जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासाच्या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे. जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. या उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले होते. परंतु, जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
आज गुरुवारी पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. यामुळे सकाळी कामाला जाणार्या नागरिकांची तसेच शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला. यामुळे शहरातील पेढ्या मारुती रोड, वंदना बस डेपो जवळ पाणी साचले होते. जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर तसेच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षा चालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. नाले सफाईची काम योग्य रीतीने झाली नसल्यामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत., काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. कल्याण शहरात शिवाजी चौक, खडकपाडा, गांधारी, टिटवाळा आणि २७ गावातील अनेक भागात पाणी साचले आहे. अंबरनाथ, बदलापूरसह आसपासच्या भागात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझीम असलेल्या पावसाने अर्धा तासात जोर धरला. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला. कल्याण बदलापूर रस्त्यावर सकाळी पाणी साचले नसले तरी वाहतूक संथगतीने सुरू होती. मात्र धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने नागरिकांत समाधानेच वातावरण आहे.
मागील आठवडाभरापासून मोसमी पावसाची आगेकूच रखडली होती. पावसाचा जोरही कमी झाला होता. मात्र, आता अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात सहा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी पावसाने दहा जूनपर्यंत राज्यात वेगाने प्रगती केली. दहा जून रोजी मोसमी पाऊस जळगाव, अकोला, चंद्रपुरात दाखल झाला. पण, त्यानंतर बुधवारपर्यंत (१९ जून) मोसमी पाऊस तिथेच रेंगाळला आहे. आता मोसमी पावसाची अरबी समुद्रावरील शाखा जोर धरत आहे. अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे वेगानेकिनारपट्टीकडे येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस संपूर्ण किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत संपूर्ण किनारपट्टीला पुढील चार दिवस पिवळा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात प्रामुख्याने पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार आहे.
0 टिप्पण्या