Top Post Ad

अभिनयातील भीष्माचार्य दिलीपकुमार


  ट्रॅजीडी किंग म्हणून ओळखले जाणारे  हिंदी चित्रपट सृष्टीतील भीष्माचार्य दिलीपकुमार यांचा आज तिसरा स्मृतिदिन.  तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ७ जुलै २०२१ रोजी दिलीपकुमार यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतच नव्हे तर संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. दिलीपकुमार यांच्या निधनाने अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठच हरपले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  दिलीपकुमार यांचा जन्म  ११ डिसेंबर १९२२ रोजी  पेशावर येथे झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. पेशावरहून त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. दिलीपकुमार यांच्यासह बारा भावंडे होते. त्यांच्या कुटुंबात पाहुण्यांचाही राबता होता त्यामुळे आपणही काही तरी काम करून घर खर्चास मदत करावी असा विचार करून दिलीपकुमार पुण्याला आले. तिथे त्यांनी लष्करी कँटीनमध्ये मॅनेजरचा सहाय्यक म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धात लष्करी कँटीनचे व्यवस्थापन बदलले आणि दिलीपकुमार जमा केलेले पाच हजार  रुपये घेऊन घरी परत आले. मुंबईला आल्यावर त्यांना पुन्हा नोकरी शोधावी लागली. 

दिलीपकुमार हे नोकरीच्या शोधात आहे हे त्यांचे परिचित डॉ मसानी यांना समजले तेंव्हा डॉ मसानी यांनी त्यांना माहीम येथील बॉम्बे टॉकीजच्या स्टुडिओमध्ये देविका राणी यांच्याकडे घेऊन गेले. देविका राणी यांनी दिलीपकुमार यांचे राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील पकड पाहून त्यांना महिना बाराशे रुपये पगारावर अभिनय करण्याची ऑफर दिली. वास्तविक हा प्रस्ताव दिलीपकुमार यांना मान्य नव्हता कारण चित्रपटात अभिनय करावा असा विचार त्यांनी कधीही केला नव्हता पण महिना बाराशे रुपये मिळतात ही रक्कम त्याकाळी खूप मोठी होती त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि देशाला एक महान अभिनय सम्राट मिळाला. देविका राणी यांनीच त्यांना दिलीपकुमार हे नाव दिले. १९४४ साली आलेल्या ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे दिलीपकुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात केली. १९४४ ते १९९८ पर्यंत म्हणजे सहा दशकापेक्षा अधिक काळ दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनयाने गाजवून सोडला. या दरम्यान त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. अंदाज,  राम और श्याम, आन, देवदास, आझाद, मुगल - ए - आझम, गंगा जमुना, नया दौर हे त्यांचे चित्रपट तर सुपरहिट झाले. या चित्रपटांनी तरुणाईला वेड लावले. 

१९५७ साली आलेल्या गंगा जमुना या चित्रपटातील मांग के साथ तुम्हारा...मैने मांग लिया संसार....या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. या चित्रपटात वैजयंती माला या त्यांच्या नायिका होत्या. चित्रपट रसिक त्यांच्या अभिनयाने इतके भारावले होते की त्याकाळच्या तरुणांचे ते आयडॉल बनले. देवदास या चित्रपटातील त्यांची भूमिका ही तर त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेचे नंतर अनेक अभिनेत्यांनी अनुकरण केले पण कोणालाही त्यांच्या अभिनयाच्या जवळपास पोहचता आले नाही. १९७६ साली आलेला बैराग हा चित्रपट त्यांचा नायक म्हणून शेवटचा चित्रपट ठरला या चित्रपटात त्यांनी तिहेरी भुमीका साकारली. 

त्यानंतर  काहीकाळ ब्रेक घेऊन त्यांनी मनोज कुमार यांच्या क्रांती या चित्रपटापासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शक्ती, विधाता, मजदूर, दुनिया, मशाल, कर्मा या चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका केल्या. सुभाष घई यांच्या सौदागर या चित्रपटात राजकुमार यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी चांगलीच गाजली. १९९८ साली आलेला किला हा त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट ठरला. या दरम्यान त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी दिलीपकुमार यांना आठ पुरस्कार मिळाले. भारत सरकारनेही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची योग्य दखल घेऊन पद्मभूषण, पद्मविभूषण या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरवले.  हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. पाकिस्ताननेही त्यांना निशान - ए - इम्तियाज या त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे.  दिलीपकुमार हे अभिनयातील भीष्माचार्यच होते.  त्यांचा सारखा अभिनेता पुन्हा होणार नाही. अभिनय सम्राट दिलीपकुमार यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 


  • श्याम बसप्पा ठाणेदार
  • दौंड जिल्हा पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com