विवेक विचार मंच-महाराष्ट्र संस्थेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही वर्षापासून सातत्याने ही परिषद आयोजित केली जाते. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा होतात. केवळ चर्चाच नव्हे तर त्या पुढील काळात त्या विषयांचा पाठपुरावा केला जातो. ज्यामध्ये गाव तिथे स्मशानभूमी यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आणि सरकारने याबाबत पुरक भूमिका जाहीर करत ती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. विवेक विचार मंच ही संस्था महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधान, सामाजिक न्याय व विविध वैचारिक विषयात प्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे. विवेक विचार मंच व सहयोगी संस्था संघटनांच्या माध्यमातून प्रतिवर्षी राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन केले जाते. या परिषदेमध्ये राज्यभरातून सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतात. भारतीय संविधानाला अपेक्षित सामजिक न्याय, समताधिष्ठित, बंधुभावपूर्ण समाजनिर्मितीच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले जाते.
या परिषदेमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांचे सामाजिक न्याय - हक्कांचे प्रश्न, सामाजिक तणाव तसेच अन्याय अत्याचाराच्या घटनांचा आढावा त्यावरील उपाययोजना यावर चर्चा व संवाद होतो. अभ्यासक मान्यवरांची दिशादर्शक भाषणे होतात. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काही ठराव या परिषदेत पारित केले जातात. अशी माहिती आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी दिले. यावेळी कोकण विभाग सह संयोजक जयवंत तांबे देखील उपस्थित होते.
समाजामध्ये सामाजिक न्यायाच्या व समतेच्या विषयात काम करणाऱ्या संस्था-संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांच्या सामाजिक कार्याता प्रोत्साहन मिळावे या हेतूने विवेक विचार मंच द्वारे प्रतिवर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते न्याय परिषदेत सन्मानाने प्रदान करण्यात येतात. यावर्षी ची राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२४ ही यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे दिनांक २३ जून, २०२४ (रविवार) रोजी संपन्न होत आहे. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणर्या चौथ्या सामाजिक न्याय परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून १६० संघटनांचे प्रतिनिधी व सामजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
राज्यातील दहा संस्था संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२४ पुरस्कर्त्यांची नावे जाहिर करण्यात आली. कोकण विभाग १. देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान, घाटकोपर, मुंबई, २. नितीन मोरे, जयभीम आर्मी, मुंबई., ३. कु.ज्योती साठे, दिशाज्योत फाऊंडेशन संस्था, मानखुर्द, मुंबई., ४. सत्यवान महाडिक, चवदार तळे विचार मंच, महाड, रायगड., पश्चिम महाराष्ट्र - ५. भीम प्रतिष्ठान, सोलापूर, ६. घनश्याम वाघमारे, पुणे., मराठवाडा विभाग, ७. संतोष पवार, लहू प्रहार संघटना, छत्रपती संभाजीनगर., ८. महावीर धक्का, जालना., विदर्भ विभाग - ९. मनीष मेश्राम, जिव्हाळा फाऊंडेशन नागपूर. १०. फकीरा सुदाम खडसे, वर्धा. यांना या वर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या