पोलीस क्लिअरन्ससाठी आम्ही तीन तास वाट बघितली. नंतर संध्याकाळी 7 वाजता मात्र वागळे सरांनी पोलीसांना सांगितलं की एकतर आम्हाला अटक करा नाही तर सभेला जाऊ द्या. वागळे सर गाडीत बसले. त्यांच्या एका बाजूला असीम आणि एका बाजूला मी बसलो. ॲड. श्रीयाला असीमनं पुढे बसवलं, गाडी identify होऊ नये म्हणून. ड्रायव्हिंगच्या वैभव बसला ज्याच्या ड्रायवींग कौशल्यामुळे आम्ही काल वाचलो. आमचा बहाद्दर साथी ॲड. बाळकृष्ण निढाळकर रस्त्यावर गाडी समोर पळत होता आणि गाडी कुठून घ्यायची ते सांगत होता. सुमाराला आमची गाडी पुणे आणि मागे साध्या वेशातल्या पोलीसांची गाडी असा प्रवास सुरू झाला.
पहिला हल्ला प्रभात रोडला इराणी कॅफेजवळ झाला. मोटार सायकलवर आलेल्या भाजपच्या गुंडांनी आणि त्यांच्या रस्त्यावरच्या साथीदारांनी गाडीवर दगड आणि अंडी फेकली. गल्ली क्र. 4 मध्ये ते दबा धरून बसले होते. आमच्या कारच्या बाजूला ते मोटार सायकलवर होते.
थोडे पुढे म्हणजे प्रभात रोड जिथं कर्वे रोडला जोडतो तिथं भाजपाचे आणखी 25-30 गुंड उभे होते. त्यांनी आमची कार अडवून गाडीवर काठ्या आणि राॅड मारत काचा फोडायला सुरूवात केली. पोलीसांची तयांची धुमश्चक्री झाली. साध्या वेशातल्या पोलीसांवरही भाजपचे हे गुंड हात चालवत होते हे आम्ही बघत होतो. दरम्यान कारच्या समोर धुमश्चक्री होत होती म्हणून बाळकृष्ण आणि काही पोलीसांनी आम्हाला गाडी रिवर्समध्ये घ्यायला लावली. आम्ही कर्वेरोडवरून कोथरूडच्या दिशेनं निघालो. भाजपाचे गुंड आमचा फिल्मी स्टाईलमध्ये पळत आणि मोटार सायकलवर फिल्मी स्टाईल पाठलाग करायला लागले. वैभवनं त्यांना एसेम जोशी पुलावर चकवा दिला आणि गाडी वैकुंठमधून काढली. तोपर्यंत ते शास्त्री रस्त्यावरून आले आणि सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर त्यांनी आम्हाला गाठलं. मात्र तिथं स्वतः प्रशांतदादा जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्यासाठी उभे होते. त्याच वेळी काॅग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे सुनील मोरे, गजानन थरकुडे आणि ओरिजनल शिवसैनिक, राहुल डंबाळे यांचे कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्ते, युक्रांदचे जांबवंत मनोहर आणि सर्व कार्यकर्ते तसंच विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सभास्थळी आमच्यासाठी छातीचा कोट करून उभे होते.
त्यांनी आम्हाला शेवटचं गाठलं ते दांडेकर पुलाच्या सिग्नलला. तिथं राष्ट्रवादीच्या भक्ती कुंभार नावाच्या रणरागिणीनं त्यांना अडवायचा प्रयत्न केला. त्यात त्या आणि त्यांचा तीन चार महिला साथी जखमी झाल्या. भाजपच्या गुंडांनी त्यांनाही मारलं. इतके निर्ढावलेले गुंड सत्ताधारी पक्षात आहेत ही शरमेची गोष्ट आहे. मोठमोठे दगड मारल्यामुळे गाडीच्या मागच्या काचेचा चक्काचूर झाला होता. तिथून हे भाजपचे गुंड राॅड आत टाकण्याचा प्रयत्न करत होते. असीमनं वागळे सरांचं डोकं खाली धरून ठेवलं आणि आम्ही तिघंही डोकं खाली करून लागणार नाही असे बसलो होतो. वैभवनं प्रयत्नांची शर्थ करून गाडी दामटली. वास्तविक पाहता समोरची काच अंड्यांमुळे संपूर्णतः blind झाली होती तरीही या पठ्ठ्यानं वेगात आणि रस्त्यावरच्या कोणालाही जखमी न करता गाडी साने गुरूजी स्मारकात पोचवली. तिथं शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर आमची वाट पहात होते. आम्ही पोचल्यावर त्यांनी महात्मा गांधी की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा दिल्या.
भाजपाच्या गुंडांचा हा रस्त्यावरचा थरार आम्ही तब्बल पंचवीस मिनिटं अनुभवला. आपण मेल्यात जमा आहोत असं तीन प्रसंगी वाटलं. कल्पना करा की चाळीस ते पन्नास लोक काठ्या, राॅड, दगड घेऊन पाच जणांचा पाठलाग करत आहेत. भाजपाच्या गुंडांनी रस्त्यावर दहशत निर्माण केली. आसपासचे लोक भयचकित होऊन हा राडा पहात होते. रस्त्यावर इतरही आयाबहिणी असतांना हे भाजपाचे गुंड वागळे सरांच्या नावानं अर्वाच्य शिव्या जोरजोरात देत होते. वागळ्याला खाली खेचा असं जोरजोरात बोंबलत होते. रस्त्यावर सामान्य माणसं भयभीत होऊन त्यांना जागा करून देत होती. एखाद्या गुंडागर्दीवाल्या सिनेमाचं दृश्य भाजपच्या गुंडांनी सुसंस्कृत पुण्याच्या रस्त्यावर करून दाखवलं.
सभागृहात वागळे सर आणि पोचल्यावरचा जल्लोष आम्ही कधीही विसरू शकणार नाही असा होता. आमचं बळ शतपटीनं वाढलं. हे पुण्यात होतंय यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. दरम्यान पोलीसांना 'भाजपाच्या गुंडांना हात लावू नका' असा आदेशच वरून आला असावा म्हणून त्यांनी एकाही गुंडाला ना अटक केली ना गुन्हा नोंदवला आहे. रात्री उशिरा घरी आल्यावर फडवीसांची प्रतिक्रिया पाहिली ती अतिशय धक्कादायक होती. 'कायदा सुव्यवस्था कोणीच मोडू नये, ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा होईल पण उच्च पदस्थ नेत्यांबाबत बोलतांना नीट बोलावं' असा त्यांच्या प्रतिक्रियेचा आशय होता. थोडक्यात काय तर मोदी शहांबद्दल बोलाल तर यापुढे भाजपचे गुंड कोणालाही रस्त्यावर मारतील असा इशारा ते आपल्यालाच देत आहेत. भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या मूकसंमती शिवाय एवढा मोठा हल्ला भाजपचे गुंड करतील असं मला अजिबात वाटत नाही. निदान नाटक म्हणून तरी दोन चार गुंड पकडले असते पण पोलिसांवर एवढी दहशत आहे की त्यांनी एकाही गुंडाला, अगदी त्यांच्या अंगावर जाणाऱ्या गुंडांच्याही अंगाला धक्का लावला नाही. हे सगळं धक्कादायक आहे आणि आम्ही या विरूद्ध सतत लढत राहूच. निखील वागळे सरांच्या धैर्याला मानाचा मुजरा.
मोदी शहांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांनी महाराष्ट्र गुंडगिरीत बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या पुढे नेऊन ठेवला आहे. कुठे यांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष वक्त्याचा माईक हिसकावून घेतो, कुठे यांचा आमदार पोलीसांसमोर एका व्यक्तीवर सहा गोळ्या झाडतो, कोणीतरी घोसाळकर नावाच्या तरुणाला फेसबुक लाईव्ह करत मारतं तर पुण्याच्या सुसंस्कृत रस्त्यांवर भाजपचे गुंड निखील वागळे नावाच्या 66 वर्ष वयाच्या पत्रकाराला मारण्यासाठी रस्त्यावर राडा करतात. या घटनेचे सगळे व्हीडीओ मिडीयावर उपलब्ध आहेत. पाहून खात्री करा. हात बांधलेले पोलीस आणि रस्त्यावर राडा करणारे भाजपाचे गुंड. महाराष्ट्रातलं हे गुंडाराज तुमच्या समोर जसं पाहिलं तसं मांडलं. पुढचा निर्णय तुम्हीच घ्या.
विश्वंभर चौधरी (फेसबुक पोस्ट)
येणारा काळ पत्रकारितेसाठी चिंताजनक...!
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच थरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे, रस्तोरस्ती असे पत्रकारांवर नियोजन बद्ध हल्ले होणार असतील तर कुठे आहे* *पत्रकार संरक्षण कायदा ? यापुढे पत्रकारांना आपले मत मांडतांना सरकारची परवानगी घेऊन बोलावे लागेल अशी भीती निर्माण होत आहे, निर्भीड पत्रकारिता करावी तरी कशी काय याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण होतेय ?
गेल्या काही वर्षात पत्रकारिता क्षेत्राची वाताहत होत गेली. या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना किंवा त्यांच्या जीवाला कधीच संरक्षण मिळाले नाही. पत्रकारांचे जीवनमान उंचावण्या संदर्भात आजवर एकाही सरकारने पाऊल उचलले नाही, त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने " पत्रकार संरक्षण कायदा," केला,पण या कायद्याची अमलबजावणी केली जात नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे गेल्या काही वर्षात देशभरात हजारो पत्रकारांना आपले जीव गमवावे लागले. सरकारच्या अशा नतद्रष्टपणांमुळे आजही लाखो ग्रामीण , जेष्ठ व अभ्यासु पत्रकार आपला जीव धोक्यात घालून पत्रकारितेचे काम करत आहेत. जगात सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या या देशात आज हा स्तंभ दिवसेंदिवस ढासळत आहे.
माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचे पावलोपावली खच्चीकरण होत असून,ही खरी चिंतेची बाब आहे, राज्य सरकारने पत्रकारांच्या हितासाठी नेमलेल्या राज्य अधिस्विकृती समितीवरून मध्यंतरी जोरदार विरोध झाला, या समितीचे सदस्य म्हणून मार्जितल्या लोकांना नियुक्त केल्यावरून या क्षेत्रात मोठे रणकंदन उभे राहिले होते,काही लोक सरकारच्या या चुकीच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुद्धा गेले आहेत, सरकारकडे नियमबाह्य नियुक्तीवरून तक्रारीचा ढीग पडला असून अद्यापही कोणतीच कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही, असे असताना राज्याच्या बाहेर राज्य अधिस्विकृती समितीच्या बैठका घेऊन शासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत,बैठकीच्या ठिकाणी माध्यमाचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी पंचपक्कवानाच्या पार्ट्या झोडून माध्यमाचा बट्ट्याबोळ कसा होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले,
खऱ्या पत्रकारितेची गच्छंती होत असल्याची ही लक्षणे दिसून येत आहेत !लाखो प्रामाणिक पत्रकारांचे भवितव्य अंधारात ढकलून या क्षेत्राची गळचेपी सुरू झाली आहे .एका उद्योगसमूहाने देशातील सुमारे ३५ वाहिन्या ताब्यात घेतल्या आहेत.या सर्व वाहिन्यांनी आता सरकारला त्रासदायक ठरणाऱ्या पत्रकारांना घरचा रास्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला कुणाकडून विरोध होता कामा नये, आपल्याला होणारा विरोध,हा लोकांपर्यंत पोहोचू नये,आपली कृष्णकृत्ये उघड होऊ नयेत, यासाठी सरकारने देशातील धनाढ्य हाताशी धरून हे उद्योग सुरू केले आहेत. या विषयावर कुठेही चर्चा होत नाही..त्यामुळे येणारा काळ माध्यम क्षेत्रासाठी चिंताजनक ठरणारा आहे. रोजगार गेल्यानंतर घर कसे चालवावे या विवंचनेत असणारा पत्रकार सध्या तणावाखाली काम करत आहे. लोकशाही व्यवस्थेत माध्यमांना अनन्यसाधारण महत्व असतं,पण दुर्देवाने तेच माध्यम आता दिवसेंदिवस कोसळत चालले आहे...!
सरकारच्याच आशीर्वादाने हे कृत्य चालल्याचे निषेधार्थ यवतमाळचे विनोद पत्रे यांनी पोलखोल करीत असल्या लाचार व मींध्या पत्रकारितेत जगण्यापेक्षा मरण पत्करणे चांगले असे मानून सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे,
0 टिप्पण्या