मागील महिनाभरापासून मान्सून येणार की नाही या विवंचनेत असलेल्या मुंबई ठाणेकरांना अखेर आज वरूण राजाने छप्पर फाडके दर्शन दिले. मात्र नेहमीप्रमाणे या पहिल्याच जोरदार पावसामुळे मुंबई महापालिकेचे दावे फोल ठरले आहेत. जागोजागी पाणी साचल्यामुळे मुंबईकर हैराण झाले. मुंबई आणि उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी शिरलं असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. नेमेचि येतो पावसाळा आणि वाहतुकीची दैनावस्था करतो हा काही नवीन अनूभव आता राहिलेला नाही, असे मत अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक लोकल ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी पहाटे कामावर निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरातील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकावरही पाणी साचलं आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मध्य आणि हार्बर रेल्वेवर झाला आहे. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत. कल्याणहून येणाऱ्या गाड्यांना ठाण्यातच थांबवण्यात येत आहे. तसेच ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन पूर्णत: ठप्प आहेत. दुसरीकडे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना देखील बसला आहे. मनमाड येथून मुंबईकडे येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेस देखील वाहतूक रद्द करण्यात आली आहे. सध्या हळूहळू लोकलसेवा सुरू होत आहे. त्यामुळे स्थानकांवरील गर्दी कमी होत आहे. पावसामुळे इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी सबवे, वडाळा, शिवडी इथं पाणी साचल्यामुळं नोकरीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं. तसेच वाहतुकीची व्यवस्था लक्षात घेत त्यानुसारच प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काहींनी रस्ते मार्गानं अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्यामुळं एकच गोंधळ माजल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील नालेसफाईचा प्रस्ताव उशिराने मंजूर करण्यात आला. यावेळी उशिराने नालेसफाईची कामे हाती घेतली होती. १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला होता. मात्र मुसळधार पावसाने नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे यंदाही महापालिकेचे दावे पाण्यात वाहिले आहेत.
बीएमसीच्या मुंबई हवामान खात्यानुसार शनिवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात शहरात 16.55 मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व उपनगरात 21.96 मिमी आणि पश्चिम उपनगरात 26.35 मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान ३१.५ अंश सेल्सिअस तर किमान २६.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस नोंदवले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या मुंबई हवामान अद्यतनात म्हटले आहे की, शहराच्या किनारपट्टीला 7 जुलै रोजी दुपारी 12.41 वाजता आणि 00.25 वाजता उच्च भरतीचा तडाखा बसेल आणि भरती अनुक्रमे 4.48 मीटर आणि 3.81 मीटर इतकी असेल. नागरी मंडळाने पुढे जोडले की 6.49 वाजता सुमारे 1.75 मीटरची कमी भरती शहराच्या किनारपट्टीवर धडकेल. हवामान खात्याने शनिवारी पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला. हवामान एजन्सीने म्हटले आहे की प्रदेशांमध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ठाणे, नाशिक, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढे, आयएमडीने म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 10 जुलैपर्यंत मध्यम पाऊस पडेल, ग्रीन अलर्ट जारी केला जाईल. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणीपातळी काही इंचांनी वाढली आहे. 6 जुलै रोजी जारी केलेल्या बीएमसीच्या आकडेवारीनुसार, शहराला पिण्यायोग्य पाणी पुरवणाऱ्या मुंबईतील सात जलाशयांमधील एकत्रित तलावांची पातळी सध्या 10.88 टक्के आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला.मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.
मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे.* परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल. असे मुंबई महानगरपालिकेने कळवले आहे
0 टिप्पण्या