'निर्भय बनो' आंदोलनाच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी पुणे येथील राष्ट्र सेवा दल सभागृहात एक सभा आयोजित केली होती. "ती सभा होऊ देणार नाही", असा फतवा भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी काढला होता. मात्र सभा होणारच, असा निर्धार 'निर्भय बनो'ने केला होता. त्यामुळे, भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावून ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एका बाजूला कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन भाजप कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली, तर दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून येणाऱ्या निखिल वागळे, विश्वंभर चौधरी व असिम सरोदे यांच्या गाडीवर चार-पाच ठिकाणी हिंसक हल्ले करण्यात आले. या सर्व प्रकारासाठी, पुणे पोलिस व भाजप यांचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत..!
वस्तुतः, या विघातक कृत्याला जबाबदार असणाऱ्या धीरज घाटे यांच्यावर हिंसक घटना घडवून आणण्यास चिथावणी दिली म्हणून आणि त्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे नोंदवले पाहिजेत. पण देशाच्या विद्यमान पंतप्रधानांनीच विखारी व विषारी प्रचार सातत्याने चालू ठेवलेला असल्याने, त्यांचे कार्यकर्ते गुंडगिरी करण्यात चार पावले पुढेच राहणार हे आता उघड दिसते आहे. परिणामी देशभर रोजच अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे, आताची परिस्थिती 1975च्या आणीबाणी पेक्षा भयानक आहे, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. साहजिकच, स्वतःला राष्ट्रवादी वा देशप्रेमी म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार भाजपने आता पूर्ण गमावला आहे. मात्र, लोकशाहीत अंतिम सत्ता ही जनतेचीच असते, आणि म्हणून त्या जनतेला उभे करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या 'निर्भय बनो'चे विशेष अभिनंदन आणि आभार !
- संपादक, साधना साप्ताहिक
प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला.काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो.तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू?जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच.❤️तुमचा,निखिल
0 टिप्पण्या