"इंडिया, एक आयडिया", मालिकेतील लेख-क्र. १..... पार्श्वभूमी...
लोकसभा-निवडणुकीच्या धुमश्चक्रीत इंडिया-आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, भाषणं करण्याला आता फारसा अर्थ उरलेला नाही...ज्यांना एकदा देशाची सध्याची अवघड परिस्थिती नीट समजली, त्यांना ती समजलीच; म्हणूनच तर ते निष्ठेनं 'इंडिया-आघाडी'च्या नेत्यांसोबत आहेत. पण, जे बीजेपीवाले, संघवाले आहेत...ते काही तिथे नसतात आणि सर्वसाधारण जनताही हल्ली फारशी राजकीय सभांना वगैरे नसतेच. म्हणूनच लेख लिहून, संदेश लिहून भाजपाई हिंदुत्वाची सोंगंढोंगं, त्यांची राजकीय-बदमाषी उघडी पाडणं...हे सध्या फार फार महत्त्वाचं काम आहे आणि हाती घेतलेल्या एखाद्या असिधारा-व्रतासारखं, ते मी पार पाडत आलोय, याहीपुढे पार पाडेनच...त्याला, तुमची साथ मिळेल, ही अपेक्षा बाळगतो. कारण, जिथून त्यांनी या देशातल्या 'लोकशाहीची पवित्र गंगा' मैली केलीय; त्या समाजमाध्यमांतूनच, मग ते व्हाॅट्सॲप असो, फेसबुक असो, युट्यूब असो...तिथे जाऊनच, या 'मैल्या-गंगे'च्या शुद्धीकरणासाठी आपल्याला इलाज करावा लागेल.
म्हणूनच, तर ते इतरांवर तुटून पडतात; पण, माझ्याविषयी त्यांना कितीही संताप आला (त्यांच्या 'हिट-लिस्ट'वर तर, मी केव्हाचाच आहे आणि म्हणूनच, अनेक खोट्या खटल्यांना व नको नको त्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आहे, न डगमगता तोंड देणारच) तरी, समाजमाध्यमांतून व्यक्तिशः माझ्याविषयी फारसं बोलत नाहीत...कारण, जरा जरी, ते माझ्या अंगावर आले (ज्याची, मी वाटच बघतोय) तर, मी त्यांना अशातऱ्हेनं शिंगावर घेऊन आपटीन की, त्यांना साधं स्वतःच्या पायावर उभं रहाणं देखील मुश्किल होईल! त्यासाठीच, तुम्ही माझे संदेश सर्वत्र पाठवले पाहिजेत, पाठवत असालच...त्याला काही दिडक्या लागत नाहीत आणि खास मेहनतही लागत नाही, पण तोच अक्सीर इलाज आहे...त्यांना ते लेख, ते संदेश फार फार झोंबतात...त्यावर ते उत्तर देऊ शकत नाहीत, 'सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशी फार मोठी पंचाईत आहे त्यांची. त्यातूनच मराठमोळ्या जनतेत मुळातून जागृती होऊ पहातेय...ती चेतना, तो वन्ही; असाच धगधगता, पेटता राहू द्या..."एकदा का 'इंडिया-आघाडी' सत्तेवर आली की, तुम्हाला-आम्हाला सामान्य मराठी-माणसांसाठी फार मोठं काम करावं लागणार तर आहेच....
देशाच्या लोकशाहीचा 'DNA' सुरक्षित राखण्याकामी 'NDA'ला का गाडायचं आणि 'INDIA-आघाडी'ला का निवडायचं...
गौतम बुद्धाकडे एकदा एक माणूस आपल्या समस्यांची जंत्री मांडू लागला. त्याच म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गौतम बुद्ध म्हणाले, "तू मांडलेल्या ८३ समस्या सोडविण्यास मी 'असमर्थ' आहे...पण, त्यातली शेवटची ८४वी समस्या मात्र, मी नक्कीच सोडवू शकतो आणि ती सोडवली की, तुझ्या बाकी समस्या सुटण्याचा मार्ग तुला सापडेल. तिचं तुझ्या सगळ्या समस्यांची 'गुरुकिल्ली' आहे...'तुझ्या आयुष्यात, त्या ८३पैकी कुठलीही समस्या असणंच तुला नको आहे', हीच तुझी ८४वी समस्या आहे. ही तुझी वांछा, जी तुझ्या नियंत्रणात आहे, तिचं तू त्यागलीस की, तुझ्या अगोदरच्या ८३ समस्या हळूहळू सुटू लागतील. आपल्या नियंत्रणात असलेल्या समस्या आपण सोडवल्या; तरच, मृत्यू, आजार, निसर्गाची अवकृपा, लोकांच्या टीका...यासारख्या, आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या समस्यांवरचा मार्ग सापडतो; अन्यथा, नव्हे!"
तेव्हा मतदारराजा, लोकसभा-निवडणुकीत जागरुकतेनं मतदान करणं...एवढंच, सद्यस्थितीत तुझ्या नियंत्रणात आहे.* देशात अक्राळविक्राळ पसरलेल्या हुकूमशाहीचा नंगानाच, सरकारी-यंत्रणांची बेलगाम दहशत, पुढल्या पिढ्यांचं धोक्यात आलेलं भविष्य, अमानुष आर्थिक-विषमता, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी-अर्धरोजगारी, तथाकथित विकास वगैरे समस्यांच्या सोडवणुकीची, तिचं 'गुरुकिल्ली' आहे! जागरुकतेनं मतदान करणं म्हणजे, देशापुढची सगळ्यात मोठी व मूलभूत समस्या जाणून घेणं आणि नेमकी ती कोणामुळे निर्माण झालीय व ती समस्या नक्की कोण सोडवू शकेल, याचं नीट आकलन होणं होय. आर्थिक-विषमता, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी-*अर्धरोजगारी, विकास वगैरे समस्या पूर्वीही होत्या आणि याहीपुढे थोड्याफार प्रमाणात त्या राहतीलच...पण, देशापुढची सध्याची सगळ्यात मोठी व पिढ्यापिढ्यांचं भयंकर नुकसान करु शकणारी, अशी समस्या कुठली असेल; तर ती, *देशात भाजपाई-संघीय नरेंद्र मोदी सरकारने लादलेली 'अघोषित आणीबाणी',* ही होय!
राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
महाराष्ट्र राज्य, यंदाच्या लोकसभा-निवडणुकीत, सत्तापालट करण्यात निर्णायक भूमिका बजावणार, हे निःसंशयच! देशाच्या लोकशाहीचा 'DNA' सुरक्षित राखण्याकामी...'NDA'ला का गाडायचं आणि 'इंडिया-आघाडी'ला का निवडायचं...याचं बिनतोड-सडेतोड दिग्दर्शन, *"इंडिया एक आयडिया"* या शीर्षकाखाली, एक खास जनजागरण-लेखमालिका...
0 टिप्पण्या