स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून “राष्ट्र प्रेम” या विषयाशी संबंधित, भरारी प्रकाशनाच्या वतीने दरवर्षी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येते. गत वर्ष हे या उपक्रमाचे सातवें वर्ष आहे. या वर्षी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांगना, लेखिका लता गुठे आणि संचित संस्कृतीचे, लेखिका स्मीता भागवत अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. दिनांक 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला, उत्कर्ष मंडळ, विलेपार्ले येथे, विश्व भरारी फाऊंडेशनने, भारत विकास परिषद, विलेपार्ले शाखेच्या सहकार्याने च्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉ. उज्वला चक्रदेव, कुलगुरु अेस. अेन. डी. टी. विद्यापीठ यांच्या हस्ते तसेच आमदार अॅड. पराग अळवणी, लता गुठे, अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ लेखिका माधवी कुंटे, जयू भाटकर या मान्यवरांच्या उपस्थितीत, हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सूत्र संचालनची जबाबदारी स्मिता आपटे यांनी अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने सांभाळली. सायली वेलणकर यांनी सुमधूर आवाजात गणेश आणि शारदा वंदना सादर केली.
भारत विकास परिषद अध्यक्ष, अविनाश धर्माधिकारी यांनी “भारत विकास परिषद” या संस्थेच्या सामाजिक उपक्रमां विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात “जगणं आमचं” हा अत्यंत रंगतदार असा गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला गेला. माध्यम सल्लागार, निर्माता, दिग्दर्शक जयू भाटकर यांच्या मार्मिक प्रश्नांना वीरमाता अनुराधा गोरे, सिनिअर इन्सपेक्टर रेणुका बुवा तसेच लेखिका, प्रकाशिका लता गुठे यांनी उत्तरे दिली.
साता-यामधे समृद्ध बालपण गेलं. वाचन, परंपरा, भवतालाचा व्यक्तिमत्वावर परिणाम झाला. मुलगा कॅप्टन विनायक गोरे याच्या विरमरणाच्या आघातातून बाहेर येताना समाजाची साथ लाभली. “असंख्य विनायक तुझी वाट पहात आहेत” हे अनुराधा ताई काम करत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे शब्द परिणाम करून गेले. ग्रंथाली प्रकाशनाने लिहितं केलं. क्षितिजां मागून क्षितिजं उलगडत गेली. “संकटात मला अदृष्य शक्ती साथ देते. विनय हा सदैव बरोबर असल्याची भावना मनात आहे.” असं सांगून नवीन पिढीतील लहान मुलां बद्दल अनुराधा ताई, अत्यंत सकारात्मक बोलल्या. आत्ताची मुलं स्मार्ट झाली आहेत. बदलत्या काळा प्रमाणे नवी पिढी घडतेय हे सांगतानाच मराठी टिकवणे कठीण होऊन गेलंय. मातृभाषा दुरावली आहे असा खेद व्यक्त करत मुलांना जागृत करणं महत्वाचं आहे असं अनुराधा गोरे म्हणाल्या.
सोलापूर सारख्या छोट्या शहरातून पहिल्यांदा पोस्टिंगमुळे मुंबईत आले. घरची सामान्य परिस्थिती त्यामुळे कुणिही बरोबर नाव्हतं. आवडल्या कामात संधी मिळत गेल्या. दंगल, मृतदेह पाहून अस्वस्थ होऊन चालत नाही असं म्हणत त्यांनी २६ /११ च्या बॉम्ब स्फोटाचा प्रसंग सांगितला. उद्रेक, दुःख या भावनांना सामोर जाणं अवघड होतं. कामात प्रामाणिक राहिल्याने महिला म्हणून दुय्यम वागणुक कधीच मिळाली नाही. मिस्टरा बरोबर कधी संघर्ष झाला नाही उलट ते वेगळ्या क्षेत्रातले असल्याने घर संसारात मदतच झाली, नवीन पिढीला पोलिसात यायचे असेल तर त्यानी “ही नोकरी आवडीने करायची आहे, सवडीने करायची नाही.” हे लक्षात ठेवावं. या नोकरीत मानसिक शारिरिक फिटनेस अत्यंत महत्वाचा. अशा अनेक गोष्टी रेणुका मॅडमनी मना पासून व्यक्त होत आवर्जून सांगितल्या.
“विचारातली आक्रमकता तुमच्या लेखणीत दिसते तर मग लता नववी मधे लग्नाला सामोरी गेली तेंव्हा तिच्या मनाला काय वाटलं?” या प्रश्नाला उत्तर देतानां लतानी सांगितलं की त्यांचे वडील राजकारण, समाजकारण यात होते. घरात आध्यात्मिक वातावरण होतं. आजोबांनी लग्न ठरवलं, आजी म्हणाली की हे लग्न होतंय ते तुझ्या नशिबात काही चांगलं असेल म्हणुनच. हे लग्न झालं नसतं तर आज जी झाले ती झाले नसते. गुठेंनी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. अनुभव, अवलोकन यातून शिकले. नाईट स्कूल मधे शिकले. बी. अे ला इंग्लिश मधून पेपर दिले. बीअेड केलं. लिहू लागले. प्रकाशिका झाले. आता पीअेचडीची तयारी चालू आहे. मी संधी शोधत असते. करोनाच्या काळात ६५ पुस्तकं प्रकाशित केली. डिजिटल माध्यंमांनी कामं सोपी केली. मुलांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशान् चेरिलॅन्ड हा अंक काढला. मीच माझी गुरू आणि मीच शिष्य हे मनात ठेऊन काम करत असते. लता गुठे ह्याच्या बोलण्यातून समजलेली यांच्या कतृत्वाची ही “भरारी” श्रोत्यांना स्तिमित करणारी होती.
या गप्पाची सांगता करताना भाटकर म्हणाले माझा गाव रत्नागिरी, मी अजुनही गावाशी नातं ठेऊन आहे. माझे आई वडील हेच माझं मोठं विद्यापीठ. आईचे “लेकरा मोठा हो पण खोटा होऊ नको” हे शब्द लक्षात ठेऊन काम करत आलो, काम करत राहीन… अत्यंत संयुक्तिक प्रश्न विचारून हा गप्पांचा कार्यक्रम जयू भाटकर यांनी अत्यंत मनोरंजक, उदबोधक आणि रंगतदार पध्दतीने सादर केला.
आमदार अॅड. पराग अळवणी हे राजकारणा बरोबरच समाजकारणावर विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्व. लता गुठे यांच अभिनन्दन, कौतूक करून त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दात आपले विचार मांडले. देशभक्ती रोज जगण्याचा विषय आहे. प्रत्येकाला जे जमेल तसं समाजासाठी त्याने चांगलं काम करावं. १४ ॲागस्ट हा आपला फाळणी दिवस. त्या दिवशी सिंध प्रान्त पाकिस्तानात गेला. हा दिवस सिंधी समाजाची वेदना, व्यथा समजून सिंध रिमेम्बरन्स डे म्हणून लक्षात ठेवला गेला पाहिजे. असे महत्वाचे विचार मांडून त्यांनी लता गुठे यांना त्यांच्या पुढील पुस्तकासाठी “क्रांतीकारकांच्या घरच्यांच जीवन”, हा अेक विषय सुचवला. इतिहासाने क्रांतिकारकां बद्दल फार कमी माहिती दिली. स्वातंत्र्या नन्तर काही विशिष्ट लोंकां बद्दलचाच इतिहास सांगितला गेला अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. उज्वला चक्रदेव ह्या उत्कृष्ट वक्त्या आहेत. या कार्यक्रमात अत्यंत मोजक्या शब्दातले त्यांचे विचार हे “ घागर में सागर” असे होते. नव प्रकाशित पुस्तकांच्या शीर्षक तसेच विषयाच्या संदर्भात बोलून त्यांच महत्व त्यांनी अधोरेखित केलं. आधुनिक शिक्षण हे महिलांना आर्थिक सबलता देणारं आहे पण खरं शिक्षण हे अर्थकरीच्या पलीकडचं, युक्तकरी, मुक्तकरी असं असणं महत्वाचं आहे. शिक्षणातून चांगल्या व्यक्ती घडवायच्या असतील तर महिलांच कार्य, कतृत्व हे महिलां पर्यन्त पोचवलं पाहिजे. “ वेद” हा रिसर्चचा विषय आहे त्यातील घोषा तसेच अन्य ऋषिकांच योगदान फार मोठं आहे. त्याची माहिती थक्क करणारी आहे. विषय कुठलाही असो त्या विषयात पूर्वी झालेला अभ्यास दुर्लक्षून चालणार नाही. तो केला तर आत्ताचे सामाजिक प्रश्न सोडवायला त्याची मदतच होईल. नारी तू नारायणी हे नुसते घोष वाक्य न रहाता प्रत्येक स्रीने आपल्या परीने सामाजिक, राष्ट्रीय सभानता ठेऊन काम करायला हवं. डॉ. उज्वला यांच्या या संबोधनाने श्रोते भारावून गेले होते.
0 टिप्पण्या