देशाला सर्वाधिक महसूल आणि कर देणाऱ्या महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही भरीव तरतूद नाही. सत्तेला टेकू देणाऱ्या मित्र पक्षांच्या राज्यांसाठी छप्पर फाड पॅकेज जाहीर केले पण महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणात नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली असून भाजप सरकारचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा उघड झाला आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
अर्थसंकल्पावर बोलताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला भरघोस निधी देतात असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार जाहीरपणे सांगत असतात पण अर्थसंकल्पात तरी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेले नाही. महाराष्ट्राची कितीही उपेक्षा केली तरी त्यांना जाब विचारायची हिम्मत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये नाही. हे तिन्ही नेते फक्त राज्यातच गर्जना करत असतात पण केंद्र सरकारकडे राज्यासाठी भरीव निधी मागण्याची हिम्मत दाखवत नाहीत. मुंबई लोकलच्या मोठ्या समस्या आहेत, मुंबई व राज्यात केंद्र सरकारच्या शाळा, हॉस्पिटल्स, कॉरिडोर आहेत त्यांच्याबद्दलचा उल्लेख अर्थसंकल्पात असेल असे वाटले होते. महाराष्ट्रातील उद्योग बाहेरच्या राज्यात पळवून नेले आणि महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले. महाराष्ट्राचे जनतेने लोकसभेत भाजपाला धडा शिकवला पण त्यातून त्यांनी काही बोध घेतलेला नाही. महाराष्ट्राकडून मलई पाहिजे पण परत द्यायला मात्र नको. बिहारमधील नितीशकुमार व आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला म्हणून त्यांना झुकते माप दिले गेले मग गद्दारी करून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी भाजपा सरकार स्थापन केले म्हणून महाराष्ट्राला काय मिळाले. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी त्यांची केंद्रात काय पत आहे याचे जनतेला उत्तर द्यावे.
भाजपा सरकारची फक्त लाडका मित्र योजना जोरात सुरु आहे. धारावीची जमीन, मदर डेअरची जमीन, डंपिंग ग्राऊंड, महालक्ष्मीची जमीन, एमएसआरडीसीची जागा, दत्तक वस्त्यांचे कंत्राट, रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सर्व काही लाडक्या मित्राला दिले जात आहे. भाजपचा लाडका मित्र तुपाशी तर जनता मात्र उपाशी आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना शासकीय दर्जा मिळेल अशी अपेक्षा होती, बचतगटांना सक्षम करण्यासाठी भरीव गुतंवणूक नाही, महिलांसाठी नवीन योजनाही नाहीत.
कर्नाटक, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने ज्या योजना सुरु केल्या आहेत, राजस्थानातील काँग्रेस सरकारने ज्या योजना राबविल्या त्याच योजनांची नावे बदलून भाजपा सरकार योजना आणत आहेत. इंटर्नशिपची योजना ही काँग्रेसचीच आयडिया आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, १५ लाख रुपये देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू ह्या घोषणा जुमला निघाल्या आता या योजना तरी जुमला होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
केंद्रीय अर्थसंकल्पाने महाराष्ट्राची घोर केल्याने या महाराष्ट्रद्वेषी मोदी सरकारचा काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात निषेध व्यक्त केला.
0 टिप्पण्या