टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. या निमित्त गुरुवारी मुंबईमध्ये चॅम्पियन टीम इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यासाठी गुजरात मधुन विशेष बस मागविण्यात आली. तसेच वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्य सरकारतर्फे शुक्रवारी कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित असलेल्या सर्व आमदारांसमोर मराठमोळ्या पद्धतीने या खेळाडूंचा सत्कार झाला. वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅाफी, विधानमंडळाचे स्मृतीचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित मुर्ती, शाल आणि पुष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले. हा निधी कोणत्या खात्यातून जाहिर झाला आहे हे मात्र सांगण्यात आले नाही.
या यशासाठी भारतीय संघाला ICC कडून 2.45 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 20.42 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय, भारतीय संघाला प्रत्येक विजयासाठी स्वतंत्रपणे $31,154 (अंदाजे 26 लाख रुपये) मिळाले आहेत. ही सर्व रक्कम एकत्र केली तर भारतीय संघाने या स्पर्धेतून 22.76 कोटी रुपये कमावले आहेत. आयसीसीने 11.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 93.80 कोटी रुपये बक्षीसाची रक्कम म्हणून ठेवली होती, जी सर्व संघांमध्ये वाटण्यात आली. तर प्रथमच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या आणि या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 1.28 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 10.67 कोटी रुपये) मिळाले आहेत, जे चॅम्पियन संघाच्या बक्षीस रकमेच्या निम्मे आहे. याशिवाय 8 सामने जिंकण्यासाठी त्यांना सुमारे 2.07 कोटी रुपये वेगळे मिळाले. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतून एकूण 12.7 कोटी रुपयांची कमाई केली.
बीसीसीआयने संघासाठी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही बक्षीस रक्कम संपूर्ण संघाला देण्यात आली असून त्यात संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंचाही समावेश आहे. बीसीसीआयशिवाय आयसीसीनेही भारतीय संघाला सुमारे २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली आहे. १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम संघातील १५ सदस्य, ४ राखीव खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सुमारे १५ सदस्यांमध्ये विभागली जाईल. यामध्ये संघातील प्रमुख १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय सपोर्ट स्टाफ आणि उर्वरित ४ राखीव खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाऊ शकतात. खेळाडूंना त्यांच्या फीसह व्यावसायिक फी म्हणून पैसे दिल्यास, त्या रकमेवर शुन्य टक्के टीडीएस कापला जाईल.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या खेळाडूंचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंचा सत्कार करतांना त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि गणपतिची मुर्ती भेट दिली. मात्र सध्या महाराष्ट्रात विठ्ठल रखूमाई नामाचा गजर घुमत आहे. याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला असल्याची चर्चा मंत्रालय परिसरात रंगली होती. महाराष्ट्राची ओळख असलेल्या विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमा यावेळेस भेट देण्यात आल्या असत्या तर ते अधिक संयुक्तीक वाटले असते. अशी प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केली.
0 टिप्पण्या