कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची 2024 ची निवडणूक संपन्न झाली आणि निकालही लागला. कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे महायुतीचे निरंजन डावखरे यांना १ लाख ७२१ मते मिळून त्यांचा विजय झाला. काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना अवघी २८ हजार ५८५ मते मिळाली व इतर ११ उमेदवारांचे डिपॉझीटही जप्त झाले. सुशिक्षितांचा मतदार संघ असलेल्या या मतदार संघात १ लाख ४३ हजार २५७ मतदान झाले होते. निवडणुकीत ११ हजार २२६ मते बाद झाली. ग्रामीण भागातील व काही ठिकाणी अशिक्षित मतदारांमुळे मते बाद होतात हा जुना अनुभव आहे. मात्र सुशिक्षितांची मते कशी बाद झाली याचा उलगडा कोणालाच झाला नाही.
सीईटी आणि नीट परिक्षांचे फुटलेले पेपर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचे समजते. दोन्ही घटनांमध्ये शिक्षकी पेशा बदनाम झाला असून याप्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आज एक पत्रकार परिषदेत ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी केली.मागील सात वर्षांमध्ये जवळपास 70 पेपर फुटलेले आहेत. यातील अतिशय अनेक महत्त्वाच्या परीक्षा आहेत. देशातील अनेक केंद्रातील शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा कर्मचारी यांचा या परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध येतो. पेपर फूटीमध्ये जसा काही शिक्षकांचा थेट संबंध आला तसा कोकण पदवीधर मतदारसंघात पैशांचा पाऊस पडला. काही शिक्षक आणि संस्था चालकांनी यात आपले हाथ ओले करुन घेतले असल्याचे समजते. पेपर फूटी आणि पदवीधर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.
खरच कोकण पदवीधर मतदानाचा पॅटर्न राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत वापरला जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ही विरोधी पक्षाला धोक्याची घंटा आहे. हा पदवीधर मतदार लोकशाहीचा नवा अध्याय आहे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जे शिक्षक देशातील उज्वल भविष्य असलेल्या युवा पिढीला घडवितात ते देखील या नव्या मंतदाराच्या अध्यायाचा भाग आहेत.यापुढे सर्वसामान्य, निष्ठेने काम करणार्या आणि निवडणूक लढू पाहणार्या व्यक्तीला खूप मोठा खडतर प्रवास आहे किंवा त्यांनी निवडणूक जिंकण्याची फार मोठी अपेक्षा बाळगू नये. हा एकप्रकारचा संदेश आहे.हा लोकशाहीचा खऱ्या अर्थानं नवा अध्यायाची सुरवात आहे.
0 टिप्पण्या