Top Post Ad

ठाण्याच्या वाघबीळ-कावेसर भागात, ४०० ते ५०० वृक्षांची निर्दयी कत्तल


 ठाण्याच्या वाघबीळ-कावेसर भागात, ४०० ते ५०० वृक्षांची निर्दयी कत्तल
संबंधित विकासकाविरोधात, गुन्हा नोंदविण्याची मागणी

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रस्त्यावर असलेल्या, वाघबीळमधील कावेसर भागात, सुमारे ४०० ते ५०० वृक्षांची कत्तल झाली असून, ही वृक्षतोड एका बांधकाम व्यवसायिकाने केल्याची चर्चा आहे. कत्तल झालेल्या वृक्षांमध्ये हेरिटेज झाडांचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त, प्रसिद्धीमाध्यमांत प्रकाशित झालेले आहे. एकीकडे ठाणे शहरातील हरितक्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात असतानाच, दुसरीकडे मात्र, वाघबीळ-कावेसर येथील नेरोलॅक कंपनीच्या जागेवरील ४०० ते ५०० वृक्ष निर्दयीपणे कापण्यात आल्याचे उघड झाले आहे. सदर घटना उघड होताच, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक, स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वृक्ष प्राधिकरणाचे उपायुक्त, यांनी घटनास्थळी जाऊन, याप्रकरणी कारवाईची मागणी केली 

 या ठिकाणी वड-पिंपळ तसेच, अनेक दुर्मिळ प्रजातींची झाडे होती. या झाडांवर पक्षांचा नैसर्गिक अधिवास होता, तोच उध्वस्त करुन संबंधित धनदांडग्या व भांडवलदारी प्रवृत्तीच्या विकासकाने, निसर्ग आणि पर्यावरणाच्या संवर्धनालाच नख लावले आहे. या अमानवी-अनैसर्गिक कृत्याबाबत ‘त्या’ क्रूरकर्मा बांधकाम व्यवसायिकाचे नाव जाहीर करून, त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. 

ठाणे शहरात वर्षभरात सहा मियावाकी वनांच्या माध्यमातून तब्बल १ लाख ३२ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. शिवाय दोन ठिकाणी अशाच प्रकारच्या जंगल उभारणीचे काम सुरु असून, त्याव्यतिरिक्त आणखी तीन ठिकाणी, असे जंगल करण्याचे ठाणे महानगरपालिकेचे नियोजन आहे. एकीकडे ठाणे शहरातील हरित-क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ‘मियावाकी’सारखे पर्यावरणवादी उपक्रम राबवायचे आणि दुसरीकडे मात्र, धनदांडग्या बांधकाम व्यावसायिकाने महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून, बिनदिक्कतपणे एक-दोन नव्हे; तर, तब्बल ४०० ते ५०० वृक्षांची निर्दयी कत्तल करायची, यापेक्षा दुसरी लाजिरवाणी बाब ती कोणती? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

मुंबई शहराच्या वांद्रे  या उपनगरात असणाऱ्या, नेक्टर को.ऑप.हौ. सोसायटीच्या आवारातील झाड, सोसायटीच्या अमित धुतीया नामक व्यक्तीने, बृहन्मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता तोडल्याने, २०१४ साली त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला होता. सदर व्यक्तीने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी, मुंबई उच्च न्यायालयाकडे केली असता, याप्रकरणी गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाने नकार तर दिलाच; उलटपक्षी, झाडाच्या सर्व फांद्या तोडल्या गेल्याने, काही पक्षांची घरटी उध्वस्त झाली, काहींची अंडी फुटली, काही पक्षी मरण पावले, काही पक्षी जाळ्यात अडकले आणि काही पक्षी जाळ्यात अडकून त्यांना दुखापत झाली. परिणामी, सकृतदर्शनी गुन्हा घडल्याचे स्पष्ट होत असल्याने, दिलासा दिला जाऊ शकत नसल्याचे आदेश मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिले असल्याबाबत, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. 

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असणाऱ्या 'धर्मराज्य पक्षा'च्या वतीने  ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे उपायुक्त आणि कासारवडवली पोलीस स्टेशन यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.  एक पर्यावरणवादी पक्ष म्हणून, ‘धर्मराज्य पक्षा’च्या भावना अत्यंत तीव्र असून, वृक्षतोडीच्या या घटनेचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त करीत असतानाच, याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे नाव जाहीर करुन, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईअंतर्गत, गुन्हा नोंदविण्यात यावा; तसेच, या जागेवर उभे राहिलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ निष्कासित करण्यात यावे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येऊन, संबंधित विकासकाला पाठीशी घालायचा प्रयत्न ठाणे महापालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाकडून झाल्यास, याविरोधात लोकशाही आणि सनदशीरमार्गाने जनआंदोलन उभे करु, वेळप्रसंगी उपोषणही पुकारण्यात येईल, असा गंभीर इशारा महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com