Top Post Ad

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रपती शाहू बोर्डींगला भेट....२९ जुलै व्हावा ‘सत्कार्य दिन’

 


 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९२४  ला सातारा येथे सुरु केलेल्या छत्रपती शाहू बोर्डिंगला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. रयत शिक्षण संस्था जर खऱ्या अर्थाने कुठे कार्यन्वित झाली  असे म्हणायचे असेल तर ती साताऱ्यात.  स्वतःच्या घरात मोफत वसतिगृह सुरु करून बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी करुणा आणि कळवळ्याने काम करणारे कर्मवीर आत्ता स्वप्नात सुद्धा होणार नाहीत.  येथील धनिणीच्या बागेत  १९२७ पासून विविध जातीजमातीतील विद्यार्थी एकत्रित आणले गेले. कर्मवीरांनी समता,बंधुभाव ,स्वावलंबन, स्वाभिमान,प्रामाणिकपणा ,अहिंसा ,श्रमनिष्ठा , कृषीनिष्ठा, स्वाध्याय असे जे संस्कार केले तसे पुढच्या काळात कोणीही त्या कळकळीने काम केले नाही.या शाहू बोर्डिंगला १९२८ ला बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली ..तेंव्हा काय घडले  याची माहिती देणारा लेख.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ ला काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली हे आपणा सर्वाना ज्ञात आहे. सत्यशोधक चळवळीतून शिक्षण हीच समाजाला ज्ञानी बनवणारी व डोळस करणारी गोष्ट आहे हे त्यांना  समजले होते. जातीपातीचे प्रस्थ त्यावेळी  जास्त होते ,त्यामुळे अस्पृश्य लोकांना सवर्ण शिवून घेत नसत. माणूस असूनही अस्पृश्य  माणसाला माणूस म्हणून किंमत दिली जात नव्हती. या  काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाजकार्याची व शिक्षणाची प्रेरणा घेऊन कमी शिक्षण घेतलेले असलेले असतानाही समता,बंधुता,स्वातंत्र्य ,स्वावलंबन याचे आचरण करून  अनेक विविध जातीच्या मुलांना एकत्र करून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था उभारली .ती आजही मानवतेसाठी दीपस्तंभ आहे. दुधगाव ,नेर्ले ,काले या ठिकाणी वसतिगृहे सुरु करून मुलांना शिक्षण द्यायचे काम त्यांनी केले. ज्या काळात अज्ञान काळोख होता त्या काळात ज्ञानाच्या उजेडाचा कंदील गावोगावी जाऊन प्रकाश देत होता. साताऱ्यात १९२४ ला त्यांनी आपण भाड्याने  राहत असलेल्या घरी ४ मुलांना घेऊन वसतीगृह सुरु केले. मागास आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला शिक्षण देऊन त्यांनी विषमता दूर करण्याचे काम सुरु केले. सगळी माणसे समान आहेत आणि त्यांना समान अधिकार व हक्क मिळाले पाहिजेत ही सत्यशोधक विचारसरणी भाऊराव यांचे आयुष्य झाले. ग्रामीण समाजातील विविध जातीतील मुलांना एकत्र आणून  त्यांना शिक्षण देऊन त्यांच्यातील भेदभाव त्यांनी संपुष्टात आणला आणि स्वावलंबन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन कर्तबगार विद्यार्थी त्यांनी घडविले . याची सुरवात सातारा येथूनच झाली. आज १९२४ ते २०२४ अशी शंभर वर्षे शाहू बोर्डीगला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.  काले येथे रयत शिक्षण संस्था स्थापन झाली असली तरी सातारयात ती आणल्यानंतर  या शंभर वर्षात तिने कुठून कसा प्रवास केला हे सर्वांनी जाणून घ्यायला हवे . दुधगावच्या एका मोहिते नावाच्या महार मुलाला घेऊन हे वसतिगृह  सुरु केले. पाटखळ येथील शंकर कांबळे , कर्मवीर भाऊराव यांचा भाऊ बंडू ,दुधगाव हून आलेली नाना माने व तुकाराम माने हे चार विद्यार्थी घेऊन त्यांना सातारच्या सरकारी हायस्कूलमध्ये घातले .  १९२६ मध्ये ३४ मुले होती. मंगळवार पेठेतील शिर्के वाडा, भिडे वाडा भाड्याने घेऊन मुलांची सोय केली. सुरवातीस आपल्या पत्नीकडून फारसे सहकार्य होत नाही हे जाणवल्याने ते  स्वतः च्या पत्नीस रागावले .पुढच्या काळात त्यांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी सर्व वसतीगृहाची काळजी त्यांनी घेतलेली दिसते. १९२६ मध्ये त्यांचे सहकारी  गुरु मार्गदर्शक प्रबोधनकार ठाकरे यांनी वसतिगृहा मधील अण्णांचे कार्य  प्रबोधनच्या अग्रलेखातून  जनतेसमोर आणले. त्यानंतर त्याचे काम जिल्ह्याच्या बाहेर लोकांना माहीत झाले. हे अभिनव कार्य महात्मा गांधी यांना कळावे अशी भाऊराव अण्णा यांची  इच्छा होती. २५ फेब्रुवारी १९२७ ला गांधीजीनी या वसतिगृहास भेट दिली. सवर्ण आणि अस्पृश्य मुले एकत्र राहून शिक्षण घेतात ही गोष्ट पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कबुली दिली की जे मी साबरमती आश्रमात करू शकलो नाही ते तुम्ही करून दाखविले. साताऱ्यात विविध अशा चार ठिकाणी मुले राहत होती ती एकत्रित असावीत यासाठी कर्मवीरांनी १७ मे १९२७ ला धनिणीची बाग खंडाने घेतली. 

 हीच   धनिणीची बाग म्हणजे या सर्व मुलांची आधार झाली. इथेच कर्मवीरांच्या कमवा आणि शिका चा जन्म झाला. मुलांनी बाग स्वच्छ केली. विद्यार्थ्यांनी झोपड्या बांधल्या .शेकरल्या.कडेने गवताचा कुड घातला.जमीन बडवून तयार केली. शेणाने सारवली. त्यातच पेटी ,वळकटी सामान .बागेत दोन दगडी विहिरी असल्याने भाजीपाला मुले पिकवू लागली. जातीभेद विसरून मुले सहजीवन जगू लागली आणि स्वावलंबन शिकू लागली .शिक्षण घेऊ लागली. वसतिगृहात विद्यार्थ्यांना अण्णा पहाटे पाचला उठवत. आधी प्रार्थना मग अभ्यास..मुलांच्या प्रगतीची सतत चौकशी..संध्याकाळी वरच्या वर्गातील विद्यार्थी खालच्या विद्यार्थ्यांना शिकवणार. इंग्रजी,संस्कृत,गणित विषयाची तयारी.विद्यार्थी आळीपाळीने स्वतः स्वयंपाक करू लागले. गट पाडून जेवण तयार करणे ,म्हैशी राखणे,वसतिगृहात तालीम, बेंदूर सण,बैलांची मिरवणूक,साधी राहणी,निर्व्यसनी जीवन ,मोकळ्या जागेत खेळ,  मुलांना दुध मिळावे म्हणून अण्णांनी म्हैस आणली .वहिनीनी स्वयंपाक कसा नीट करायचा ते मुलांना शिकविले. जनावरांची काळजी घेतली जाई .असे हे वसतिगृह . स्वतः कर्मवीर कुटुंबासह एप्रिल २८ ला वसतिगृहात राहायला आले. असे  स्वावलंबी वसतिगृह त्या काळात  इतरत्र असणे मुश्कील. अशा वातावरणामुळे विद्यार्थ्यात जाणीव तयार झाली.अण्णांच्यामुळे स्वावलंबन व स्वाभिमान विद्यार्थ्यांच्यात आला. १९२४ ते १९३० पर्यंतचा  हा काळ म्हणजे कर्मवीरांच्या जीवनातील कसोटीचा काळ आहे.. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याच कृतीवर ते ठाम आहेत. इतरांच्या निंदेला महत्व न देता मुलांचे हितासाठी ते स्वतः व त्यांची पत्नी यांनी समर्पण केले आहे. इथेच संस्कारपीठ उभे राहिले आहे. अशा काळातच बाबासाहेब आंबेडकर लंडनहून शिकून आल्यानंतर अस्पृश्याच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. विद्येचा उपयोग कशासाठी करायचा याचा विवेक त्यांनी केला आहे. कर्मवीरानी फार शिक्षण घेतले नाही पण समाजात काय बदल व्हायला हवेत हे त्यांना सतत समाजात राहिल्याने कळले आहे. आपले मनाचा निश्चय करून ,निर्धार करून त्यांनी शिक्षण देणे हे जीवित कार्य मानले आणि अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी हिम्मतीने काम केले. 

 


      बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्यांसाठी चाललेले काम कर्मवीर यांना माहीत होते. साताऱ्यात २७ जुलै १९२८ ला बाबासाहेब साताऱ्यात आले होते. सत्यशोधक आचरेकर वकील यांचेकडे त्यांचा मुक्काम होता.  सातारा तालुक्यातील एका खेड्यातील महारांचा खटला २८जुलै तारखेला सातारा जिल्हा कोर्टात   अपिलात आला होता. तो  खटला चालवण्यासाठी ते सातारयात  आले होते. [ या खटल्याची माहिती मिळवण्याचा शोध सुरु आहे.] २८ ला सुनावणी झाली.  तो खटला त्यांनी जिंकला . असा उल्लेख चा.भं.खैरमोडे लिखित डॉ.भीमराव रामजी आंबेडकर या चरित्र ग्रंथाच्या  ५ व्या आवृतीत चौथ्या  खंडात पेज नंबर २९ वर आहे. त्यांना   भाऊराव पाटील यांनी स्पृश्य व अस्पृश्य मुलांना एकत्र जेवण देणारे वसतिगृह काढल्याचे कळाले . हे पाहण्याची ओढ त्यांना लागली . संध्याकाळी त्यांनी धनिणीच्या बागेत वसतिगृहास भेट दिली. तेंव्हा त्यांना स्पृश्य अस्पृश्य मुले एकमेकाच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसले आहेत .तसेच हे विद्यार्थी ज्वारीच्या भाकरी ,आमटी ,भाजी ,व चटणी वाढत आहेत हे पहायला मिळाले. हेच विद्यार्थी  पाळीपाळीने जेवण तयार करतात व स्वतः बाजारहाट करतात अशी माहिती भाऊराव पाटील म्हणजे अण्णा यांनी त्यांना सांगितली 

तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. भाऊराव यांनी त्यांना फराळाची व्यवस्था केली पण बाबासाहेब यांनी एक जोन्ध्ल्याची भाकरी व लसणीची चटणी मागून आनंदाने खाल्ली .भाऊराव यांनी समाज एकत्र करण्यासाठी हे जे कार्य हाती घेतले आहे त्याबद्दल त्यांनी भाऊराव यांना धन्यवाद दिले. शाहू बोर्डिंग संस्थेला त्यांनी २० रुपयांची देणगी दिली तसेच शेरे बुकात अभिप्राय लिहिला ‘ मी या  वसतिगृहाला  भेट देऊ शकलो याचा मला खूप आनंद झाला आहे. ही  एक  अद्वितीय अशी संस्था आहे .  जी व्यक्ती देशाच्या हिताचा विचार करते  त्या प्रत्येक व्यक्तीने   या संस्थेला पाठिंबा दिला पाहिजे . येथील  सर्व कामाचे  श्रेय माझे मित्र भाऊराव  पाटील यांना आहे. मी या संस्थेला 20 रुपये देत आहे’  असे लिहून त्यांनी २९ /७/२८ असा तारखेचा उल्लेख  केला आहे.  संदर्भाने झालेली ही भेट दोन महान माणसांच्या सुरुवातीच्या कार्यावर प्रकाश टाकते. कर्मवीरांचे कार्य जगात महान आहे. आज रयत शिक्षण संस्था जी उभी राहिली ,आणि प्रवास करत राहिली त्या मागे कर्मवीरांची प्रखर नैतिकता आणि अखंड बहुजन हिताचा ध्यास ,माणसे जोडून केलेल्या देशहितकारक कृती मला महत्वाच्या वाटतात. महान माणसाची मने किती मोठी असतात याचा प्रत्यय कर्मवीरांच्या कर्तृत्वातून येतो .

बाबासाहेब यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ ला झाले. ९ मे १९५९ ला  कर्मवीरांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी १५-२० दिवस अगोदर   स्वतः आजारी असताना पुण्यातून त्यांनी १४ एप्रिल १९५९ ला आंबेडकर जयंती दिवशी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष एम.के .मोरे यांना  पत्र लिहिले आहे. त्यात आंबेडकर यांचा उल्लेख ते  ‘बुद्धपदस्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ असा करतात. ते त्यांना युगपुरुष म्हणतात. ‘ बाबासाहेब यांनी अभूतपूर्व विद्वत्ता मिळविल्यानंतर समाजाची समस्या सोडवण्यासाठी ते मोठ्या मह्त्वाकांक्षेने पुढे आले. अन्यायग्रस्त  अस्पृश्य समाजात अपूर्व जागृती केली.स्वाभिमानाची ज्योत पेटविली .विषमता व अन्याय या विषयी मनस्वी चीड निर्माण केली. हे करताना त्यांच्यावर अनेक संकटांचे डोंगर कोसळले ,परंतु तत्वाच्या घोषणेने व दुर्दम्य आशावादाने त्या डोंगराची मातीमाती झाली. जीवनाच्या उत्तरार्धात पददलित वर्गास एक महान मार्ग देऊन त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. बौद्ध धर्म हा सत्य आणि अहिंसा व समतेचा धर्म आहे. या धर्मामुळेच अखिल दलितांची उन्नती होणार आहे’ असे सांगताना त्यांनी मृत्यूसमयी देखील बौद्ध धम्माने उन्नती होणार हा विश्वास व्यक्त केला आहे. हे त्यांचे चिंतन आज नीटपणे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. 

     कर्मवीरांना बाबासाहेब यांची विद्वत्ता विशेष वाटली. डॉक्टरांचा आदर्श घेऊन प्रत्येक तरुणाने आपला अभ्यास पूर्ण करावा असे कर्मवीर सांगतात. दलितांच्या मध्ये मुलांच्या तुलनेने मुली शिक्षणात मागे आहेत. मुलींच्या शिक्षणाची गैरसोय आहे. म्हणूनच बाबासाहेबांच्या मातोश्री यांचे स्मरणार्थ जून १९५९ पासून एक मुलींसाठी इंग्रजी शाळा आपण काढणार आहोत,आणि बाबासाहेब यांना ही संकल्पित योजना मी मागेच सांगितली होती असेही त्यांनी या पत्रात लिहिले आहे. बाबासाहेब यांना सांगितलेला शब्द कर्मवीरांनी आणि रयत शिक्षण संस्थेने पाळला आहे.  बाबासाहेबांच्या आई भीमाबाई आंबेडकर यांच्या नावे हायस्कूल  कर्मवीरांच्या निधनानंतर १९६० ला सुरु केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे पुण्याच्या ठिकाणी रयतचे कॉलेज आहे. कर्मवीरांच्या विशाल मनाचे आणि रयतच्या कृतज्ञतेचे हे दर्शन सर्वाना अनुकरणीय आहे.  बाबासाहेब यांचीही  आर्थिक स्थिती म्हणावीशी नसताना आपले स्वप्न कर्मवीर पूर्ण करत आहेत हे मोठे आणि अद्वितीय असे काम  आहे या जाणीवेने बाबासाहेब यांनी  देणगी दिली.  त्या  मागील भावना  लक्षात घेऊन वंचित ,उपेक्षित यांच्या हितकारी कार्याला पाठिंबा द्यायला उभे असले पाहिजे ही भावना निर्माण व्हावी म्हणूनच हा लेख . या दोन्ही महामानवांचे कामात आपण थोडे तरी वाहून घ्यावे ही माझी भावना आहे .

  • -प्रा. डॉ.सुभाष वाघमारे
  • प्रभारी संचालक ,भाषा मंडळ ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा
  • मोबाईल ९८९०७२६४४०  
  • २९ जुलै व्हावा  ‘सत्कार्य दिन’  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com