जाती तोडो, समाज जोडो या सामाजिक न्यायाच्या आंदोलनाच्या वेळीच संयुक्त सोशालिस्ट पार्टीने नारा दिला " संसोपा बाँधी गाठ, पिछडा पावें सौ में साठ." यातूनच पुढे बहुजन वर्गाच्या हिस्सेदारीचे आंदोलन डॉ. राम मनोहर लोहिया व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले. सन १९७७ नंतर या आंदोलनाने देशात सामाजिक न्याय आंदोलनाची, युगाची लाट उभी केली अन् या लाटेत प्रस्थापित राजकारण व सत्ता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडली. भारतीय राजकारणाचा चेहरा मोहराच या समाजवादी चळवळीने बदलून टाकला. भारतीय राजकारणाचा नेमका हाच चेहरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होता. अन् डॉ. लोहियाच आपल्या स्वप्नातील भारत निर्माण करु शकतात, हा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत असल्याने त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापने संदर्भातील खुले पत्र डॉ. लोहिया यांनाच लिहिले होते.
विद्यमान भारतीय राजकारण व संसदेचा स्तर नीच पातळीवर घसरल्याने संविधान अन् लोकशाही धोक्यात आली आहे . त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले राजकारण व पाहिलेली राजकीय स्वप्न अशा संकट समयी सहजच डोळ्यासमोर उभी राहतात. मग डॉ. लोहिया व जेपीची आंदोलने व सत्ता परिवर्तनाचे लढे दिसू लागतात. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या खुल्या पत्रातील रिपब्लिकन पक्ष तसाच उभा राहिला असता, जसा डॉ. आंबेडकर यांना हवा होता तसा, तर आज लोकशाही व संविधान धोक्यात आहे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली नसती. संघ व भाजपने ही वेळ आपल्यावर आणली आहे, असे म्हणण्यापेक्षा आपण ती ओढावून घेतली आहे, हे आपण कबूल करु तेव्हाच संविधान व लोकशाही वाचविण्याची लढाई आपण जिंकू शकतो. ही वेळ पहिल्यांदा आत्मचिंतनाची आहे. त्यानंतर संविधान व लोकशाही वाचविण्याची. कारण आत्मचिंतनातुनच दुभंगलेली मने जुळतील. या लढाईसाठी ते आवश्यक आहे.
आरक्षण व्यवस्था ही अनुसुचित जाती, जमाती व ओबीसीच्या म्हणजे बहुजन वर्गाच्या भागीदारीसाठी संविधानाच्या चौकटीचे संरक्षण देवून उभी केलेली व्यवस्था आहे. ती केवळ कुणाला साहेब बनविण्यासाठी उभी केलेली नाही. हे काँग्रेसच्या कधीच लक्षात आले नाही. समाजवादी चळवळीच्या लक्षात आले, पण त्यांनी तो मुख्य मुद्दा कधीच बनविला नाही. बहुजन हा केवळ कष्टकरी असल्याने त्याचे शोषण होत आहे. जातीय पातळीवरील त्याचे शोषण डाव्यांना कधीच दिसले नाही. तर या आरक्षणामुळे समाजातील टॉलेंन्टला संधी मिळत नाही, असा कुप्रचार संघ व भाजपने केला. त्याचा प्रतिवाद करणे गरजेचे होते. पण त्याही भानगडीत कुणी पडले नाही. त्यामुळेच मंडल आयोगाला विरोध करुन सुद्धा भाजपने ओबीसी वोट बँक आपल्या सोबत उभी केली. है या देशातील पुरोगामी म्हणविणाऱ्या आंबेडकरी, समाजवादी, डावे पक्ष, संघटना व त्यांच्या नेत्यांचे अपयश आहे. काँग्रेसचे तर आहेच आहे.
याच दरम्यान, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी व वोट हमारा राज तुम्हारा, या घोषणा देत देशात दलित आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाने चेतना निर्माण केली. समाजाला जागृत केले. समाजाची एकजूट केली. अन् या एकजूट समाजाच्या मतांचा सौदा पुढे या आंदोलनातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाने केला. वंचित व बसपा करीत असलेल्या राजकारणामुळे तर " कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ", असे म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या संघ व भाजपमुळे या देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे, त्याच संघ व भाजपला सरळसरळ मदत करण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर व मायावतींनी घेतली आहे, असे मतांचे ठेकेदार अनेक निर्माण झाले आहेत. आता ते ओबीसीत ही होत आहेत. अथवा त्यांना मतं विभाजनासाठी उभे केले जात आहे.
संपूर्ण क्रांतीचा नारा देत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुरु केलेले आंदोलन हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय व भागीदारीचेच आंदोलन होते. त्या आंदोलनाला गंभीर न घेतल्याने इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला. पण दुर्दैव हे की त्यापासून काँग्रेस काहीच शिकली नाही. आज काँगेस केवळ नावापुरती उरली आहे. अशा वेळी राहुल गांधी या भागीदारी व हिस्सेदारी विषयी बोलत आहेत. पण ते व्यवहारात व निवडणुकीच्या मैदानात कुठेच दिसत नाही. महाराष्ट्रात भाजप एक ही जागा मुस्लिम समाजाला सोडत नाही. तीच परिस्थिती काँग्रेसची आहे. राज्यात धनगर समाजाची संख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे पण काँग्रेस, राष्ट्रवादी अथवा उद्धव सेना एक ही जागी धनगर उमेदवार देत नाही. उलट भाजप देत आहे. या राजकारणाला म्हणायचे तरी काय ?
स्वातंत्र्य भारतात लोकसभेसाठी १७ वेळा निवडणुका झाल्या पण ११ ते १२ टक्के मतदान असलेल्या धनगर समाजाचा एक ही खासदार आजपर्यंत लोकसभेवर निवडूण गेला नाही. गेल्या चार टर्म काँग्रेस व राष्ट्रवादीने एकाही मुस्लिम नेत्याला लोकसभेवर पाठविले नाही. मुस्लिम समाजाची टक्केवारी ही ११ ते १२ टक्के इतकीच आहे. एकूण मतदानाच्या २४ टक्के असलेले हे समाज खऱ्या अर्थाने वंचित असून त्यांना काँगेसच्या राजकारणामुळे वंचित राहवे लागले आहे. विधानसभेतील चित्र ही यापेक्षा वेगळे नाही. अनुसुचित जाती व जमातीला आरक्षण असल्याने ते निवडूण जातात. आरक्षण नसते तर त्याची अवस्था या पेक्षा ही बिकट असती.
सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी प्रकाश अण्णा शेंडगे व अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचे एक शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले होते. यावेळी त्यांनी धनगरांचा प्रभाव असलेल्या माढा, सोलापूर, सांगली, बारामती, बीड, परभणी, उस्मानाबाद व अहमदनगर या लोकसभा मतदासंघांपैकी २ जागा धनगर समाजाला द्या, अशी मागणी केली होती. पण पवारांनी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली अन् धनगरांनी या सर्व ठिकाणीं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पाडले. या आठपैकी दोन जागांवर धनगर उमेदवार देवून आठ ही जागा सहज निवडूण आणता आल्या असत्या. पण जाणत्या राजाकडे ही समजच नव्हती व आज ही नाही. असती तर महादेव जानकर यांच्या ऐवजी त्यांनी यापैकी एक जागा या धनगर नेत्यांसाठी सोडली असती. जानकरावर ही त्यांचे काही प्रेम नव्हते. बारामती सेफ करण्यासाठीं ते उदार झाले होते. थोडक्यात स्वहिताचेच राजकारण यामागे होते.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे हे राजकारण राज्यातील धनगर, मुस्लिम, अन्य अनुसूचित जाती - जमाती व एकूणच बहुजन समाजाच्या लक्षात आल्याने त्याने या दोन्ही पक्षाकडे पाठ फिरवली आहे. यावेळी तो केवळ संविधान व लोकशाही विरोधी भाजपचा पराभव करण्यासाठीच साथ देत आहे. है काँगेस व राष्ट्रवादी काँगेसच्या शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी लक्षात घ्यावे.
- जयभीम, जय समाजवाद, जय संविधान....!!
- राहुल गायकवाड,
- महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
प्रतिक्रिया....
प्रश्न आहे ओबीसींना ओबीसी असल्याची जाण नाही. त्यांच्या गळी हिंदुत्व उतवण्यात भाजपा यशस्वी ठरली. ओबीसी नेत्यांना हाताशी धरून भाजपाची पानेमुळे त्यांनी तळागाळात रोवली. असे असताना पुरोगाम्यांनी कितीही त्यांची कानउघडणी केली तरी ती अपयशी ठरली. मुळात मुल्यावर आधारीत समाजरचना होऊ शकली नाही. काॅंग्रेसची परंपरागत व्होट बॅंक दुभंगली गेल्यामुळे भाजपा सारख्यांचे फावले. नेहमी नेहमी संविधानाची भीती दाखवून काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादी सारख्या पक्षांनी दलितमुस्लिमांची मते लाटली. किंबहुना त्यांना कधीही पाठींबा दिला नाही. उलट तुमच्यामुळे आम्ही हरलो आणि भाजप जिंकली असा ते दिंडोरा पिटू लागले. भाजपची बी टीम म्हणुन हिणवु लागले. म्हणजे केवळ भाजपच्या भीतीपायी ह्यांना पाठींबा द्यावा का? - अण्णा मोरे
0 टिप्पण्या