मल्लिकार्जून खर्गेंचा अपमान करणाऱ्या भाजपाने माफी मागावी – सुरेशचंद्र राजहंस
भारतीय जनता पक्ष दलित व आदिवासी विरोधी आहे हे सातत्याने दिसून आले आहे. भाजपाने आज पुन्हा एकदा त्यांची मनुवादी प्रवृत्ती दाखवली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे कार्टून महाराष्ट्र भाजपाने पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रकाशित करून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे. दलित विरोधी मानसिकतेच्या भाजपाला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवून त्यांची जागा दाखवा असे आवाहन काँग्रेस प्रवक्ते व मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे गरिब कुटुंबात जन्माला आलेले व स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने पुढे आलेले नेते आहेत. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा व जनसामान्यांचे प्रतिनिधीत्व करत असल्याने काँग्रेस पक्षाने त्यांना आजवर विविध पदे देऊन सन्मान केला व मल्लिकार्जून खर्गे यांनीही त्यांना दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडलेली आहे. खर्गेंसारख्या अनुभवी व ज्येष्ठ दलित नेत्याचे कार्टून काढून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हिन प्रवृत्तीचे राजकारण आहे. खर्गे यांच्याबद्दल अपमानजनक लिहिण्याआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्यात पक्षात काय अवस्था आहे, हे तरी आधी तपासून पहावे व मग दुसऱ्या पक्षांच्या अध्यक्षांबद्दल बोलावे. काँग्रेस पक्षाला मिळत असलेला पाठिंबा व लोकसभा निवडणुकीतील पराभवाने घाबरलेला भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर उतरला आहे.
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजाच्या असल्याने त्यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला न बोलावून अपमान केला. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन भारत रत्न पुरस्कार प्रदान करताना महामहिम राष्ट्रपतींना बसण्यास खूर्चीही दिली नाही व राजशिष्टाचारही पाळला नाही. भाजपा हा दलित व आदिवासी विरोधी पक्ष असून मल्लिकार्जून खरगे यांच्या अपमानाबद्दल महाराष्ट्र भाजपाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
0 टिप्पण्या