अलीकडच्या काळात देशात उन्मादी वातावरण तयार झालेले आहे. काही संघटना धर्मांध होऊन कायद्याचा अनादर करत सर्वत्र हिंसक वातावरण तयार करीत आहेत. कधी कधी ते कायद्याला देखील जुमानत नाहीत अशी अवस्था झाली आहे. शिक्षण स्वतःचे आणि देशहितासाठी घ्यायचे असते हे संस्कार होत असूनही ,कोण जातीय धार्मिक हिंसा पसरवत आहे,त्याचा प्रत्येक भारतीयांनी शोध घेतला पाहिजे.सरकारने देखील या धार्मिक उन्मादी शक्तींवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली पाहिजे. समाजात भयमुक्त वातावरण निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी असते.आपण घेतलेले शिक्षण हे समाजाचे कल्याण करण्यासाठी आहे,ते विध्वंस करण्यासाठी नाही हे भान प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवले पाहिजे. भारतीय संविधानाच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. शांतता आणि सुव्यवस्था ठेवणे ही सर्वच नागरिकांची जबाबदारी असेल तर मग हिंसा कोण करते आहे ? शिक्षणाने अकुशल कर्मे न करता कुशल कर्मे केली पाहिजेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासून घरातच चांगले संस्कार केले तर ते देशाचे हित करतील. चांगल्या संस्काराच्या लोकांची देखील एकजूट बनून एक नैतिक शक्ती तयार होण्याची गरज आहे.
समता,स्वातंत्र्य ,बंधुता,न्याय या गोष्टी समाजात आणण्यासाठी अहिंसक आणि विचारी माणसे समाजात निर्माण करणे आवश्यक असते. पण आज शिक्षण घेतलेल्या मुलांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. वाईटाची संगत करण्यापेक्षा चांगल्याची संगत करावी. स्वतःचे,कुटुंबाचे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी दमदार शिक्षण घ्यावे, आयुष्यभर निर्व्यसनी रहावे, गुणवत्ता वाढवून देशातच नव्हे परदेशात देखील शिक्षण घेण्याची योग्यता निर्माण करायला पाहिजे.भोवताली धर्मांधता असेल तर वातावरण बिघडत जाईल म्हणून धर्मांधता नाकारून देशहितासाठी समाजमनात बुद्ध आंबेडकर रुजवूयात’ असे मत प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. २८ जुलै २०२४ रोजी कोडोली येथील बौद्ध विहारात १० वी व १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.गोरख बनसोडे हे होते. प्रा. रमेश जाधव,रा.वि.भोसले ,एजुकेशन मोटीव्हेटर अमित घोडके,उद्योजक विकास निकाळजे ,सेवानिवृत्त असिस्टंट रजिस्ट्रार हनमंतराव गायकवाड ,अप्पा कीर्तिकुडाव ,,संदीप गायकवाड,नितीन गायकवाड ,अविनाश गायकवाड ,राहुल जाधव ,सुनील साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.बुद्ध आणि आंबेडकर यांचा आदर्श सर्व माणसांना हितकारी कसा हे सांगताना ते पुढे म्हणाले की बुद्ध शील ,समाधी व प्रज्ञा यांच्या आधारे सदाचारी ,करुणाशील माणसे तयार करत असत. जीवन सुखी करायचे असेल तर निर्मळ मन हवे आहे. मन घडवेल तसा माणूस घडतो असे विचार ते सांगतात .बुद्ध कधीही हिंसेला उत्तेजन देत नाहीत. सर्वांचे मंगल होण्यासाठी एक चांगली आचारसंहिता त्यांनी दिली. वाईट न करता चांगले करत गेलो तर देश लवकर चांगला होईल , पण इथे विषमता भरलेली आहे .ही आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करणारे विचारी व निर्भय नेतृत्व इथे हवे आहे. बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून सर्वांचे हित केले. लोकशाहीचा मार्ग पुढे न्यायचा असेल तर व्यक्तिपूजा टाळली पाहिजे .हिंसा नको आहे. विधायक विचार आणि विधायक कृती हेच सर्वांचे धोरण असायला पाहिजे. पण इथे भ्रष्टता,हिंसा ,व्यसनाधीनता ,धाक आणि भीती ,या गोष्टी वाढत असतील तर नक्कीच सामाजिक स्वास्थ्य नीट राहणार नाही. बुद्ध आणि आंबेडकर या नेतृत्वाने कधीही कोणाचे नुकसान न करता न्याय आणि हितच केले,त्यामुळे सर्व माणसे सुखी करायची असतील तर शक्य तितक्या लवकर शिक्षणात शांतता ,सदाचार आणि न्यायासाठी विचार व कृती करणारे बुद्ध आंबेडकर हवे आहेत.वैज्ञानिक दृष्टीकोन हवा आहे.बाबासाहेब अनेक अडचणी असताना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन भारतातील सर्वांच्या न्यायासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग केला तोच हितकारी आदर्श सर्व मुलांनी घेतला पाहिजे,मधूनच शिक्षण सोडू नका,आयुष्यभर शिक्षण चालू ठेवा असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.गोरख बनसोडे म्हणाले की अभ्यास करण्याची सवय लावून घेतली पाहिजे .पालकांनी स्वतःच्या मुलाकडे सतत लक्ष देऊन चांगले शिक्षण दिले पाहिजे.बाबासाहेब यांच्यासारखे परदेशात जाण्याची वेळ आली तर जा पण पुन्हा परत येऊन आपल्या कुटुंबाची ,समाजाची देशाची काळजी घ्या असेही ते म्हणाले. प्रा.रमेश जाधव ,राहुल जाधव यांनी मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी वंदना,सूत्रपठण व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य वामन गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय विजय गायकवाड यांनी करून दिला. गुणवंत विद्यार्थ्यांना वही,पेन व एक झाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार बिपीन गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमास सर्व समाज बांधव,महिला भगिनी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशांत गायकवाड ,विक्रम गायकवाड ,सुशांत गायकवाड ,अमित गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या