लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदानाचा दिवस हा सुट्टी म्हणून साजरा न करता प्रत्येकाने मतदान करावे. लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची असून मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करावे.मतदानासाठी महिलांची संख्या फार कमी असून याबाबत आशावर्कर, प्रसाविका, परिचारिका यांनी दैनंदिन संपर्कात येणाऱ्या व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन उपायुक्त उमेश बिरारी यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमात केले.
महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदानाबाबत जनजागृती मंगळवारी गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापालिकेच्या माध्यमातून काम करणाऱ्या आशा वर्कर, महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एप्रिल- मे महिन्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा किंबहुना मतदान करण्यामध्ये महिलांची संख्या कमी असून ती वाढावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी आम्ही मतदानाचा अधिकार बजावणार अशी शपथ घेतली.
या कार्यक्रमात महापालिकेच्या माध्यमातून काम करत असलेल्या आशा वर्कर, महापालिकेच्या विविध आरोग्यकेंद्रात रुग्णालयात काम करत असलेल्या प्रसाविका, परिचारिका उपस्थित होत्या. दैनंदिन काम करत असताना आशा वर्कर, प्रसाविका तसेच परिचारिका यांचा महिलांशी मोठ्या प्रमाणावर संबंध येत असतो. महिलांनी मतदानासाठी बाहेर पडावे व आपला हक्क बजावावा तसेच मतदानाचे महत्व महिलांना समजावून जनजागृती करण्याबाबतचे मार्गदर्शन उपायुक्त उमेश बिरारी यांनी उपस्थितांना केले.
0 टिप्पण्या