मुंबई शहरात अधिकृत व परंपरागत व्यवसाय असलेल्या पान विडीच्या दुकानात पोलीस प्रशासन व महापालिकेकडून होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरीत थांबवावी अन्यथा प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाने आज दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई शहर व उपनगरात जवळपास १५० वर्षाहून अधिक काळ सुमारे अडीच लाख व्यावसायिकांची पान, तंबाखूजन्य वस्तुंसह खाद्यवस्तू विक्रीचे दुकाने आहेत. या पिढीजात व्यवसायात जवळपास १० लाख कुटुंबाचा चरितार्थ चालत आहे. सुशिक्षित, बेरोजगार, नोकरी न मिळालेले अथवा नोकरी गमावलेले, निराधार/विधवा महिला आपल्या लहान-मोठया जागेत अल्प भांडवलात व्यवसाय करुन आपल्या मुलांचे व कुटुंबाचे पोषण, आरोग्य, शिक्षण, मंगलकार्य इत्यादी अनेक बाबींची पूर्तता याच व्यावसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून करत आहेत. मात्र पोलिस प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून वारंवार दुकानातील वस्तू जबरदस्तीने उचलून नेणे, व्यावसायिकाला, व्यापाऱ्याला दमबाजी करणे अशा प्रकारे कारवाईच्या नावाखाली त्रास देणे सुरु असते. या बाबी त्वरीत थांबवण्यात याव्यात असे याद्वारे आज आम्ही शासनास विनंती करीत असल्याचेही संघाचे अध्यक्ष शशांक राव यांनी स्पष्ट केले.
तंबाखुजन्य वस्तू, उत्पादन व विक्री संदर्भात अनेक कायदे व नियम आलेले आहेत. आम्ही व्यावसाचिक असलो तरी जे जनतेच्या हिताचे नाही त्या वस्तू विक्रीसाठी दुकानात ठेवत नसतो. परंतू, ज्या वस्तू केंद्र व राज्य सरकारने अधिकृतरित्या विक्रीसाठी प्रमाणित केलेल्या आहेत त्याच वस्तुंचा व्यापार आम्ही करत असतो आणि ते करत असताना कायद्यातील निवमांचे काटेकोरपणे पालन करत असतो. कारण आम्ही अधिकृत व्यापारी आहोत. शहरातील अनेक अधिकृत दुकानात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी घुसून तंबाखू, सिगारेटस्, तंबाखुजन्य वस्तुंवर कोणतीही लिखापढी न करता अथवा व्यावसाचिकाला कोणतीही पूर्वसूचना अथवा कारण न देता दुकानातील माल जबरदस्तीने घेऊन जात आहेत. याचा आम्ही निषेध करतो. कित्येक व्यावसायिकांची मुले / मुली नोकरीच्या प्रतिक्षेत अथवा प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत रोजंदारी स्वरूपात हातावर पोट असणाऱ्या छोटया- मोठचा दुकानांवर अशी कारवाई झाल्यास त्या व्यावसायिकाने काय करायचे ? मूळात अल्प भांडवल, अल्प कमिशन, १४ ते १५ तासांची मेहनत करून मुंबई पासून गादापर्यंत कुटुंबाचा गाडा चालवत असतात. अशा अधिकृत दुकानांवर कारवाई करणे म्हणजे त्या व्यावसाचिकाला उपासमारीच्या खाईत लोटण्यासारखे आहे. प्रशासनाच्या या कृत्याचा यावेळी संघाच्या वतीने निषेध करण्यात आला.
१) मुंबईतील ज्या विभागातील अधिकृत दुकानातील स्टॉक (माल) महापालिकेच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जोर-जबरदस्तीने नेला आहे अथवा जमा केला आहे तो त्वरीत त्त्वा दुकानदारांना परत करण्यात यावा. पुन्हा अशा अधिकृत दुकानांवर कायद्याचा बडगा दाखवून त्यांचा माल नेऊन व्यापाऱ्यांचे नुकसान करु नये.
२) वर्षानुवर्षे चालत असलेला हा व्यवसाय आरोग्य संरक्षणाच्या नावाखाली मोडीत काढून या उद्योगाशी निगडित असलेल्या ४० ते ५० लाख लोकांना उपासमारीच्या खाईत लोटू नये.
३) कायदे व नियम बनवताना अधिकृत संघटनेंच्या प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व मिळावे. व्यावसायिकाचे नुकसान होणार नाही, तो आपल्या रोजीरोटीपासून वंचित राहणार याची काळजी घ्यावी.
४) कायद्याचा दुरुपयोग करुन व्यावसायिकाला नाहक त्रास दिला जाऊ नये.
५) अधिकृत व्यापाऱ्याचे आर्थिक नुकसान करु नये. त्यांचा व्यापारी व नागरिक म्हणून त्यांचा मान-सन्मान ठेवावा.
६) नियमांचा व कायद्याचा बडगा दाखवून भ्रष्टाचाराला वाव देऊ नये.
या मागण्यांच्या संदर्भात सर्व आस्थापना व संघटनाची बैठक सरकारने त्वरीत आयोजित करून यामध्ये समन्वय साधावा अन्यथा मुंबईसह राज्यभरातील सर्व पान बिडी विक्रेते शासनाच्या चा अन्यायकारक कारवाई विरुध्द आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करतील असा इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला. या पत्रकार परिषदेकरिता शशांक राव, प्रकाश अडविलकर, नंदकुमार हेगिष्टे, संजय गांगण, सुभाष साबळे, हर्षद शेट्ये, संजय कोळवणकर, सचिन संसारे, सदेश शेरे, अशोक तेलंग, राजेंद्रकुमार बल्लाळ, प्रभाकर शेट्ये, विजय बिजम, महेन्द्र रेडिज, अविनाथ पाथरे, सुनिल डोळस, समीर नारकर, गोपीनाथ नारकर, रुपेश कोलते इत्यादींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या