*बेटी बचाओ, बेटी पढाओ हा भाजपाची पोकळ घोषणा असून या घोषणेचा आणि महिलांबद्दलचा दृष्टीकोन यात जमीन अस्मानचा फरक आहे. भाजपाच्या राज्यात महिला अत्याचार वाढले, हाथरस, उन्नाव, मणिपूर येथील घटना व कुलदिप सेंगर, ब्रजभूषणसिंह ते प्रज्वल रेवन्ना प्रकरण हे सर्व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत पण देशाचे पंतप्रधान मात्र त्यावर बोलत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिलांच्या मंगळसुत्राची किंमत महत्वाची वाटते पण महिलांची किंमत महत्वाची वाटत नाही, असा प्रहार मुंबई काँग्रेस अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपाच्या महिला धोरणावर प्रा. वर्षा गायकवाड यांनी कडाडून टीका केली, त्या पुढे म्हणाल्या की, भाजपाच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई देशातील सुरक्षित शहर असा नावलैकिक आहे पण मागील ८-१० वर्षात या लौकिकाला काळीमा फासला गेला. मुंबईत रात्री महिलांना सुरक्षित वाटत नाही, लोकलमधून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे परंतु भाजपा सरकार महिला सुरक्षेवर लक्ष देत नाही. देशाचे पंतप्रधानच महिलांबाबत खालच्या पातळीवरची भाषा वापरतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. सोनियाजी गांधी यांचा एकेरी उल्लेख करुन निवडणुकीतून पळ काढला अशी भाषा वापरणे हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभत नाही. पंतप्रधानच जर महिलांबाबत पातळी सोडून बोलत असतील तर भाजपाच्या इतर नेत्यांबद्दल काय बोलणार? काँग्रेस पक्षाच्या ५ गॅरंटीमध्ये ‘महिला न्याय’ अंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला १ लाख रुपये, सरकारी नोकरीत महिलांना ५० टक्के आरक्षण, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करणे व काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जनसंवाद व पदयात्राच्या माध्यमातून त्यांचा प्रचार जोरात सुरु आहे. आज विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना संन्यास आश्रमातील आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी महेश्वरानंद गिरी जी महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर विलेपार्ले येथील श्री. स्वामी समर्थ महाराज मठाला सहकाऱ्यांसोबत भेट देऊन समर्थांचे कृपाशीर्वाद घेतले.
प्रबोधनकार ठाकरे उद्यानात मॉर्निंग वॉक व जनतेशी संवाद साधला, त्यानंतर गोकुळ कट्टा, रेल्वे स्टेशन जवळच्या रामकृष्ण हॉटेल येथे स्थानिकांची चर्चा केली, नंतर बुद्ध विहाराला भेट दिली त्यानंतर कुर्ला पश्चिम मधील बुद्ध विहाराला भेट दिली. सर्वेश्वर मंदिर ते इंदिरा नगर तसेच हरी मशिद ते बेल बाजार पदयात्रा काढली, या पदयात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मुंबई काँग्रेस प्रवक्ता आणि मिडिया समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली
0 टिप्पण्या