Top Post Ad

युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ....


 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक, राजकीय कार्याची सुरुवात 1919 रोजी केली. त्यांची वृत्तपत्रीय कारकिर्द मात्र 1920 रोजी सुरू झाली. त्यांचे पहिले मुखपत्र `मूकनायक' हे होय. `मूकनायक' 31 जानेवारी 1920 रोजी पाक्षिक म्हणून सुरू झाले. या पत्राच्या प्रकाशनासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी 2500 रुपये देणगी दिली. 

`मूकनायक' सुरू झाले तेव्हा टिळक हयात होते. टिळकांच्या `केसरी'ने `मूकनायक'ची पोच तर दिली नाहीच, पण पैसे देऊन जाहिरात देण्याचेसुद्धा नाकारले, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीचे मोल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महत्त्वाचे वाटले. दलितांचा `सखा' म्हणून त्यांचा सार्थ उल्लेख त्यांनी केला आहे. (`बहिष्कृत भारत' दि. 4 नोव्हें. 1927) रोजी माणगाव येथे झालेल्या दलित परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात बोलत असताना शाहू महाराज म्हणाले की, तुमचा खरा नेता डॉ. आंबेडकर हे आहेत ... हे शाहू महाराजांचे भाकित खरे ठरले. `द्रष्टेपणाचा मान' या संदर्भात राजर्षी शाहूंकडू जातो. आंबेडकरपूर्व समाजसुधारणेच्या चळवळीत शाहू महाराजांचे योगदानही मोठे होते. अस्पृश्यांना ते अतिशय जवळचे वाटत होते. 

`मूकनायक' चे संस्थापक खऱया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर असले तरी संपादकपदाची धुरा मात्र पांडुरंग नंदराम भटकर या विदर्भातील गृहस्थाकडे होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या काळात सिडनेहॅम या शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी `मूकनायक' चे संपादकत्व स्वीकारले नसावे. परंतु `मूकनायक' चे पहिले काही अग्रलेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले हाते.  `मूकनायका'तील आपल्या लेखनाचा उल्लेखही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळातील आपल्या वृत्तपत्रीय लेखनात केला आहे.  आपले अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते परदेशात गेल्यानंतर आर्थिकदृष्ट्या `मूकनायका'च्या आर्थिक व्यवहारासंबंधात घोलप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात नंतर वाद झाला. `मूकनायक' प्रकरणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फारच मनस्ताप झाला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रसृष्टीत टाकलेले दुसरे पाऊल म्हणजे `बहिष्कृत भारत' हे पाक्षिक होय. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर `बहिष्कृत भारत' सुरू झाले. `बहिष्कृत हितकारिणी सभा' ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली सामाजिक संघटना होय. तिच्या स्थापनेनंतर तीन वर्षांनी `बहिष्कृत भारत' सुरू झाले. 

महाडच्या सत्याग्रहानंतर 14 व्या दिवशी `बहिष्कृत भारत' हे पत्र सुरू झाले. (दि. 3 एप्रिल 1927) `बहिष्कृत भारत'चे वैशिष्ट्य हे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत `बहिष्कृत भारता'चे संपादक होते. प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब संपादक असलेले वृत्तपत्र म्हणून फक्त `बहिष्कृत भारता'चाच उल्लेख करावा लागेल. नंतरच्या काळातील `समता, जनता, प्रबुद्ध भारत' ही पत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या इच्छेनुसार सुरू झाली असली तरी लौकिकार्थाने ते या पत्रांचे संपादक नव्हते. 

`बहिष्कृत भारत' हे पत्र सुमारे दोन वर्षे (22 महिने) चालले. (पहिले वर्षः दि. 3 एप्रिल 27 ते 3 फेब्रुवारी. 28, दुसरे वर्ष दि. 16 नोव्हेंबर 28, ते 15 नोव्हेंबर 29, 3 फेब्रुवारी 28 ते 16 नोव्हेंबर 28 या काळात  ते बंद झाले.) अनेकदा त्यात खंड पडला. पत्राची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती. अतिशय ओढग्रस्तीच्या वातावरणात त्यांनी ते कसेबसे चालू ठेवले. `बहिष्कृत भारता'चे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय? `बहिष्कृत भारता'तील दि. 3/2/1928 च्या अग्रलेखात यासंबंधी त्यांनी अतिशय भावनापूर्ण शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले आहे. `बहिष्कृत भारता'च्या काळात ते 24-24 रकाने स्वत भरून काढत होते. कोणीही सहाय्यक त्यांना नव्हता, असा उल्लेख त्यांनी केला आहे. (बहिष्कृत भारत, 3 फेब्रुवारी 1928) मात्र `बहिष्कृत भारत' हे पत्र स्वत:च्या छापखान्यात दुसऱयाच वर्षी दि. 16 नोव्हेंबर 1928 पासून त्यांनी छापावयास सुरुवात केली. (भारतभूषण प्रिंटिंग प्रेस) हे विशेष. 

`बहिष्कृत भारत' महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले. त्यामुळे महाडच्या चवदार तळ्याच्या धर्मसंगराच्या संदर्भात त्यांनी या पत्रात विपुल लेखन केले आहे. `महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदुंची जबाबदारी', `महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी', `महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्यवर्गाची जबाबदारी' हे त्यांचे अग्रलेख त्या दृष्टीने निसंशय महत्त्वपूर्ण आहेत. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहासंदर्भात खास पुरवणीही काढण्यात आलेली होती. त्याचबरोबर सनातन्यांशी वाग्युद्ध करण्याची जबाबदारी या पत्राने लिलया पेलली. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची भूमिका या पत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विस्ताराने मांडलीच, परंतु आपल्या विरोधकांचाही पुरता समाचार या वाचस्पतीने घेतला. 

या कालखंडातच दि. 4 सप्टेंबर 1927 `समाज समता संघा'ची निर्मिती झाल्याचे दिसते. ही संघटना दलितेतरांनी सुरू केली होती. भा. वि. प्रधान, दे. वि. नाईक, भा. र. कद्रेकर, रा. दा. कवळी आदी मंडळींचा त्यात पुढाकार होता. `समाज समता संघा'च्या या मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या संघटनेचे अध्यक्ष होण्याची विनंती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मंडळींना पुरते पारखून समाज समता संघाचे अध्यक्षस्थान स्वीकारले.  `समाज समता संघा'ची ही मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कसोटीला पुरती उतरली. यापैकी काहीजण अखेरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहिले. सर्व तऱहेच्या यातना, हालअपेष्टा त्यांनी स्वीकारल्या व आपले समाजसमतेचे व्रत निर्धाराने शेवटास नेण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सुरुवातीपासून दलितेतर मंडळी मोठ्या प्रमाणात होती. त्यापैकी गं. नी. सहस्त्रबुद्धे यांनी तर महाड येथे मनुस्मृतीदहनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेतला. कमलाकांत चित्रे, अनंतराव चित्रे व भा. र. कद्रेकर हे अखेरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहिले. त्यांच्या शैक्षणिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. दे. वि. नाईक हे `गोवर्धन ब्राह्मण' गृहस्थ पूर्वी `ब्र्राह्मण-ब्राह्मणेतर' या नावाने पत्र चालवीत असत. `समाज समता संघ' सुरू झाल्यानंतर `समता' हे पत्र सुरू करण्यात त्यांचाच पुढाकार होता. पुढे `जनता' पत्र सुरू करण्यातही दे. वि. नाईक व भा. र. कद्रेकर यांचा वाटा फार मोठा होता. 

`बहिष्कृत भारत' सुरू असताना `समता' हे पत्र सुरू करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोत्साहन दिले. नव्हे ही दोन्ही पत्रे एकाच मताची वाहक असून दोन्ही पत्रे वाचकांनी वाचावीत अशी अपेक्षा व्यक्त करणारे `स्व-विषयक निवेदन' `बहिष्कृत भारता'त छापले गेले. (`बहिष्कृत भारत', दि. 7 डिसें., 1928) `समता' पत्रातील `बहिष्कृत भारता'च्या प्रसिद्धीची तारीख एक आठवडा पुढे ढकलण्यात आली. (`बहिष्कृत भारत', दि. 7 डिसेंबर, 1928) `समता' पत्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र लेखन मात्र केले नाही. 

तथागत बुद्धाने केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या प्रयत्नाचे मूल्यमापन करून ते म्हणतात, ``सोळाव्या शतकात साधुसंतांनी सत्यशोधकी कुऱहाडीचे कितीतरी घाव घातले तरी अस्पृश्यतारूपी फोफावलेला वृक्ष त्यांच्या हातून तोडला गेला तर नाहीच पण त्याचे पानसुद्धा त्यांच्याने हलले नाही.''  संत हे जातीत जन्मले, जातीत वाढले व जातीतच मेले. भजनात एकी व भोजनात बेकी हा संतांचा व्यवहार होता. आध्यात्मिक पातळीवरील समतेचा विचार संतांनी मांडला. ऐहिक पातळीवरील समतेसाठी त्यांनी काहीही केले नाही. तुम्ही चोखामेळ्यासारखे संत व्हा म्हणजे मग आम्ही तुम्हाला मानू, असा विचार केला गेला. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येत नाही. तिचे मूल्य स्वयंसिद्ध असते, असे या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. 

19 व्या शतकातील समाजसुधारणेच्या विचारांची दखल घेत असताना `अनिष्ट कुलाचार' व `अनिष्ट देशाचार' असे सुधारणांचे दोन प्रकार सांगून अनिष्ट कुलाचाराच्या संदर्भात सुधारकांनी रण माजवले. अनिष्ट देशाचाराच्या संदर्भात त्यांनी रण केले नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. हिंदुत्वाच्या वर्तुळात जाती-निर्मूलन व अस्पृश्यता निवारण करू पाहणाऱया हिंदू महासभेसारख्या संस्थांच्या कार्याच्या मर्यादांची जाणीवही त्यांनी `बहिष्कृत भारता'त करून दिली आहे. 

प्रश्न सामाजिक असले तरी ते राजकीय मागणीच्या आड येऊ शकत नाहीत आणि म्हणूनच कै. तेलंग प्रभृतींसारख्या विलक्षण लोकांना सामाजिक परिषदवाल्यांचा बुद्धिवाद पसंत पडला नाही. पण तोच त्यांनी जातीभेद व अस्पृश्यता अशा सामाजिक अन्यायांचा आधार घेतला असता तर तेलंगांना नव्हे, कोणालाही त्यांना निरुत्तर करता आले नसते. पण त्यांची दृष्टी कुलाचाराच्या पलीकडे गेली नाही. स्वजातीच्या लोकांची शुद्धता करण्यात त्यांनी सारा वेळ घालविला आणि सामाजिक सुधारणेचा जप करूनही जातीभेद व स्पर्शास्पर्श भेद होता तसा ठेऊन गेले.'' (`बहिष्कृत भारत', दि. 3-6-1927.)         याशिवाय सायमन कमिशन, नेहरू कमिटीची योजनाः साम्यवाद व साम्यवादी, मुंबई म्युनिसिपालटीतील लोकप्रतिनिधी, गिरण्यांचे मालक व कामगार, मुंबई इलाख्यातील शिक्षण, खोतांनी केलेली शेतकऱयांची लुबाडणूक आदी प्रश्नांची दखलही `बहिष्कृत भारता'त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी घेतली आहे, असे दिसते. त्यांचे क्षेत्र आता सामाजिक, धार्मिक, सुधारणांपुरते मर्यादित राहिलेले नाही, ते राजकीयही झाले आहे. या पार्श्वभूमीवर 24 नोव्हेंबर 1930 रोजी `जनता' या पाक्षिकाची सुरुवात झाली हे ध्यानी घेणे आवश्यक आहे. `बहिष्कृत भारत' दि.15.11.29 रोजी बंद होऊन `जनता' पत्र सुरु झाले यामध्ये सुमारे एका वर्षाचा अवधी गेला आहे. 

`जनता' पाक्षिक सुरु झाले. `बहिष्कृत भारत' असे आपल्या पत्राचे नाव असल्यामुळे अस्पृश्यांशिवाय दुसरे कोणी वाचत नाहीत, म्हणून पत्राचे नाव बदलून `जनता' केले आहे, असे त्यांनी या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पत्राची जबाबदारी दे.वि.नाईक व भा.र.कद्रेकर यांनी स्विकारली.  डॉ.बाबासाहेबांनी या संदर्भात त्यांना पाटविलेल्या पत्रात म्हटले आहे की, `तुम्ही अस्पृश्य नसूनसुद्धा मनाने या चळवळीशी एकरूप झाला आहात, इतके की, तुमच्या माझ्यात काहीच फरक राहिलेला नाही.'  दे.वि.नाईक हे या पत्राचे सुरुवातीस संपादक होते तर प्रकाशक व व्यवस्थापक भास्करराव रघूनाथ कद्रेकर होते. `जनता' पत्राच्या वाचकांसाठी डॉ.बाबासाहेबांनी विलायतेस जात असतांना व विलायतेतून सविस्तर पत्रे पाठवली आहेत. प्रवासवर्णनाचाही भाग या पत्रांत असला तरी डॉ.बाबासाहेबांच्या शैलीत गोलमेज परिषदेचा सविस्तर वृत्तान्त या पत्रात आपल्याला मिळतो. त्याचबरोबर तत्कालीन राजकारणासंबंधीचा त्यांचा दृष्टीकोन महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींसबंधीची त्यांची मते यांचेही दर्शन या पत्रात आपल्याला होते. आंबेडकर-गांधी यांच्यातील संघर्षाचे स्वरूपही या पत्रावरून ध्यानी येते. ही दीर्घ पत्रे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजीत लिहिलेली होती व त्यांचे भाषांतर `जनता' पत्रात प्रसिद्ध होत होते. ही पत्रे काही ठिकाणी विलक्षण भावगर्भ व काव्यात्म झाली आहेत. आंबेडकर-गांधी यांच्यातील संघर्षाचे स्वरुपही या पत्रांवरून ध्यानी येते. 

`जनता' पत्राच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या सामाजिक-राजकीय कार्यात पूर्णपणे व्यग्र होते. `जनता' पत्राकडे पूर्णपणे लक्ष देणे त्यांना अशक्य होते. गोलमेज परिषदेमुळे विलायतेत त्यांना वास्तव्य करावे लागले. कायदेकौन्सिलच्या कामातूनही त्यांना उसंत मिळत नसे. या काळात त्यांचा वकिलीचा व्यवसायही जोरात सूरू होता. सरकारी विधी महाविद्यालयात प्राचार्य म्हणूनही 1935 साली त्यांनी जबाबदारी स्विकारली. अशा या चौफेर कार्याच्या कालखंडातील त्यांच्या  विचारांचे प्रतिबिंब `जनता' पत्रात दिसते. या धुमश्चक्रीत `जनता' पत्राची जबाबदारी दे. वि. नाईक, भा.र. कद्रेकर, अनंतराव चित्रे, गं. नी. सहस्त्रबुद्धे आदींनी समर्थपणे सांभाळली. `जनता' पत्रासाठी लेखन करण्याचे कामही ही मंडळी करीत असत. तथापि, जनतेच्या खास आग्रहाखातर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `जनता' पत्रासाठी मजकूर द्यावा लागे. वाचकांची त्यासाठी जोरदार मागणी असे. परंतु हे लेखन त्यांना सातत्याने करता आले नाही. मधून मधून ते `जनते'साठी लेखन करीत असत. या लेखनाची जाहिरातही `जनते'मधून देण्यात येत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अग्रलेख असे पहिल्या पृष्ठावरच जाहीर केले जात असे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन अग्रलेखाच्या जागी विशेष महत्त्व देऊन छापले जात असे. या लेखनाच्या खाली A हे इंग्रजी अक्षर टाकण्याची प्रथा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या `जनता' पत्रासाठी लिहिलेल्या खास लेखनाशिवाय त्यांची महत्त्वपूर्ण भाषणेही अग्रलेखाच्या जागी लिहून तयार करीत. त्या भाषणाची वा लेखाची पुस्तिकाही प्रसिद्ध होत असत. त्यामुळे त्यात वक्=त्वाचे गुण असले तरी त्याला निबंधाचा दर्जा प्राप्त होत असे. त्यादृष्टीने त्यांचे `ज्ञानप्रकाशा'त प्रसिद्ध झालेले बार्शी येथील `देशांतर, नामांतर की धर्मांतर' किंवा 1936 साली `मुंबई इलाखा महार परिषदे'त केलेले `मुक्ती कौन पथे?' हे भाषण किंवा जातपात तोडक मंडळात देण्यासाठी तयार केलेले ''Annihilation of Caste'    हे इंग्रजी भाषण,  'Ranade, Gandhi & Jinah' हे रानड्यांच्या जयंती समारंभानिमित्त केलेले इंग्रजीभाषण ही उदारहणे म्हणून सांगता येतील.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची `जनता' पत्रात अग्रलेख म्हणून प्रसिद्ध झालेली भाषणे `अधिकृत' आहेत. त्यामुळे त्यांना लेखांचे महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची एखाद्या विशिष्ट प्रश्नासंबंधीच भूमिका सविस्तर पत्रक काढून प्रसिद्ध केली की, ते पत्रकही अग्रलेखाच्या जागी `जनता' पत्रात छापले जात असे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com