समाजात जाती धर्मातील सलोखा व परस्पर प्रेमभाव वाढीस लावण्यासाठी, लोकवस्तीतील मुली - मुलांना समता संस्कार शिबीरात जबाबदार नागरिक बनवण्याचे प्रयत्न अत्यंत अभिनंदनीय व आवश्यक आहेत, अशा शब्दात राबोडी फ्रेंड्स सर्कलचे विश्वस्त व उद्योजक मोईझ बुरोंडकर यांनी समता संस्कार शिबिराची समयोचितता अधोरेखीत केली. समता विचार प्रसारक संस्था आयोजित ३० व्या वार्षिक समता संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम होत्या. यावेळी बोलतांना संस्थेचे संस्थापक जगदीश खैरालियांनी सर्व शिबिरार्थींचे अभिनंदन केले आणि संस्थेच्या पुढील वर्षभरात चालणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. युसुफ मेहरअली सेंटरचे मधू मोहिते यांनी पनवेलमध्ये असे शिबिर घेण्याचे निमंत्रण दिले.
येऊरच्या निसर्गरम्य वातावरणात हे वार्षिक निवासी शिबीर अत्यंत उत्साहात पार पडले.
ठाणे शहरातील महानगर पालिकेच्या शाळांमधील १० वी एसएससी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास व्हावा आणि त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण होऊन देशाचे भावी नागरिक म्हणून ते समर्थ व्हावेत, या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात येते, असे या शिबिराचे संयोजक आणि आणि संस्थेचे कार्यकारी सचिव अजय भोसले यांनी सांगितले. या वर्षी राबोडी, कळवा, धर्मवीर नगर, मानपाडा, कोपरी, किसन नगर या विभागांतून ३८ शिबिरार्थींनी सहभाग घेतला. यात मुलींची संख्या अधिक होती, हे विशेष.
शिबिराची सुरुवात राजेंद्र बहाळकर यांच्या युवकांपुढील आव्हाने या सत्राने झाली. युवांना विविध खेळांच्या माध्यमातून त्यांच्या पुढील आव्हाने आणि त्यांना तोंड देण्यासाठी परस्पर संवादाचे महत्व समजावून सांगण्यात आले. त्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी चमत्काराचे प्रयोग करुन दाखवत त्यामागची वैज्ञानिक तत्वे सांगितली आणि मुलांची अंधश्रद्धेविरुद्ध जागृती केली. दुसऱ्या दिवशी आरती नाईक यांनी तरुण वयातील मुलीमुलांचे आपसातील संबंध अतिशय रंजकतेने विषद केले आणि जोडीदाराची निवड करताना काय काळजी घ्यावी हे सांगितले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी करिअर कसे निवडाल या बद्दल मुलांना मार्गदर्शन केले, जे मुलांसाठी खूप उपयोगी होते. संध्याकाळी आसावरी जोशी यांनी टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्माण करण्याचे प्रात्यक्षिक हस्तकलेच्या माध्यमातून मुलांकडून करुन घेतले. रात्री सुप्रसिद्ध लघुपटकार डॅा. संतोष पाठारे यांनी धार्मिक सलोखा या थीम वर तीन अप्रतिम लघुपट दाखवले आणि त्यावर चर्चा घडवून आणली. सर्वच सत्रात मुली - मुलांनी चर्चेत हिरिरीने सहभाग घेतला. नाशिक येथील आरोग्य प्रशिक्षक प्रशांत केळकर यांनी शरीर विज्ञान, आरोग्य आणि आहार या सत्रात मुलीमुलांचे लैंगिक प्रशिक्षण अतिशय मोकळेपणाने घेतले आणि शिबिरार्थींनीही तेवढ्याच मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि वंचितांच्या रंगमंचाच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी शिबिरार्थींना आत्मविश्वास वाढवण्यासाठी नाटकाचे महत्त्व सांगून त्यांच्या नाटिका बसवल्या.
शिबिरात दररोज सकाळी प्रार्थना, व्यायाम, गाणी, थोरामोठ्यांच्या गोष्टी याने दिवसाची सुरुवात होऊन दिवसभर शिबिरार्थींनी वेगवेगळ्या सत्रांचा आनंद घेतला. शेवटच्या दिवशी मी आणि माझा परिसर या सत्रात मुलांनी आपल्या परिसरातील समस्या सांगितल्या आणि त्यावर कश्या रीतीने तोडगा निघू शकतो यावर चर्चा केली. समारोपाच्या सत्रात शिबिरार्थींनी आपल्या नाटिका सादर केल्या, आपले शिबिरातील अनुभव कथन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर यांनी आभार प्रदर्शन केले. समारोपाला संस्थेचे हितचिंतक रवींद्र, नी. ता. व अनेक पालक उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे विश्वस्त लतिका सु. मो., मनीषा जोशी, मीनल उत्तुरकर व कार्यकर्ते करिना साऊद, वैष्णवी करांडे, अक्षता दंडवते, हर्षिता जयस्वाल, दर्शन पडवळ, एनॉक कोलियार, आदींनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या