युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने विद्यार्थी शाळेत जो स्मार्टफोन वापरतात त्यावर बंदी घालावी अशी सूचना केली आहे. युनेस्कोच्या या सुचनेचे जगभर स्वागत होत आहे. युनेस्कोच्या या मतावर जगातील सर्वच शैक्षणिक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी सहमती दर्शवली आहे. वास्तविक आज जगभरातील २५ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोनवर बंदी घातली आहे मात्र अजूनही ७५ टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्मार्टफोन वापरास परवानगी आहे हे देखील सत्य आहे. स्मार्टफोनचा वापर मागील तीन वर्षात कितीतरी पटीने वाढला आहे. पूर्वी मोठ्यांचा हातात दिसणारा स्मार्टफोन आज शाळकरी मुलांच्या हातातही दिसत आहे. कोरोना काळात जेंव्हा शाळा बंद होत्या तेंव्हा स्मार्टफोन हेच शिक्षणाचे एकमेव माध्यम बनले होते त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल विकत घेऊन दिला. कोरोना काळात स्मार्टफोन द्वारे शिक्षक ऑनलाइन अध्यापन करत होते त्यामुळे स्मार्टफोन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला. कोरोना काळात जरी स्मार्टफोन हे शिक्षणाचे माध्यम बनले असले तरी त्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण हे किती प्रभावी ठरते हे ही जगाने पाहिले. कोरोना काळातच शिक्षकांचे महत्व अधोरेखित झाले.
स्मार्टफोन असो की संगणक शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही हेच त्यावेळी सिद्ध झाले. संगणक स्मार्टफोन हे केवळ साधन असून शिक्षकांची बरोबरी करू शकत नाही हे त्यावेळी संपूर्ण जगाने पाहिले. वास्तविक शिक्षणामध्ये संगणक, स्मार्टफोन यांचा चांगला वापर करून घेता येऊ शकतो. संगणक, स्मार्टफोन माहितीचा खजिना उपलब्ध होतो पण प्रत्येक वेळी स्मार्टफोनचा वापर करूनच अध्यापन केले पाहिजे असेही नाही. अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत संगणकाचा, स्मार्टफोनचा अतिरेकी वापर झाला तर अध्ययन - अध्यापन प्रक्रियाच निरस होईल. अध्ययन अध्यापन प्रकियेत आंतरक्रिया खूप महत्वाच्या असतात. विद्यार्थी - शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थी, विद्यार्थी - पालक, पालक- शिक्षक या आंतरक्रिया शिक्षण प्रक्रियेत खूप महत्वाच्या असतात. डिजिटल माध्यमात या आंतरक्रियांना वाव नसतो. स्मार्टफोन, संगणक यासारखे डिजिटल माध्यमे कितीही प्रभावशाली असले तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद घडवू शकत नाही म्हणूनच ए आय ( आर्टिफिशल इंटिलीजन्स ) किंवा कोणत्याही डिजिटल तंत्रज्ञानाकडे मानवासाठी सहाय्यक घटक म्हणूनच पाहिले पाहिजे.
शाळेत जर डिजिटल माध्यमाचा अधिक वापर झाला तर शैक्षणिक दर्जा ढासळतो हे ही युनेस्कोने आपल्या अहवालात सांगितले आहे. स्मार्टफोनचा जास्त प्रमाणात वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भावनात्मकदृष्ट्या नकारात्मक प्रभाव पडताना दिसत आहे.वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवायची असेल तर वर्गातून स्मार्टफोनला वर्गातून हद्दपार करावेच लागेल. विद्यार्थी जर वर्गात स्मार्टफोन आणत असेल तर ते सतत स्मार्टफोनवरच व्यस्त असतात. कोणाचे ऐकत नाही. सतत स्मार्टफोन वापरल्याने विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागते नव्हे आज अनेक विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागलेच आहे आणि त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत, आले आहेत. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण झाल्याचे आपण पाहत आहोत. स्मार्टफोनच्या व्यसनामुळे विद्यार्थी एकककोंडे होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये चिडकेपणा वाढला आहे.
मोबाईलचा अतिरेकी वापरामुळे विद्यार्थी हिंसक होत असून स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वाढला असून विद्यार्थ्यांना लहान वयातच चष्मा लागत आहे. स्नार्टफोनमुळे विद्यार्थी मैदानी खेळ विसरून गेले आहेत एकूणच स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण खुंटली आहे. किशोरवयीन मुले तर स्मार्टफोनचा गैरवापर करतानाच आढळतात. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांनी घेऊन दिलेल्या स्मार्टफोनचा वापर ते गेम खेळणे, व्हिडिओ बनवणे, रिल्स बनवणे, सोशल मीडिया, यु ट्यूब, वेबसिरीज पाहण्यासाठी करतात. एकूणच विद्यार्थ्यांच्या हातात असलेला स्मार्टफोन हा शिक्षणासाठी कमी आणि इतर गोष्टींसाठीच अधिक वापरला जात आहे त्यामुळेच शाळेतून स्नार्टफोन हद्दपार करा ही युनेस्कोची सूचना योग्यच आहे. शाळा, पालक आणि सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा.
- श्याम ठाणेदार
- दौंड जिल्हा पुणे
0 टिप्पण्या