बदलापूर आदर्श विद्यामंदीरात ज्या नराधम सफाई कर्मचाऱ्याने मुलींवर अत्याचार केला, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे आता पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्याने काय केलं, हे त्याला स्वत:ला माहिती नसल्याचेही म्हटले जात आहे. पोलिसांनी अशा पद्धतीने माहिती देणे हे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न चुकीचे आहेत. मी त्यादृष्टीने न्यायालयात युक्तिवाद करेन, असे असीम सरोदे यांनी सांगितले. वकील असीम सरोदे यांनी पीडित मुलीच्या वतीने वकीलपत्र दाखल केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना असीम सरोदे यांनी या प्रकरणी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. बदलापूर प्रकरणातील पोलीस तपासात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या चुकीच्या एफआयआरचा आरोपीला फायदा होत आहे. पीडित मुलींना न्याय मिळावा, अशी भावना आहे. त्यामध्ये काय अडथळे आहेत, हे समजून घेण्यासाठी इकडे आलो होतो. न्यायालयात आल्यावर पोलिसांचा तपास पाहून धक्काच बसला.
पोलिसांनी याप्रकरणात चुकीची कलमे लावली आहेत. पोलिसांनी पुरेशी माहिती न घेतल्यामुळे हे घडले, पोलिसांवर राजकीय दबाव आहे. पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांचे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही. वकिलांनी आग्रह केल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्रात कलम ६ चा अंतर्भाव केला. आता वकिलांनी पॉक्सोचे कलम ९ लावण्याची मागणी केली आहे, ते लावले जाईल. पोलीस FIRमध्ये नवीन कलमे लावली जात आहेत. ते पाहता लक्षात येत आहे की, पोलिसांनी नीट तपास केलेला नाही. असंवेदनशील पद्धतीने, पुरेशा माहितीअभावी तपास करुन FIR दाखल केला. पीडित मुलींना न्याय मिळाला नाही तर त्यासाठी पोलिसांनी दाखल केलेला चुकीचा FIR कारणीभूत आहे, असा आरोप असीम सरोदे यांनी केला.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कल्याणच्या जलदगती न्यायालयाने असे आदेश देण्यात आले आहेत. त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे. त्याला आधी 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा कोर्टात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण न्यायाधीश वी.ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानंतर आता आरोपी शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले. कोर्टात आज आरोपीला हजर केले होते. यावेळी कोर्टाने या प्रकरणात कलमांमध्ये वाढ केली आहे. कलम 6 आणि 21 वाढवण्यात आलं आहे. मागील सुनावणीत कलम 6 अॅड करण्यात आले नव्हते. मात्र यावेळी पोलिसांनी ते लावले आहे. कलम 6 अंतर्गंत आरोपी अक्षय शिंदेला कमीत कमी 20 वर्षे किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती वकिल प्रियेश जाधव यांनी दिली आहे. तसंच, या प्रकरणात शाळेची मुख्यध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आलं आहे. मात्र, ते सध्या ते फरार आहेत.
बदलापूरची घटनेसंदर्भात अहवाल आता प्राप्त झाला आहे. आता डिपार्टमेंटची याबाबत बैठक होइल आणि या अहवालावर आम्ही काय निर्णय घेऊ ते तुम्हांला सांगू. जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करु तसंच, पोलिसांना सर्व अहवाल सादर करू, तसंच, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली होती. आदिवासी शाळांवर नियंत्रण नसत ते शिक्षण विभागाकडे देण्यात यावे अस सांगितले आहे. तसंच, महिलांना शाळा व इतर ठिकाणी पॅनिक बटण द्यावे, याबाबतही चर्चा झाली. त्यामुळं ताबडतोब पोलिसांना माहिती जाते व त्याची ट्रॅकिंग सिस्टम आहे. हे डिवाईस नेटवर्क नसलं तरी चालते. हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्वितणे नियंत्रण येईल. हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवणार आहोत- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणारे पोलिसच या प्रकरणात कच खात होते. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून मनसेच्या स्थानिक नेत्या संगीता चेंदवणकर यांनी मोलाचा वाटा उचलला. पीडित मुलीला त्यांनीच धीर दिला. तसेच पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिस संथपणे चौकशी करीत होते. संगीता चेंदवणकर यांच्या मदतीला मग इतर महिला कार्यकर्त्याही पुढे सरसावल्या होत्या. त्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्या तरी त्यांनी आपला पक्ष बाजूला ठेवला आणि घडलेल्या प्रकाराविरोधात प्रशासनाला धारेवर धरले होते. पोलिस पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत करीत नव्हते. त्यावेळी संगीता चेंदवणकर आणि प्रियांका दामले या दोन कार्यकर्त्या त्यांच्यामागे भक्कमपणे उभ्या राहिल्या होत्या. मात्र या दोघींवर शाळेत तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बदलापुरकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
0 टिप्पण्या