Top Post Ad

पर्यावरण दिन.... प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाचे आयोजन


    सूर्यापासून फेकल्या गेलेल्या वायूच्या धगधगत्या गोळ्यातुन पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४८० कोटी वर्षांपूर्वी झाली.  सुमारे ३८५ कोटी वर्षांपूर्वी पहिले सजीव, म्हणजे अतिसूक्ष्मजीव  अवतरले. नंतर तीन साडेतीनशे कोटी वर्षे पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचे राज्य होते. आपल्या कल्पनेतही न बसणारे, पृथ्वीवरील तापमान व वातावरणाचे टोकाचे बदल व  प्रतिकूलता त्यांनी पचवली. पृथ्वीवरील सजीव जैविक वस्तुमानाचा विचार केला तर त्यापैकी साधारण ८०% भाग हा सूक्ष्मजीवांचा आहे. दिसणाऱ्या सजीवांच्या २० कोटी व सूक्ष्मजीवांच्या सुमारे ४० कोटी प्रजाती काही वर्षांपूर्वी होत्या. हळू हळू मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपली प्रगती केली. मात्र आज त्याने इतकी प्रगती केली की तो पृथ्वीवरील इतर प्राणीमात्र, सूक्ष्मजीव इतकेच नव्हे तर निसर्गावर देखील मात करू लागला आहे. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचाच वापर करत जीवन जगत असताना निसर्गालाच आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न आजही मानवप्राणी करत आहे.  निसर्गाला आपल्या मर्जीनुसार वापरण्याचा परिणाम म्हणजे अवर्षण, अतिवृष्टी, महापूर, वादळे, वणवे, अन्न उत्पादनातील घट, भूस्खलन, सागरपातळीतील वाढीने भूभाग बुडणे,  बर्फाचे वाढते  आच्छादन इत्यादींचा कहर आज  होतांना दिसत आहे. १९६ देशांनी मानवजात वाचविण्यासाठी पृथ्वीचे सरासरी तापमान, उद्योगपूर्व  काळाच्या तुलनेत २° से ने वाढू नये, असा पॅरिस येथे केलेला करार अयशस्वी ठरला आहे. ऑगस्ट २०२० मधेच २° सें.ग्रे.ची वाढ नोंदली गेली आहे. सध्या  महासागर, दरवर्षी पूर्वीपेक्षा अधिक तापत आहेत, हे भयावह आहे. महासागर, पर्वत आणि ध्रुवांवरील बर्फाची वेगाने वाफ होत आहे. ही वाफ पृथ्वीवर अनियमित पद्धतीने विक्रमी स्वरुपात बर्फवृष्टी वा अतिवृष्टीच्या  स्वरुपात कोसळत आहे...हे हिमयुग येणे नाही. ही तापमान वाढ महाविस्फोटक बनत आहे. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस व बर्फवृष्टी हा त्याचा भाग आहे. त्याचा परिणाम आता संपूर्ण मानवजातीवर होत असल्याचे प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. हा सारा मानवजातीचा निसर्गावर अधिकार गाजवण्याचा परिणाम आहे.


त्यामुळे आज मानवाने जीवन की जीवनशैली, यात निवड करण्याची संधी संपुष्टात आली आहे. तरीही मोहाच्या पगड्यातुन मानवप्राणी बाहेर पडण्यास तयार नाही. तसेच याबाबत कोणीही गंभीर होतांना दिसत नाही. उलट विकास म्हणजे केवळ भौतिक सुख अशी व्याख्या करून पर्यावरणाचा ऱ्हास खुलेआम सुरु आहे. यामुळे येणाऱ्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. ज्याची सुरुवात झाली असून आज ती अनुभवत आहोत. भविष्यात तर ह्याचा अधिक भयावह प्रमाणात दुष्परिणाम नक्कीच होणार आहे. वातावरणातील वाढलेली उष्णता, प्रचंड प्रमाणावर जमिनीतील पाण्याचा अंधाधुंद उपसा, शहरी भागात पाण्याचा अत्याधिक वापर यामुळे जमिनीतील, नदी तलावातील पाणी कमी होऊन पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातील पिकांवर गदा येईल. ज्यामुळे नैसर्गिक जैवविविधता संपुष्टात येईल, वनस्पतींच्या अन्नधान्याच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊन जातील,
शेतीला पाणी न मिळाल्यामुळे शेती परवडणार नाही, दुष्काळी परिस्थितीमुळे शहरांकडे स्थलांतर वाढत जाईल., पाण्याच्या कमतरतेमुळे बॅगलोर प्रमाणे मोठी शहरं बकाल होत जातील,


अपुऱ्या पावसामुळे, अधिक उष्णतेमुळे, जंगलात वारंवार लागणाऱ्या आगीमुळे जंगलांचं क्षेत्र मर्यादित झालेलं असेल किंवा कदाचित ते नष्टही झालेलं असेल, समुद्रकिनारे सुरक्षित नसतील, डोंगरमाथे, थंड हवेची ठिकाणं वातावरणातील बदलामुळे तिथलीही सगळीच व्यवस्था खराब झालेली असेल.
 उष्णता वाढत असतांना A.C. चा आधार आपण किती दिवस घेणार. अल्पावधीत 45°C ते 49°C आणि 55°C ते 60°C पर्यंत पोहोचते. 56°C मध्ये तर जगणे अवघड होईल. अशा वेळी काय करणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे.  केवळ एप्रिल, मे महिना जीवघेणा, असह्य उन्हाळा, अवकाळी पाऊस, प्रचंड असं नुकसान याची चर्चा करून काय होणार आहे. इतकं सगळं स्पष्ट दिसून येत असतानाही याबद्दल गांभिर्याने विचार होत नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेली उष्णता अशीच वाढत राहिली तर पुढच्या काही वर्षात भयानक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवणार आहे. जर येणा-या काळात मनुष्यनिर्मित आपत्तीमुळे आरोग्यपुर्ण जीवनच जगता येणार नसेल तर भौतिक सुख निर्मितीचा उपयोग काय ?
वातावरणातील बदलाबाबत किंवा वृक्षारोपणाबाबत सगळं काही सरकार किंवा प्रशासनावर सोडून हात वर केले जातात. विकासाच्या आडून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कुठेतरी थांबवणे. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर विचार करण्याची हीच वेळ आहे. पर्यावरण, निसर्ग वाचवायचं असेल तर प्रत्येकांनी आता पुढे येणे गरजेचे आहे. निसर्ग आणि पर्यावरण वाचवण्याकरिता आपल्याला जे जे करण शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आपण एकजुटीने केल्या पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने झाडे लावणे, झाडे जगवणे, झाडांचे संगोपन करणे, झाडांची जंगल तयार करणे, घनदाटवन प्रकल्प उभे करणे, प्रत्येक ऑफिस, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, प्रतिष्ठान, दुकान परिसरात एक तरी झाड लावणे, ते जगवणे महत्त्वाचे आहे.  आज भारतभर ७00 कोटी झाडांची गरज आहे. झाडे लावायची तर आधीपासूनच तयारी करणे गरजेचे असते; कारण एक झाड पुरेसे वाढायला पाच ते सात वर्ष लागतात. पावसाळा येताच किमान दोन झाडे लावा, त्यांना व्यवस्थित वाढवा. येणाऱ्या काळात झाडे आपले पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवतील आणि आपल्याला आर्थिक व समृद्ध बनण्यास मदत करतील.

त्यासाठी इको फ्रेन्डली लाईफ या संस्थेच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या चार वर्षाच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात सहभागी व्हा...
भारतातील संपूर्ण राज्य सरकारे केंद्र सरकारने, संस्था, संघटना, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, सरकारी व निमसरकारी संस्था गृहनिर्माण संस्था व सर्वसामान्य जनता विद्यार्थी तरुण तरुणींनो या कृती कार्यात सहभागी व्हा स्वतःला व पुढच्या पिढीला तापमानाच्या व प्रदूषणाच्या महा संकटातून वाचवा जीवनमरणाचा प्रश्न समजून घ्या व मनापासून यात सहभागी व्हा...वाढत्या तापमानातून होणाऱ्या मृत्यूपासून देश सुरक्षित ठेवण्यास सज्ज होऊ या....

  • प्रत्यक्ष कृती कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०२४ पासून सुरु होत आहे. 
    पूर्वतयारीची कामे आजपासूनच सुरू करणे आवश्यक आहे 
  • सरकारी, निम सरकारी संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक वृक्षासाठी जागा निश्चित करून तेथे ३ × ३ फूट चा खड्डा खोदून शेणखत कंपोस्ट खत व पालापाचोळ्याने भरून ठेवणे. आवश्यक तेथे संरक्षक जाळी / कुंपण करणे (जागा निवड प्लॅनिंग प्रमाणे योग्य असावी जेणेकरून पुढे कधीही ते झाड काढावे लागणार नाही)
  • वरील घटकांनी फळझाडांची व इतर सर्व रोपे उपलब्ध करून द्यावीत तसेच ज्यांच्या नर्सरीज आहेत त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर रोपे उपलब्ध करून द्यावीत.
  • EFL (इको फ्रेंडली लाइफ) प्रतिनिधी प्रथम एका गावासाठी ही योजना राबवेल त्याचे व्हिडिओ फोटोशूट घेऊन मीडियाद्वारे प्रसारित करतील व त्याप्रमाणे संपूर्ण देशभर हा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सर्वांना घेऊन राबविण्यात येईल. चार वर्षे देखभाल करून प्रात्यक्षिकाप्रमाणे संपूर्ण फळझाडांनी भरलेला भारत आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येईल 
  • चला कृती करूया... आणि फळझाडांनी भरलेला समृद्ध भारत बनवूया..
पर्यावरणाचे रक्षण, स्वतःचे रक्षण 
एक व्यक्ती एक झाड प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने लावू, हा विचार अंमलात आणू.


---------------------

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय.
प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता.
झाडे_लावा_झाडे_जगवा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com