावेळी उपस्थित होत्या, प्रथमोपचार करिता संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश ढाकुलकर, तसेच या साहसिक अभियाना करता सहाय्यक जलतरणपटू म्हणून संदीप वैद्य, रवींद्र तरारे (टायगर मॅन), विलास फाले, अतुल चौकसे, शंकर आष्टणकर, ईशांत पांडे यांचे सहाय्य लाभले. यावेळी इश्वरीचे आई-वडील उपस्थित होते.
गेटवे ऑफ इंडिया येथे कुलाबा विभागाचे पोलिस निरीक्षक यांनी तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब गाडगे, घारापूरी ग्रामपंचायत सदस्य मिना भोयर आदी मान्यवरांनी या यशस्वी मोहिमेबद्दल इश्वरीचे अभिनंदन केले. तर अखिल भारतीय अंध असोसिएशनचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेटिवार यांनी या मोहिमेबद्दल इश्वरीला ११ हजार रुपयांचा धनादेश देऊन तीला पुढील कार्यास प्रोत्साहन दिले. नागपूरचे आमदार मोहन मते यांनीही दूरध्वनीवरून या साहसिक कार्याबद्दल ईश्वरीचे अभिनंदन केले.
शाळेच्या अभ्यास करून अधिकाधिक वेळेत पोहण्याचा सराव करून मी ही मोहिम यशश्वी केली. या पुढील मोहिम भारत ते सिरीलंका सागरी सेतू पार करणे असेल असे मनोगत ईश्वरीने यावेळी व्यक्त केले. तर तिचे वडील कमलेश पांडे यांनी ईश्वरीला पोहण्याची कला का शिकवणे गरजेचे वाटले आणि ती या कलेमध्ये कशी पारंगत होत गेली याबाबत सविस्तर माहिती दिली. ईश्वरीचे प्रशिक्षक संजय बाटवे यांनी ईश्वरीला पोहणे शिकवण्यासाठी कोण-कोणत्या युक्त्या आखाव्या लागल्या. त्या तीने कशा आत्मसात केल्या याबाबत सांगितले. आजपर्यंत मी अपंग व्यक्तीना पोहणे शिकवत होतो. पण अंध व्यक्तीला पोहणे कधी शिकवले नव्हते. पण ईश्वरीला शिकवण्याची जबाबदारी मी घेतली. आज जवळ जवळ १५ वर्षे ईश्वरीला पोहण्यात तरबेज करण्यासाठी गेले आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तीने रोज सहा सहा तास पोहण्याचा सराव केला. नागपूरमध्ये गोड्या पाण्याच्या तलावात हा सराव होत असे. मग समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आणि प्रचंड लाटांचा मारा सहन ही कशी सहन करेल याबाबत मनात शंका होती. मात्र तीने आपल्या प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर ही मोहिम यशस्वी केली. माझ्या अंदाजाने ती किमान सहा तास हे अंतर पार करायला घेईल असे वाटत होते मात्र तीने चार तासातच हे अंतर पार करून सर्वांना आश्चर्यचकित केले. असे संजय बाटवे म्हणाले.
या मोहिमेला सुमारे दिड लाख रुपये खर्च आला जो ईश्वरीच्या वडीलांनी केला. त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी नसतानाही त्यांनी आपल्या मुलीकरिता हा खर्च केला. आता पुढील मोहिम सागरी सेतू पार करणे आहे. ही प्रचंड खर्चाची बाब आहे. त्यासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटनांनी तसेच राजकीय मंडळींनी सहाय्य करावे असे आवाहनही आज प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.
0 टिप्पण्या