भाजपच्या मोदी सरकारने १० वर्षात सामान्य जनतेसाठी काहीही काम केले नाही पण उद्योगपती अदानीसाठी काम केले. रेल्वे, विमानतळ, बंदरे, मोक्याच्या जमिनी त्यांना देऊन टाकल्या. वीजेच्या प्रिपेडमिटरसाठी नियम बदलले, धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी केवळ अदानींना फायदा व्हावा यासाठी धोरण आखत कायदे व नियम बनवले तसेच धोरण विमानतळ भागातील १७ ते १८ लाख मुंबईकरांसाठी का बदलले नाही असा रोखठोक प्रश्न उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या उमेदवार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित उत्सव लोकशाहीचा २०२४... पत्रकारांशी वार्तालाप या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्याध्यक्ष संदीप चव्हाण व जेष्ठ पत्रकार राही भिडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यांच्या सर्व प्रश्नांना वर्षाताईंनी समर्पक उत्तरे दिली.
मुंबई मध्ये लोकलचे प्रश्न, मुंबईतील प्रकल्पांचा प्रश्न आहे. काही भागात पिण्याचे पाणी व वीजेचा प्रश्न, घरांचा प्रश्न आहे. धारावी, उत्तर मुंबईतील झोपडपट्टीवासियांचे प्रश्न आहेत. मुंबईतील एअर इंडिया कॉलनी, भारत नगर या भागातील प्रश्न आहेत. एअर इंडिया कॉलनीतील १७ ते १८ लाख लोक प्रभावित आहेत, त्यांना घरे विकसीत करता येत नाहीत, दोन माळ्यांच्या घरावरच्या पाण्याच्या टाक्या काढून टाकण्याच्या नोटीसा त्यांना दिल्या आहेत. काही लोकांना सरकारने भरपूर सवलती दिल्या, डीसी रुल बदलले मग या १७ ते १८ लाख लोकांसाठी भाजपा सरकारने सवलती का दिल्या नाहीत, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष का दिले नाही. मुंबईतील मोकळ्या जागा, उद्याने यांचा प्रश्न आहेत, यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यात समन्वय साधून काम करावे लागणार आहे. मला राजकारणाचा, धोरणांची अंमलबजावणी करण्याचा अनुभव आहे तसेच जनतेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचाही अनुभव असल्याचे वर्षाताई म्हणाल्या.
मोदी सरकारने १० वर्षात दडपशाहीचे राजकारण केले. राजकीय नेते, न्याय यंत्रणा यांनाही दहशतीखाली ठेवले. जनतेच्या प्रश्नावर मोदी सरकार कधीही बोलत नाही. जात व धर्म यावर बोलून सामाजिक तेढ निर्माण करण्यावरच त्यांचा भर असतो. महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण गढूळ करण्याचे कामही भाजपाने केले आहे. लोकसभेची निवडणूक ही दोन विचारांची लढाई असून एका बाजूला सर्वांना बरोबर घेऊन जाणारी विचारधारा आहे तर दुसरी हुकूमशाही, दडपशाही व मनुवादी विचारधारा आहे. जनता हुकूमशाही विचारांना कंटाळली आहे. परिवर्तन करण्याची भावना जनतेच्या मनात आहे आणि पराभवाच्या भितीने पायाखालची वाळू सरकली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलू लागले आहेत. देशात परिवर्तन होणार असे चित्र आहे, मुंबईतही महाविकास आघाडीच्या सहाही जागा विजयी होतील असा विश्वास प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या