Top Post Ad

आर.टी.ई. प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल....

 

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा केला. भाजपाप्रणित शिंदे सरकारने मात्र या कायद्यात मनमानी व बेकायदेशीर बदल करून वंचित व दुर्बल घटकांतील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणली आहे. गोरगरीब, वंचित आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा मनुवादी निर्णय असल्याचा हल्लोबोल करत काँग्रेस पक्ष हे कदापी सहन करणार नाही. सरकारला याप्रश्नी जाब विचारू व वेळ पडली तर न्यायालयातही दाद मागू, असा इशारा  मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे.  

आरटीई मधील कलम १२ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये कमीत कमी २५ टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे व ८ वी पर्यंत मोफत शिक्षण बंधनकारक आहे. या कलमानुसार ज्या खासगी विनाअनुदानित शाळांच्या १ किमी. परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळा आहेत, अशा शाळांना २५ टक्के प्रवेशांबाबतची अट लागू नसेल, असा बदल भाजपा शिंदे सरकारने केला आहे. शिक्षण संचालकांचे दिनांक 15.04.2024 चे यासंर्भातील पत्र आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर तसेच इतर शहरांमध्ये एकही अशी विनाअनुदानित शाळा नसेल ज्याच्या १ किमी. अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नाही. मूळ आरटीई कायद्यामध्ये शाळांमधील अंतराबाबत कोणतीही अट नाही, त्यामुळे शिंदे भाजपा सरकारचा हा बदल बेकायदेशीर असून हा निर्णय खाजगी शिक्षण सम्राटांच्या हिताचा आणि गरिब, दुर्बल घटकांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा, २००९ (आरटीई) अंमलात आणला. या कायद्याचा हेतू हा गरिब व दुर्बल कुटंबातील मुलांना हक्काचे शिक्षण मिळाले पाहिजे परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. 
आरटीई मध्ये बदल करुन भाजपा सरकारने गरिबांच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे शहरांतील गरीब विद्यार्थ्यांसाठी विनाअनुदानित शाळांचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले आहेत तसेच ग्रामीण भागातही अनेक विनाअनुदानित शाळा या निर्णयामुळे आरटीईमधून हद्दपार होतील. भाजपा-शिंदे सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा करुन ठेवला आहे. सरसकट समूह शाळा योजना, शाळा दत्तक योजना, कंत्राटी शिक्षक भरती व आता आरटीईमधील बदल हे धनदांडग्यांचे हित जपणारे आहे. सर्वसामान्य घटकांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले, सावित्रिबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले आयुष्य वेचले. या महापुरुषांच्या विचारांना भाजपा-शिंदे सरकार तिलांजली देत आहे. आरटीईमधील बदलाच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून बहुजनांच्या मुलांना न्याय देण्यासाठी सर्व स्तरावर संघर्ष करु, असेही प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.

 सरकारच्या या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेशाची वाट कठीण झाली असून पालकांत मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या  नियमांच्या विरोधात ज्येष्ठ वकील ॲड. जयना कोठारी, ॲड. दीपक चटप, ॲड. पायल गायकवाड, ॲड. ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावली असून ८ मे पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. आरटीईतील बदलांमुळे बव्हंशी इंग्रजी माध्यमांच्या विना अनुदानित खासगी शाळेत प्रवेश मिळणार नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागेल असे मत याचिकाकर्ते शिक्षण हक्क कार्यकर्ते वैभव एडके, राहुल शेंडे, वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे यांनी व्यक्त केले आहे.

आरटीईअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. यातील उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच आरटीईचे ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल. याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांत खासगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले. मात्र तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही. खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही. राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे मत याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. दीपक चटप यांनी मांडले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com