अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याचा महाराष्ट्रात सर्वच स्तरावून निषेध करण्यात येत आहे. मात्र याबाबत भाजपवाले कोणतेही आंदोलन न करता केवळ आव्हाडांच्या अनावधानाने झालेल्या कृतीकरिता रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा फुले यांचा तर चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवरायांबद्दल विधान केले तेव्हा कोणी आंदोलने केली याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. आपला उद्देश केवळ आणि केवळ विषमतावादी विचारसरणी पेरणार्या मनुस्मृतीला जाळणे हा होता असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा अंतर्भाव करण्याच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला. मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. यावर विरोधकांना आयताच इश्यू मिळाल्याने त्यांनी याचा पुरेपुर राजकीय लाभ घेण्याचे राजकारण केले आहे. सर्वच थरावरून जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यात येत आहे. मात्र छगन भूजबळ यांनी आव्हाडांची बाजू उचलून धरल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. खरे तर हा प्रकार अनावधानाने झाल्याचं सांगत आव्हाड यांनी माफी मागितली होती. असे असतानाही शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा अंतर्भाव हा मुद्दा बाजूला करीत भाजपने केवळ आव्हाड यांनाच धारेवर धरले आहे. त्यामुळे मुळ मुद्दा बाजूला होत कदाचित पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक मुलांना वाचायला मिळतील अशीही चर्चा आता महाराष्ट्रात रंगली आहे. असे असताना यावर भाष्य करताना आव्हाड म्हणाले, कोश्यारी जेव्हा महात्मा फुलेंबद्दल बोलले तेव्हा त्यांनी माफी मागितली का? तेव्हा कोण भाजपवाले गेले नाहीत. चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींबद्दल विधान केलं तेव्हा माफी मागितली का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
मी काल गेल्यावर मला खरा इतिहास कळला. ज्या कुटुंबानी बाबासाहेब आंबेडकरांना पाठींबा दिला तेव्हा सनातन्यांनी त्यांच्या घरांवर 10 वर्षे बहिष्कार घातला. बाबासाहेब जेव्हा रायगडावर गेले तेव्हा तिथल्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तिथे याचे साक्षीदार आहेत. मनुस्मृती जाळणार हे कळल्यावर सनातन्यांनी दम देत जागा देऊ नका असे धमकावले. जागा देणाऱ्या मुस्लिम व्यक्तीलाही त्यांनी विरोध केला. 97 वर्षांनी त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. त्यावेळी आमच्यकडून चूक झाली. गुन्हा दाखल झाला. मला फाशी द्या. मी मनुस्मृतीविरोधात जाणार. स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही, असंच मनुस्मृतीत लिहिलंय. छगन भुजबळ, जयंत पाटील,सुषमा अंधारे, दीपक केदारे हे म्हणतायत त्यांचा उद्देश काय आहे तो बघा. 185 किमी दूर जाऊ फोटो फाडायला मी मूर्ख आहे का? आम्हाला याच वाईट वाटतंय. गुन्ह्यांना घाबरुन दूर जाणारे आम्ही कार्यकर्ते नाहीत, असेही ते म्हणाले. बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्यासोबत आहेत. बाकीच्यांच्या प्रतिक्रियांशी मला काही देणंघेणं नाही.
जितेंद्र आव्हाडांवर टीका होत असताना त्यांच्या पक्षातील आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांनीदेखील त्यांची बाजू घेतली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील आव्हाड यांची बाजू मांडली आहे. मविआतील नेत्यांच्या पाठिंब्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, याची मला खूप गरज वाटत होती. आत्ता मला एकटं वाटणार नाही. अनावधानाने चूक झाली ताबडतोब माफी मागितली. पण मनूवादी आता मनूला माझ्यामागे लपवत आहेत ते मी होऊ देणार नाही. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या विरोध महाड पोलीस स्थानकात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली ३५ हून अधिक वर्षे सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांवरील निष्ठा आणि प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही. आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे. - जयंत पाटील (एक्सवरील पोस्ट)
, “जितेंद्र आव्हाड हे खूप चांगल्या भावनेने तिथे गेले होते. तिथे त्यांच्या हातून चुकून काहीतरी झालं. तो कागद फाडताना त्यांनी त्यावर कोणाचा फोटो आहे ते पाहिलं नव्हतं. त्याप्रकरणी त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली आहे. त्यामुळे आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. ते विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. मुळ मुद्द्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आमचं म्हणणं इतकंच आहे की, आपल्या शालेय शिक्षणात ममुस्मृतीचा चंचूप्रवेश नको.” - छगन भुजबळ
भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे. - जितेंद्र आव्हाड
---------------------------
0 टिप्पण्या