नागपूर शहरात उमरेड परिसरातील हर्ष महेंद्र म्हैसकर या अकरावीच्या वर्गात शिकणार्या हुशार विद्यार्थ्याला, त्याने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवले म्हणुन पालकांनी मोबाईल घेऊन दिला. त्याला काही दिवसातच मोबाईल वापराचे व्यसन लागले. तो दिवस रात्र गेम खेळू लागला. त्यामुळे त्याचे अभ्यासात दुर्लक्ष झाले. त्यामुळे वडील रागावले म्हणुन त्याने टोकाचे पाउल उचलले. अशा प्रकारे एका होतकरू विद्यार्थ्याचा अंत झाला. ही अत्यंत दुःखाची आणि विचार करायला लावणारी घटना आहे. ह्याच संदर्भात गतकाळात "युनेस्को या जागतिक संघटनेने मुलांना शाळेमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी घालावी" अशी सूचना केली . त्याला जगभरातून पाठींबा व्यक्त करण्यात येऊन काही देशांमध्ये त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसते. परंतु ते अत्यंत अल्प प्रमाण आहे. अद्यापही जगभरातील बहुतांश देशांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही.
मग प्रश्न असा पडतो की, युनेस्कोसारख्या जागतिक संघटनेला ह्याची दखल का घ्यावीशी वाटली? गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागले असून त्यात मोबाईलने सगळ्यांचा ताबा घेतल्याचे दिसते. एरवी मोठ्या माणसांच्या हातात दिसणारा मोबाईल, करोना काळात शाळा बंद असल्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणुन ऑन लाइन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे मुलांच्या हातात फोन आले. तेव्हा त्याचा शिक्षणासाठी उपयोग ही झाला. परंतु करोना आटोक्यात आल्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या. परंतु तोपर्यंत मुलांना त्याची गोडी लागल्यामुळे त्याचा सातत्याने वापर सुरूच राहिला. त्याचा अतिवापर पालकांच्या लक्षात आल्यामुळे काही पालकांनी त्यांचे फोन काढून घेतले. त्यामुळे मुलांनी घरात थयथयाट केला तर काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. इतकी त्याची मुलांना चटक लागली आहे. खरे तर, वरील घटना ह्याच संदर्भात मोडते.
माणसाने बुद्धीच्या जोरावर आयुष्यात उपयोगात येणारे अनेक शोध लावले आहेत. त्यातील एक आहे मोबाईल. त्याने या माध्यामातून जग मुठीत सामावून घेतले आहे. त्यामुळे जगात कुठूनही, कुठेही संपर्कात राहण्याची सोय झाली असून व्हिडिओ कॉलमुळे संभाषण करता येते. तसेच प्रत्यक्ष परिस्थितीचे चित्रण करता येते. हे यंत्र लाभदायक असून त्याचा किती आणि कसा योग्य वापर करायचा हे वापरकर्त्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. आपण 40/50 वर्षांपूर्वीची परिस्थिती विचारात घेतली तर असे दिसून येते की, त्या काळात पोस्टाचे पत्र हे एकमेव संपर्काचे साधन होते. घरात दूरध्वनी असणे ही फक्त मोठ्या श्रीमंतांची मक्तेदारी होती. एखादा नातेवाईक, मित्र, किंवा इतर कुणाशी, कोणत्याही कारणामुळे संपर्क करण्याची गरज भासल्यास, प्रत्यक्ष भेटण्याला पर्याय नव्हता. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या वेळी एखाद्याच्या घरी जर पोस्टाची तार आली तर, त्यातील मजकूर वाचण्या अगोदरच घरात रडारड सुरू होई. कारण वाईट बातमीशिवाय कुणी, कुणाला तार करीत नव्हते. भारतात साधारण 80/90 च्या दशकात "वायरलेस दूरसंचार यंत्र" अर्थात पेजर विकसित होऊन, त्यामार्फत संदेश पाठविण्याची सोय झाली. त्याचं इतकं कौतुक होते की, पेजर वापरणारा ते इतरांना दिसेल अशा पद्धतीने दर्शनी भागावर लावत असे.
नंतरच्या काळात मोबाईल विकसित होऊन त्याने पेजरची जागा घेतली. त्यात सुरुवातीच्या काळात फक्त संभाषण करण्याची सोय होती. तो खूप महाग असल्यामुळे त्याचा वापर श्रीमंत लोक, उच्च सरकारी अधिकारी व मंत्री असे ठराविक लोक करीत. . त्याचा आकार ही तळहातापेक्षा मोठा होता. त्याचे मिनिटाला सोळा रूपये शुल्क आकारले जात असे. ते फोन करणे किंवा फोन आलेला फोन घेणे या दोन्हीसाठी आकारले जात असे. नंतरच्या काळात त्यात अनेक सुधारणा झाल्या. तसेच त्याचा आकार छोटा झाला. त्यात अनेक सोयी उपलब्ध झाल्या. त्यामुळे त्याचा वापर खुप वाढला. सध्याचा विचार केला तर, ह्या यंत्राने गरीबांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सर्वांचा ताबा घेतला आहे. आपल्याला शालेय जीवनापासून माणसाच्या अन्न ,वस्त्र, निवारा ह्या तीन मूलभूत गरजा असल्याचे शिकविले आहे. परंतु प्राप्त परिस्थिती विचारात घेतली तर त्या तीन मूलभूत गरजांमध्ये मोबाईलने देखील जागा पटकावली आहे असे जर मी म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही. इतके त्याचे माणसाला व्यसन लागले आहे. त्याचा वापर लोक भान हरपुन करतांना दिसतात. त्या नादात लोक रस्त्याने चालतांना हातवारे करीत बोलताना दिसतात. तसेच त्याy नादात रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे क्रॉस करतांना कितीतरी अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. कुणी गटारात पडतो तर कुठे मोबाईल चार्ज करतांना त्याचा स्फोट होऊन दुर्घटना घडते. कुणी रस्ता चुकतो तर कुणी चुकीच्या बसमध्ये चढतो. हल्ली अशा घटना नित्य घडताना दिसतात.
आपण जर ह्याच्या वापराचा विचार केला तर असे दिसून येते की, विकसित देशांमध्ये दर शंभर व्यक्तींमध्ये सत्यान्नव व्यक्ति ह्याचा वापर करतांना दिसतात. भारतातील शहरांमध्ये जवळपास तितकाच वापर होत असल्याचे चित्र दिसते. कदाचित ग्रामीण भागात त्याचे प्रमाण कमी असेल. ह्याचा अति वापर मुलांकडून होत असल्यामुळे त्यांचे खूप नुकसान होत आहे. परिस्थिती अशी आहे की, मुलं मित्रांशीच काय पण घरातल्यांशी देखील जास्त बोलत नाहीत. त्यांचा बहुतांश वेळ मोबाईल मधील गेम खेळण्यात जातो. त्याचा अभ्यासावर परिणाम झालाच आहे परंतु त्या नादात मैदानी खेळ विसरून गेले आहेत. त्यामुळे त्यांची मानसिक, शारीरिक वाढ खुंटली आहे. स्थूलपणा खूप वाढल्याचे दिसते. त्यांच्यात लक्षणीय प्रमाणात दृष्टीदोष उद्भवल्यामुळे कमी वयात चष्मा लागण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. त्याचाच परिणाम म्हणुन मुलांमध्ये चिडचिडेपणा, अभ्यासात दुर्लक्ष, एकलकोंडेपणा, अनावश्यक ज्ञान मिळणे ह्यात खूप वाढ झाली आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे की, पुढील काळात कान आणि डोळ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार अ आहेत.
ह्या छोट्याशा यंत्राने माणसाची अवस्था " जिथे जाई, तिथे तु माझा सांगाती. " अशी केली आहे. तो दिवसभर जवळ बाळगला जातोच परंतु रात्री देखील उशिरापर्यंत तो झोपमोड करून सोबत करतो. एव्हढेच काय स्वच्छतागृहात देखील तो पिच्छा सोडत नाही. इतका त्याचा लळा लागला आहे. आजची पिढी उद्याच्या देशाचे भविष्य असून आधारस्तंभ आहे. तेच जर मानसिक, शारीरिक दृष्ट्या कमकुवत होणार असतिल तर ह्या देशाचे भविष्य काय असेल? ह्याचा विचार संबंधितांनी भविष्यवेधी दृष्टीकोनातून आताच करणे गरजेचे आहे. असे मला वाटते. ह्या माध्यामातून मोठ मोठ्या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा फायदा होतो. तसेच सरकारच्या तिजोरीत कर रूपाने भरपूर निधी जमा होतो. परंतु त्यासाठी लोकांचे आणि विशेषकरून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचे नुकसान करायचे का? हा प्रश्न आहे.
तसे पाहिले तर हा प्रश्न देशापुरता मर्यादित नसून ही जागतिक समस्या आहे. म्हणुनच युनेस्कोने अशा प्रकारची सूचना केली आहे. त्यामुळे मला असे वाटते की, एकूणच ह्या क्षेत्राने घेतलेली उंच भरारी लक्षात घेता , ह्याच्या वापरावर कुठे तरी मर्यादा घालणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने वयाच्या अठरा वर्षांच्या आतील मुलांसाठी वेगळ्या फोनची निर्मिती करून त्यातील ज्ञान व करमणुकीच्या गोष्टी तसेच वापरण्याचा कालावधी ह्यावर मर्यादा आणणे आवश्यक आहे. सर्वांसाठी रात्रीचे प्रक्षेपण संपुर्णपणे बंद ठेवण्यात यावे. ह्यामध्ये असे ही करता येईल की, प्रत्त्येक मोबाईलच्या वापरासाठी दिवसभरातील किमान तासाची मर्यादा ठेवल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होईल.
- अरूण निकम.
- 9323249487.
- मुंबई.
- दिनांक...21/07/2024.
0 टिप्पण्या