शोषकांच्या 'फिलॉसॉफी'ने शोषितांची लढाई लढली जाऊ शकते का?
माझे वडील वयाच्या १४व्या वर्षी गिरणी कामगार म्हणून कामाला लागले. त्याच वर्षापासून आंबेडकरी चळवळीचं कामही करायला लागले... त्यांना काही थोडा काळ आंबेडकरांचा सहवास मिळाला, त्याचा त्यांना खूप अभिमान होता. घरात आंबेडकरांची पुस्तकं, वृत्तपत्रातील कात्रणांच्या फाइल्स, तीच आमची संपत्ती. संध्याकाळी सगळे भाऊ-बहीण जेवल्यानंतर, दोन-तीन तास वडिलांबरोबर पॉलिटिक्सवर चर्चा, हा जवळपास रोजचाच भाग. ते स्वतः बी. सी. कांबळे यांच्या गटात होते. घरात चळवळीतले कार्यकर्ते आले की, पन्नासजण तरी यायचे आणि नेहमी यायचे. कारण, स्टेशनजवळ घर, त्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान दोन्ही असायचा. नंतर रेल्वेत नोकरी मिळाल्याने, ते 'CPM'च्या युनियनमध्ये काम करायला लागले. काही डाव्या विचारांच्या लोकांशी ओळख झाली. पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे वाचले. वडिलांची बांधिलकी मात्र, आंबेडकरी चळवळीशी राहिली, मरेपर्यंत...
ते मरायच्या आधी, ३/४ वर्ष मी 'कम्युनिझम' वाचायला लागलो होतो. तसे ते कधिही झुकले नव्हते.. मरणाच्या आधी वर्षभर मी त्यांना प्रश्न विचारला की, आंबेडकरी चळवळीतले नेते, मोठ्याप्रमाणावर काँग्रेसला विकले गेले; पण, कम्युनिस्ट मात्र, एकही विकला गेला नाही, याचं कारण काय असेल? खूप रडले ते, पण त्यांनी उत्तर दिलं नाही....कम्युनिस्ट झाल्यावर बघितलं, काय जबरदस्त 'कमिटमेंट' एकेका नेत्याची आणि कितीही वाईट परिस्थिती असली; तरी, कुणीही 'कम्युनिस्ट-नेता' कधिही विकला गेला नाही. (अपवाद असेल तर मला माहित नाही.) माणसाचं विकणं, हे त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसून, त्याच्या तत्त्वज्ञानाच्या निष्ठेवर आणि लोकांशी जुळलेल्या नाळेवर अवलंबून असतं! हे बरोबर आहे की, कम्युनिस्ट नेते मोठ्याप्रमाणावर मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गातून आले होते. पण, हे १०० टक्के सत्य नाही. *अगदी गरीब घरातूनदेखील कम्युनिस्ट-नेते आले होते. तेही विकले गेले नाहीत किंवा काँग्रेसला सामील झाले नाहीत. अगदी, एकेकटे देखील... जसे, आंबेडकरी चळवळीत मोठ्या प्रमाणावर झालं!* जे मध्यमवर्गीय किंवा उच्च-मध्यमवर्गीय होते, तेही सर्व संपत्ती पार्टीला देऊन किंवा कुळांना वाटून पार्टीत मोठ्या पदावर पोचले. *आजही कम्युनिस्ट पार्टीत, लोक खासदारकीचा सर्व पगार/भत्ते पार्टीफंडात जमा करतात आणि तिथून मिनिमम पगार घेतात...*
"तत्त्वज्ञान रक्तात किती मुरलंय याच्यावर अवलंबून आहे, गरिबी/श्रीमंतीवर नाही"... आज चार-दोन रुपड्यांसाठी आणि पदासाठी, संघ-परिवारालाही स्वतःच्या जात/वर्ग शत्रूला, स्वतःला विकणाऱ्या आंबेडकरी/दलित चळवळीतील नेत्यांना बघून फार फार वाईट वाटतं आणि मी, आज त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा, एकच उत्तर मिळतं... बाबासाहेबांनी शेवटच्या वर्षात कम्युनिझमला केलेला विरोध... त्यामुळे, ते एकप्रकारे कॅपिटॅलीझमचं समर्थन करतायत, अशी जणू धारणा बनली. 'कॅपिटॅलीझम', एकदा स्वीकारला की, प्रत्येक गोष्ट कमोडिटी होते. नेतेदेखील कमोडिटी होतात Price Tag सहित आणि ते स्वतःबरोबर जनतेलाही विकतात! एकदा कॅपिटॅलीझम-फिलॉसॉफी म्हणून स्विकारल्यावर, पैशावर माणसाची किंमत ठरते.* सगळ्यात गरीब तो कमी महत्त्वाचा. दलाली करुन कार्यकर्ते पोसू शकेल आणि स्वतःची तुंबडी भरु शकेल, त्याला मान आणि त्याचीच नेतेगिरी. श्रीमंत झालेल्या बहुसंख्य दलितांनी, सगळ्यांशीच संबंध तोडलाय. कार्यकर्तेही, जो नेता जास्त पैसे देऊ शकेल; त्याच्याच मागे जातात... कंगनासारखी हजार प्रकरणं असून, आठवलेंच्या मागे खूप कार्यकर्ते आहेत. शोषकांच्या फिलॉसॉफीने, शोषितांची लढाई नाही लढता येत. *कम्युनिस्ट, भले 'पोथीवादा'मुळे stagnant झाले, पण विकले गेले नाहीत.* आंबेडकरी चळवळीच्या दुर्दशेचे हे एक कारण आहे का? कॅपिटॅलीझमचं समर्थन करुन शोषितांची चळवळ कशी चालेल, कळत नाही...!!!
-.चंदू सिंधू
(सद्यस्थितीत, *'चंदू सिंधू',* या डाव्या-विचारांच्या सामान्य कार्यकर्त्याच्या, वरील 'शुद्धलेखन-सुधारित' फेसबुकवरील संदेशाचं फार फार महत्त्व आहे...आंबेडकरी-समाजातीलच नव्हे; तर, स्वार्थापोटी व भितीपोटी, कामगार-चळवळींपासून इतर अनेक जाज्वल्य सामाजिक-राजकीय चळवळींच्या गळ्याला नख लावणार्या...आजुबाजुला पसरलेल्या हिणकस व समाजघातकी प्रवृत्तींचं 'शवविच्छेदन' करणारं, हे जळजळीत सत्यकथनच! _...राजन राजे_ )
0 टिप्पण्या