मुंबई काँग्रेसने न्याय यात्रा सुरु करून दोन दिवस झाले नाहीत तोच भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या न्याय यात्रेची धास्ती घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपाच्या विखारी प्रचाराला जागा दाखवली आणि मुंबईसह राज्यात तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही, तरीही ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी भाजपा व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची अवस्था झाली आहे, भाजपाचे आशिष शेलार यांचा समाचार घेताना सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, यात्रा काढण्याचा काँग्रेसला अधिकार नसून यात्रेची मोनोपॉली भाजपाची आहे असा दावा शेलार यांनी केला आहे. प्रकांडपंडित श्रीमान आशिष शेलार यांचा अभ्यास फारच कच्चा आहे असे दिसते. महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० रोजी ब्रिटिशांविरोधात दांडी यात्रा काढून अत्याचारी ब्रिटीशांविरोधात आवाज उठवला होता. शेलारांनी इतिहास वाचलेला दिसत नाही.
दुसरे म्हणजे लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने आंदोलन करणे, यात्रा काढणे याचा अधिकार दिलेला आहे. काँग्रेसला यात्रा काढण्यासाठी भाजपाच्या परवानगीची गरज नाही. देशात एकाच उद्योगपतीची मोनोपॉली आणण्यासाठी भाजपा सरकारची धडपड सुरु आहे हे दिसतच आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ता आली तर खटाखट एक लाख रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने जाहिरनाम्यात दिलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसची आज सत्ता नाही पण सत्तेत आल्यास खटाखट पैसे देणारच. सत्तेत आल्यानंतर प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार. चीनला लाल डोळे करून दाखवणार अशी किती आश्वासने भारतीय जनता पक्ष व भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत दिली होती. या आश्वासनांचे काय झाले, याचे उत्तर आशिष शेलार यांनी आधी द्यावे.
खोटारडेपणात तर भारतीय जनता पक्षाचा हात कोणीही धरु शकत नाही. १० वर्षापासून सत्तेत असणाऱ्या भाजपाने केवळ एकाच उद्योगपतीला मुंबईसह देश विकाण्याचा सपाटा लावला आहे, त्या भाजपाला प्रश्न विचारण्याचा काही अधिकार नाही. लोकसभेला भाजपाचा रथ काँग्रेस इंडिया आघाडीने रोखला असून सध्या कुबड्या घेऊन भाजपा सरकार केंद्रात आहे. आता विधानसभा निवडणुकीत जनता आणखी एक धक्का देऊन भाजपाला घरी बसवणार याची भिती वाटत असल्याने आशिष शेलार यांनी मुंबई काँग्रेसच्या न्याय यात्रेचा धसका घेतला आहे, असा टोलाही राजहंस यांनी लगावला.
दरम्यान. मुंबई जोड़ों न्याय यात्रेचा मुंबईभर झंझावात सुरू आहे. मागील दोन दिवसात कुलाबा, अंधेरी, मुंबादेवी, वर्सोवा या भागातून पदयात्रा सुरू आहेत. या पदयात्रांचा धसका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. या पदयात्रांना परवानगी मिळू न देण्याचा प्रयत्न आता सत्ताधारी पक्ष करत आहेत. या न्याय यात्रेत कूपरेज ते कुलाबा या दरम्यान पदयात्रेत लोकांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न समोर येत होते. राहुल नार्वेकर यांना एका दिवसात ५० कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला. मात्र लोकांना पाणी नाही, रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे आणि सर्व नागरी सुविधांची प्रचंड अभाव दिसून येत आहे. त्यामुळे या ५० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात ‘पाणी' माफियांचे जाळे पसरले असून लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी पुरवठा महानगर पालिकेची जबाबदारी असताना या पाणी माफियांना आमदार नार्वेकरांचे संरक्षण आहे का असा सवाल खासदार प्रा वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. कुलाबा विधानसभा क्षेत्रात खुलेआम सुरु असलेले पाणी माफियांचे जाळे उध्वस्त झाले पाहिजे, कुलाबा येथील रहिवाशांना स्वतंत्रपणे पाण्याचे कनेक्शन दिले पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.
अंधेरीत तर भाजप आमदारच कमिशनसाठी विकासकामांना खोडा घालत असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. अंधेरीत सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र याबाबत स्थानिक आमदार निष्क्रिय असल्याच्या तक्रारींचे पाढे लोक वाचत होते. या रस्त्यांच्या अवस्थेने लोकांचे अपघात होत आहेत. गिल्बर्ट हिल, गावदेवी डोंगराचा काही भाग कोसळला. लोक जीव मुठीत घेवून रहातायत. लोकांच्या सुरक्षिततेसाठी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोकभाऊ जाधव यांनी 5 कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर करून घेतला. मात्र अमित साटम यांनी आकसाने हे काम होवू दिलं नाही. भाजप आमदार लोकांच्या जीवाशी खेळतोय, असा संतापही खासदार वर्षाताईंनी व्यक्त केला आहे. आंबोली धकुशेट पाडा तर कायम पावसाच्या पाण्यात असतो. इथली नालेबांधणी आणि इतर सुविधांसाठी नगरसेविका अल्पा जाधव यांनी 130 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. यातील केवळ 25 लाखांचं काम झालं आहे. 120 कोटीचा निधी हा रेल्वे अंडर ग्राउंड लाईन टाकण्यासाठी मंजूर झाला. पण कंत्राटदारांकडून कमिशन उकळण्यासाठी साटम यांनी देवेंद्र फडणविसांना सांगून हे काम रोखून धरलं. परिणामी हा सगळा परिसर साचलेल्या पाण्यात आहे. लोकांना मन:स्ताप होत आहे. रखलेल्या एसआरए प्रकल्पांतून बेघर झालेले, असुविधांमुळे त्रासलेल्या लोकांनीही या पदयात्रेत आपल्या व्यथा मांडल्या. फेरिवाल्यांच्या एका शिष्टमंडळानेही वर्षाताईंची भेट घेवून ‘फेरिवाला झोन’ नसल्याने आमदारांच्या गुंडांची दादागिरी सुरू असल्याचं सांगितलं. या हप्तेबाजीने नागरिक हैराण आहेतच, पण सर्वत्र बकाल अवस्था पहायला मिळतेय.
0 टिप्पण्या