अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे परंतु पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर आहे. हुकूमशाही राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य आणणे हेच मविआचे लक्ष्य असून पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करु, असे मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या त्यात काहीही तथ्य नाही. जिथे पक्षाची ताकत आहे ती जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते आणि त्यात काहीही चुकीचे नाही. काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही आहे व मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्या पक्षश्रेष्ठी समोर आपले मत मांडत असतो असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई काँग्रेसची अध्यक्षा म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीसमोर मांडल्या, तो माझ्या कर्तव्याचा भागच आहे. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे, काँग्रेसचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाचा शिष्टाचार मानतो. पक्षाने एकदा भूमिका घेतली की पक्षाचे काम करणे ही माझी आणि माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे आणि येणाऱ्या काळात मुंबई काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला दिसेल. पक्षाची शिस्त आणि विचारधारा हे आमच्यासाठी महत्वाचे आहे असे गायकवाड म्हणाल्या.
यावेळच्या लोकसभा निवडणुका या देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. देशाचे भवितव्य, आपल्या देशाची लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आहे. मागील १० वर्षांच्या अन्याय काळात समाजातील प्रत्येक घटकावर या सरकारने अन्याय केला आहे. या सरकारने फक्त आपल्या मित्रांचे खिसे भरण्याचा काम केले, धर्म-जाती-प्रांत-भाषेच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप केले आहे. गोरगरिब, दलित, आदिवासी, मागास वर्गासाठी, महिला व तरुणांसाठी काहीही केलेले नाही उलट दलित व महिलांवरील अत्याचार आणि अन्याय या सरकारच्या काळात वाढला आहे असा आरोप त्यांनी केला.
देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला वातावरण अनुकुल आहे. राज्यातही काँग्रेस पक्षावरचा जनतेचा विश्वास आणखी दृढ झालेला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रेने देशातील व राज्यातील वातावरण बदलले आहे. भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईतील इंडिया आघाडीची छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील समारोपाची सभा प्रचंड यशस्वी झाली. तसेच धारावीतही भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार आमच्या कार्यकर्त्यांचा आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
0 टिप्पण्या