मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात पुरेसा पाणी संचय अजून झाला नाही. 'अप्पर वैतरणा' जलाशय अजून कोरडा आहे. याला कारण पावसाचा अभाव आहे, असे शासन व महापालिकेला वाटते. परंतु दरवर्षी मान्सून अधिक बेभरवशाचा का होत आहे, याचा विचार नाही. फक्त मुंबईला पाणी पुरवणे एवढेच मान्सूनचे कार्य अभिप्रेत आहे असे दिसते. याच वेळी पंतप्रधान मुंबईत येऊन गोरेगाव- मुलुंड लिंक रोड योजनेतील भूयारांच्या निर्माण कार्याची आणि आॅरेंज गेट आणि ग्रँट रोड मधील जोड रस्त्याच्या बांधकाम निर्माणाची सुरूवात करणार आहेत. या बांधकामांचा संबंध पावसाचे वेळापत्रक मोडण्याशी आहे. पाऊस न येण्याचे किंवा कोणत्याही ऋतूत असाधारण वृष्टी होण्याचे कारण हवामान बदल आहे. या हवामान बदलाचे कारण औद्योगिक विकासामुळे पृथ्वीच्या तापमानात झालेली वाढ आहे. ही वाढ कार्बन डाय ऑक्साईड व इतर वायू आणि द्रव्यांच्या प्रमाणातील वाढीमुळे आहे. तापमानवाढीस कार्बन डाय ऑक्साईड वायू ९०% जबाबदार आहे.
या वायूच्या ९५% उत्सर्जनास मोटार व इतर स्वयंचलित वाहने, कोळसा जाळून तयार होणारी वीज आणि सीमेंट काँक्रिट जबाबदार आहे. याच प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड शोषणाऱ्या व जीवन विकसित करणाऱ्या हरितद्रव्याचा, जंगलांचा, डोंगरांचा आणि पाण्याचा नाश होत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री व इतर मंत्री देशभर जी उदघाटने व भूमीपूजने? करत आहेत, तीच मान्सून मोडण्यास, उष्माघातात हजारोंचे बळी घेणाऱ्या उष्णतेच्या लाटा आणण्यास, नेहमी येणार्या वादळांना, अवर्षणाला, दुष्काळांना, वणव्यांना, हिमनद्या कोसळण्याला, महापूरांना व समुद्राच्या आक्रमणाने किनारपटट्या बुडण्याला कारण आहेत. कार्बनने वातावरणात ४०० पीपीएम ही धोकादायक पातळी ओलांडल्यानंतर, वाढत्या कार्बनवर नजर ठेवणाऱ्या महत्वाच्या, हवाई विद्यापीठाने दहा वर्षांपूर्वीच जगातील तापमानवाढीमुळे शहरांच्या ओस पडण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याप्रमाणे सन २०३४ मधे मुंबई ओस पडेल. मात्र ज्याप्रमाणे अदाधुंद प्रकल्प आणले जात आहेत व आताची औद्योगिकरणामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात दर वर्षी होत असलेली ०.२ से ची वाढ पाहता त्याहीपेक्षा आधी मुंबई ओस पडेल.
कालच नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या रायगडमधील हजारो मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्या ३३ वर्षे झाली तरी पूर्ण केल्या नाहीत म्हणून धरणावर जाऊन नवी मुंबईचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक शहरे ही नुसती बांडगुळे नसून कॅन्सर आहेत. तो देखील तिसऱ्या अवस्थेत गेला आहे तरीही जनतेला त्याची जाणीव नाही. व्यसनासक्त माणुस व्यसन सोडण्याऐवजी मादक द्रव्याला पर्याय शोधतो तसे आधुनिक मानवजातीचे झाले आहे. आपला अंत जवळ आला आहे तरी भौतिक विकास आणि जीवनशैलीचे व्यसन सोडण्याऐवजी ती ऊर्जांचे व तंत्रज्ञानाचे पर्याय शोधण्यात मौलिक वेळ दवडत आहे.
- अॅड. गिरीश राऊत
- भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
- दू. ९८ ६९ ०२ ३१ २७
0 टिप्पण्या