प्रथम दर्शनी हा प्रश्न शुद्ध वेडगळपणाचा वाटेल यात काही शंका नाही. परंतु हा मोठा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे, हे खरे! प्रचलित बौद्ध समजल्या जाणाऱया समाजाकडे जरा बारकाईने पाहिले असता, याचे उत्तर मिळणे काही कठीण नाही. ते शोधण्याची सुद्धा गरज पडत नाही, इतके ते उघड आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास येथील बौद्ध समाज म्हणजे पूर्वाश्रमीचा प्रामुख्याने महार म्हणून ओळखला जाणारा समाज होय. या विशिष्ट समाजाकडे पाहताना एक गोष्ट तात्काळ नजरेत भरते आणि ती म्हणजे हा समाज अगदी बुलंद आवाजात आपण बौद्ध असल्याचे घोषित करीत असतो. त्यामुळे महार म्हटला की तो बौद्ध असलाच पाहिजे, असा सर्वांचा समज झालेला आहे. हा समज इतक्या व्यापक प्रमाणात पसरलेला आहे की कोणत्याही अर्थाने बुद्धधम्माशी काडीचाही संबंध नसणारा प्रत्येक महार माणूस स्वत:ची ओळख बौद्ध म्हणूनच देत असतो. प्रत्यक्षात मात्र त्यातील अधिकांश लोक सर्व जुन्या धर्म-समजुती आणी रुढी-परंपरा यांचे निष्ठेने पालन करीत असल्याचे दिसतात. केवळ एवढ्या एका गोष्टीवरूनच बौद्ध समाज कोठे आहे? हा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहात नाही. परंतु हा प्रश्ना येथेच संपत नाही. त्याची काही फार गंभीर स्वरुपाची अंगेसुद्धा आहेत. त्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
प्रथम हा समज कसा निर्माण झाला ते लक्षात घेतले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा प्रभावच इतका गंभीर होता की त्यामुळे उभा देश हादरून गेलेला होता. ज्या डॉ.आंबेडकरांनी प्रत्यक्ष देव-धर्म निर्मित आणि पुरस्कृत जाती-व्यवस्थेला सुरुंग लावून मानवी समाजातून बहिष्कृत झालेल्या वर्गांना इतरांच्या बरोबरीला आणून बसविले होते, त्याचा भारतीय पारंपारिक समजाला भयंकर आश्चर्यकारक धक्का बसलेला होता. त्यातच सर्वस्व नाकारलेल्या या समाजाला त्यांचे हक्क मिळवून देऊन ते सक्तीने अंमलात आणण्याचा कायदेशीर मार्ग पक्का करून सर्व बहुसंख्य हिंदू समाजाला जणू काही वेठीस धरल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मागासवर्गीय समाजात उत्साहाचे वारे संचारले होते. सर्व दलित समाज त्या प्रभावाने हर्षोल्हासीत झालेला होता. साहजिकच डॉ.आंबेडकर त्यांच्या गळ्यातला ताईत बनले होते. त्यांची बुद्धधम्म स्विकारची घोषणा तशीच नवलाईची होती. त्या धम्मदीक्षेमुळे असेच काही तरी विलक्षण क्रांतीकारक बदल घडून येतील अशी लोक स्वप्ने पाहू लागले होते. परंतु आपल्या धम्मक्रांतीची भारतभरची मोहिम पूर्ण होण्याआधीच डॉ.आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. साहजिकच त्यानंतर त्यांच्या धम्मदीक्षा मोहिमेला ओहोटी लागली, या धम्मदीक्षेची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून सुरुवातीला फक्त महार समाजापासून केलेली होती. सर्व दलित जाती-जमातींना त्यांनी त्यात ओढले नव्हते. कारण धर्मांतराचा निर्णय एक फार मोठ्या जबाबदारीचा निर्णय होता आणि प्रत्येक दलित जातीने तो स्वतंत्रपणे करावा आणि महार समाजाचे उदाहरण पाहून त्यांनी आपल्या स्वयंप्रेरणेने धम्मदीक्षा घ्यावी असे त्यांचे धोरण होते. जरी धम्मदीक्षेच्या मोहिमेत खंड पडला असला तरी महार समाजात धम्मदीक्षेचे जोरदार वारे पसरलेले होते. हा समाज मोठ्या प्रमाणात आंबेडकरनिष्ठेमुळे जागृत असल्याने तो अग्रभागीच राहिला.
1956 सालीच सरकारने धर्मांतरीत बौद्धांना सवलती नाकारण्याची घोषणा केली होती आणि सवलतींची सक्त गरज असणारे लोक त्यामुळे संभ्रमित होऊन धम्मदीक्षा घेण्यापासून दूर राहिले होते. पुढे तेच प्रत्यक्षात धम्मदीक्षा न घेतलेले लोक `आपली जातच आता नव्या नावाने वावरु लागली' म्हणून आणी `आज नाही उद्या आपणही धम्मदीक्षा घेणारच आहोत' या आशेने स्वत:ला बौद्ध समजू लागले. अशा परिस्थितीत पुढे पांचच वर्षात धम्मदीक्षेचा जोर पार ओसरला आणि प्रत्यक्ष धम्मदीक्षा न घेतलेले लोक धम्मदीक्षेअभावी तसेच बौद्ध म्हणून वावरू लागले. त्यांचे नातेगोते आणि विवाहादि आंतरिक संबंध लक्षात घेता सर्वच महार जातीला बौद्ध म्हणवून घेणे सोईचे होते. व्यवहारात मात्र धम्मदीक्षेच्या अभावी, सवलतींच्या संभ्रमाने आणि बुद्धधम्माच्या निप्रभ प्रचारकार्याने धर्मांतरित बौद्धसुद्धा खऱया अर्थाने बौद्ध जीवनपद्धती जाणू आणि जगू शकले नाहीत किंवा बौद्ध संस्कृती प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत. त्यामुळे धर्मांतरित बौद्धसुद्धा समाधानी होऊ शकले नाहीत. यथावकाश या सर्व समाजामध्ये जुन्या-नव्याचा संभ्रम आणी संघर्ष प्रबळ झाला. त्यामध्ये साहजिकच घराघरात जुन्याचाच प्रभाव बलिष्ठ असल्याने आणि सामाजिक, सांस्कृतिक जीवनात घरी-दारी, गावा-गावात, शाळा-कॉलेजात, ऑफिसात, बाजारात आणि समाजात सर्वत्र जुन्या धर्माचाच प्रभाव असल्यामुळे हा बौद्ध समाज पुरतेपणी वाहवत गेला आणि नामके वास्ते बौद्ध राहिला. त्यांच्या कुटुंबांमध्ये जन्मलेल्या पुढील पिढ्या रुढीप्रमाणे जन्माने बौद्ध म्हणवून घेऊ लागल्या. त्यातील बहुसंख्येचा बुद्धधम्माशी असलेला नाममात्र संबंधसुद्धा साफ तुटला. बौद्ध समाज आज कोठे आहे? या प्रश्नाच्या मुळाशी एवढे महाभारत दडलेले आहे.
या परिस्थितीमध्ये वावरणारा आजचा बौद्ध समाज आहे. शिक्षणाची कास धरणारा हा समाज असल्याने त्यातील काहीजण बुद्धीवादाचा आश्रय करून आपले जुन्या धर्माच्या प्रभावापासून रक्षण करण्याची धडपड करीत असतात. त्याचा परिणाम म्हणजे धम्मप्रचार व प्रसार करणाऱया हजारो संस्थांचा त्या समाजामध्ये झालेला उदय होय. या संस्थांमध्ये आपापल्या मगदूराप्रमाणे बौद्ध धर्मिय कार्यक्रम घेण्याची चढाओढ लागलेली असते. परंतु कोणाकडे ना बौद्ध जीवनपद्धतीचे आणि संस्कृतीचे प्रशिक्षण आहे; ना बुद्धधम्माचा सुसंघटीत संघजीवन जगण्याचा आदर्श! त्यामुळे कोणाला काहीच धम्म प्रशिक्षण मिळत नसते. फक्त धम्मप्रवचनांच्या नावाने लंब्याचौड्या भाषणांचा, परित्राणाच्य नावाने लांबलचक सूत्रपठणाचा (ज्यांचे अर्थ कोणालाच कळत नसतात) आणि धम्मपरिषदांच्या नावाने हारतुरे देऊन अनेकांच्या सत्काराचा डामडौल मात्र अगदी मुक्तहस्ते खर्च करून केला जातो. गेल्या पन्नास वर्षात अशा लक्षावधी कार्यक्रमांची भरमरा केली गेली, परंतु बौद्ध समाज काही आकारला नाही आणि एक पाऊलही पुढे सरकला नाही. बौद्ध म्हणून तरी या बौद्धांचा एकसंघ असा बौद्ध समाज घडू शकलेला नाही. उलट भरमसाठ संघटनांमुळे निर्माण झालेल्या व्यक्तीगत प्रतिष्ठेच्या व हितसंबंधांच्या चढाओढीमध्ये या समाजात सतत परस्पर विरोधाचे आणि संघर्षाचेच वातावरण तापत राहिले. त्यामुळे सामुहिकरित्या एखादे सच्चे धम्मकार्य सिद्ध करून दाखविणेसुद्धा या समाजाला गेल्या पन्नास वर्षात जमलेले नाही.
ज्या सुशिक्षितांनी व पुढारलेल्या उच्चभ्रूंनी बुद्धीवादाची कास न धरता केवळ मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाच्या बळावर समद्धीचे जीवन प्राप्त केले, ते मात्र डॉ.आंबेडकरांच्या आदर्शापासून खूप दुरावले आणी जुन्या धर्मपरंपरेच्या जोखडात पुरतेपणी गुरफटून गेले. या समाजात उच्च विद्याविभूषित तरुण-तरुणी आणि त्यांचे पालक लग्नासाठी फार तर आपण बौद्ध असल्याचे सांगतात, परंतु ते पूर्णपणे हिंदूधर्माला चिकटून जगतात. उलट काही जण तर बौद्ध समाजालाच तुच्छ मानतात. गणपती, साईबाबा, शंकर-पार्वती ही त्यांची आवडीची दैवते असतात. बौद्ध समाजाशी कोणतेही संबंध ठेवणे त्यापैकी अनेकांना नकोसे वाटते.
बौद्ध समाजातील बहुसंख्य सुशिक्षित वर्ग धम्मज्ञानाच्या व संस्कारांच्या अभावामुळे निरनिराळ्या प्रकारच्या सामाजिक, राजकीय चळवळीत वावरत असतो. त्यालाच तो सर्वस्व समजतो. यात कार्यकर्त्यांचे अमाप पीक आलेले आहे. किरकोळ वाचनातून किंवा इकडून तिकडून जी काही धम्माची माहिती असते, त्याचेच तो भांडवल करून कार्यकर्ता म्हणून मिरवत राहतो. त्यातून कधी तरी काही बुद्धधम्म शिकावा किंवा जगून पाहावा असे या वर्गाला कधीच वाटत नाही. हा वर्ग सर्व प्रकारच्या धम्मप्रशिक्षणापासून अलिप्त राहतो. स्वत: आयोजित केलेल्या किंवा इतरांच्या शोभेच्या आणि मिरविण्याच्या कार्यक्रमांना मात्र तो जात असतो. धम्म चळवळीचे बाबतीत तो तितकाच बेफिकीर किंवा उदासिन असतो. हा वर्ग प्रामुख्याने लोकप्रियता, प्रसिद्धी आणी काही लाभाच्या मागे धावत असतो. तो सत्य-असत्याचा काही विचार करीत नसतो.
यामध्ये एक अर्थपूर्ण अशी विपस्सनासाधनेची एक चळवळ भारतात अवतीर्ण झाली. त्याचा लाभ घेण्यास काही लोक पुढे सरसावले. ही एक जमेची बाब होय. त्यातून काहींच्या व्यक्तीगत जीवनाला अर्थ प्राप्त झाला. परंतु सामाजिक जीवनात ते तसेच विस्कळीत किंवा उदासिन राहिले. बौद्ध समाजाच्या रचनेचे कार्य विपस्सना साधकांना हाती घेता आले नाही. काही पाश्चिमात्य चळवळींनी भारतात काही धम्मकार्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात कोणाला काही यश लाभले नाही.
बौद्ध मनुष्य आणि बौद्ध समाज यांच्या जडण-घडणीचा मुख्य भार शेवटी भिक्षू-भीक्षूणी संघाच्या अचूक व सुसंघटित प्रचार-प्रसारावर अवलंबून असतो. त्यासाठी हा प्रचारकांचा वर्ग चांगला प्रशिक्षित व आचरणशील असावा लागतो. त्याला पारंपारिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी बाबासाहेबा आंबेडकरांना स्वत: एक बौद्ध सेमिनरी स्थापन करून हे कार्य हाती घ्यायचे होते. त्यामध्येच त्यांना गृहस्थ प्रचारक सुद्धा घडवायचे होते. परंतु त्यांच्या हयातीत ते कार्य सिद्ध होऊ शकले नाही आणि त्यांच्या नंतरही गेल्या पन्नास वर्षांत त्याकडे कोणी काही लक्ष दिले नाही. प्रशिक्षित धम्म प्रचारकांच्या अभावी आजही तथाकथित बौद्ध समाज अंधारात चाचपडत आहे. दिशाहीन होऊन व्यर्थ कार्यात धडपडत आहे. त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या द्रष्टव्यानुसार घडविण्यासाठी प्रशिक्षित प्रचारक निर्माण करण्याचे कार्य युद्ध पातळीवर केले गेले पाहिजे. त्यासाठी महानाग साक्यमुनि विज्जासनासारख्या सेमिनरी सर्वत्र स्थापन झाल्या पाहिजेत. बुद्धधम्माची ओढ असणाऱया बौद्ध आणी आंबेडकरानुयायांनी आता तरी आपले सर्व भ्रम आणि मतभेद बाजूला सारून या उदात्त कार्यात स्वत:ला झोकून दिले पाहिजे. नवा बौद्ध माणूस आणि नवा बौद्ध समाज घडविण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे. त्यातच सर्वांचे हित सामावलेले आहे.
भवतु सब्ब मंगलं!
- भदन्त विमलकित्ती गुणसिरी
- `धर्माशिवाय विज्ञान लंगडे आहे,
- विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे.'
- - अल्बर्ट आईन्स्टाईन (दि वल्ड अॅज आय सी इट)
0 टिप्पण्या