भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी, उपायुक्त उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते. तसेच ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त दिनेश तायडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
यंदा ठाणे महापालिकेने जंयतीच्या उत्साह अर्थात मिरवणूक ढोल ताशे यांना बगल देऊन केवळ अभिवादनाचा फार्स करीत जयंती साजरी केली असल्याची चर्चा आंबेडकरी समुहामधून होत आहे. दरवर्षी जयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असते. मात्र या वर्षी मिरवणुक रद्द करण्यात आली. त्यामुळे बॅण्डबाजा, ढोलताशाला देखील बगल देण्यात आली. यावर होणारा खर्च या वर्षी कुणाच्या खिशात गेला अशी चर्चा ठाण्यातील आंबेडकरी जनतेमध्ये होत आहे. गुढीपाडवाची मिरवणूक एक महिना अगोदर मिटींग घेऊन नियोजन करण्यात येते. यासाठी महापालिकेचे अति.आयुक्त स्वत: पुढाकार घेतात आणि नियोजन करतात. प्रशासनाला तसे निर्देश देतात. मात्र ज्या बाबासाहेबांच्या मुळे आज ते अधिकार पदावर पोहोचले आहेत. त्याच बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीबाबत त्यांनी उदासिनता दाखवावी हे न उलगडणारे कोडे असल्याचेही काही आंबेडकरी नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मात्र यांच्या कोत्या मनस्थितीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची उंची काही कमी होत नाही. दिवसेंदिवस ती अधिकच वाढत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना येणारा काळच धडा शिकवेल असेही एका नेत्याने सांगितले.
इतकेच नव्हे तर महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 'विचारमंथन' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत होते. मागील वर्षभर ही शृखंला अखंडीतपणे सुरू होती. मात्र वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील 13 वे पुष्प बुधवारी (14 फेब्रुवारी २०२४ रोजी ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी गुंफले. त्यानंतर ही मालिकाही खंडीत करण्यात आली आहे. याबाबत पालिकेने कोणताही खुलासा केला नसल्याचीही चर्चा सध्या ठाणेकरांंमध्ये रंगली आहे.
0 टिप्पण्या