येत्या २७ ऑगस्टला सर्वत्र बोगस दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. यासाठी सर्व गोविंदा पथके सज्ज झाली असून त्यांचा सराव देखील सुरू झाला आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसीएशनने अद्यापही गोविंदांना विमा कवच दिले नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोविंदांसाठी यावर्षी ७५,००० गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला आहे. परंतु १८ दिवस शिल्लक असताना अजून सुद्धा बालगोपाळांचे इन्शुरन्स काढण्यात आलेला नाही. शासनातर्फे २०२३ ला दहीहंडी समन्वय समिती यांच्या नावे जीआर काढण्यात आला होता तर २०२४ ला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या नावे जीआर काढण्यात आला असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सदर असोसिएशन ही कधी व केव्हा स्थापन केली हे देखील गोविंदा पथकांना माहिती नाही सदर असोसिएशन धर्मदाय आयुक्त इथे नोंदणीकृत करण्यात आली असून सदर चुकीच्या पद्धतीने नोंदणीकृत झाली असून आम्ही गोविंदा पथकाच्या वतीने प्रत्येक वेळी पत्रव्यवहार करून सुद्धा धर्मदाय आयुक्त जराही दाद देत नाही. त्यासंबंधी जर धर्मदाय आयुक्तांनी सदर रजिस्टर केलेली असोसिएशन ही तात्काळ रद्द करावी अशी मागणी दहीहंडी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यावर कायदेशीर कारवाई नाही तर येत्या दोन दिवसात धर्मदाय आयुक्त वरली इथे सर्व गोविंदा पथक आंदोलन करण्यात येणार असल्याचे दहिहंडी असोसिएशनच्या वतीने प्रसार माध्यमांना सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती देण्याकरिता आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष अरूण पाटील, सचिव कमलेश भोईर, प्रमुख सल्लागार गुरू गौरव शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अनेक दहिहंडी पथकाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दहीहंडी गोविंदा मंडळाचे प्रतिनिधित्व "दहीहंडी असोसिएशन" करत आहे. दहीहंडी उत्सव २०२३ साजरा करण्यात दहीहंडी असोसिएशनचा मोठा सक्रिय वाटा होता. गेली काही वर्ष आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्र सरकार दहीहंडी मंडळांचा व गोविंदांचा मोफत विमा करत आहे. त्याची सरासरी ३० ते ४० हजार गोविंदा होती परंतु आपल्या दहीहंडी असोसिएशनच्या स्थापनेनंतर सदर आकडा हा 1,00,000 एक लाखाच्या घरात गेला. दहीहंडी असोसिएशनने गेल्या वर्षी महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्य गोविंदा पथकापर्यंत आपल्या या योजनेची व्यवस्थितपणे नियोजन करून जवळजवळ 1,00,000 (एक लाख) गोविंदाना आपल्या महाराष्ट्र सरकारचे मोफत विमा कवच मिळवून दिला. मागील वर्षाचा अनुभव व यावर्षी सुद्धा दहीहंडी उत्सव 2024 मध्ये सामील होत असलेल्या गोविंदा मंडळांचा प्रतिसाद पाहता या वर्षी सुद्धा अंदाजे एक लाख गोविंदांचा विमा काढण्यात यावा व त्याची अंमलबजावणी करण्याची पूर्ण जबाबदारी ही दहीहंडी मंडळांची अधिकृत असलेले "दहीहंडी असोसिएशन" कडे देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असल्याचे दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष अरूण पाटील यांनी सांगितले.
तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य दही हंडी गोविंदा असोसिएशन या नावे जी संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. ती संस्था व पूर्वी नोंद असलेली संस्था यामध्ये समानता दिसून येत आहे. तसेच मा. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य है नाव वापरावयाचे असल्यास त्यास राज्य शासनाची परवानगी आवश्यक आहे. परंतु चौकशी केली असता अशी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नाही असे प्रथमदर्शनी दिसून येते. दहीहंडी असोसिएशन संस्था नोंदणी क्रमांक-८४६/२०२३ नावाने आधीच एक संस्था नोंदनीकृत असून वरील संस्था व नवीन संस्था यामध्ये समानता दिसून येते. तसेच महाराष्ट्र राज्य दही हंडी गोविंदा असोसिएशन हि संस्था काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा राजकारणातील बळाचा वापर करून नोंदणीकृत केलेली आहे. शासनाच्या विना परवाना महाराष्ट्र राज्य हे नाव वापरण्यात आले आहे. तसेच दहीहंडी असोसिएशन हे नाव एकसारखे दिसून येत आहे. राज्य शासनाची व देणगीदार तसेच समाजातील लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने वरील संस्था नॉदणीकृत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य दही हंडी गोविंदा असोसिएशन या संस्थेचे आर्थिक गैरव्यवहाराचे सर्व पुरावे व इतर माहिती धर्मादाय आयुक्तांना योग्य वेळी सादर करण्यात येईल. तरी महाराष्ट्र राज्य दही हंडी गोविंदा असोसिएशन या संस्थेचे नाव बदलण्यात यावे किंवा हि संस्था रद्द करण्यात यावी तसेच वरील विषयांचा न्याय निवाडा होईपर्यंत वरील संस्थेस नाव वापरण्यावर व काम करण्यावर बंदी करण्यात यावी. तसेच सर्व पदाधिकारी यांची चौकशी करून शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी देखील करण्यात आली असल्याची माहिती सचिव कमलेश भोईर यांनी दिली.
- दहिहंडी उत्सव मधील सहभागी गोविंदाना मानवी मनोरे रचताना अपघात/दुर्घटना होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. सन २०२३ प्रमाणे सन २०२४ मध्ये दहीहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ७५००० गोविंदांना खालीलप्रमाणे विमा संरक्षण देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत असल्याचे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
- अपघाती मृत्यू - रु.१०,००,००० (दहा लक्ष)
- दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास- रु.१०,००,००० (दहा लक्ष)
- एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास- रु. ५,००,००० (पाच लक्ष)
- कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व (permanent total disablement) रु.१०,००,००० (दहा लक्ष)
- कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व (permanent partial disablement) - विमा पॉलिसी मध्ये नमूद केलेल्य टक्केवारीनुसार
- अपघातामुळे रुग्णालयीन खर्च- प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (एक लक्ष)
(१) महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अपघातग्रस्त गोविंदांना सदर विमा सरंक्षण अनुज्ञेय राहील. याकरिता महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन, अंधेरी (पूर्व), मुंबई यांच्याकडून सराव व प्रशिक्षण असणाऱ्या, वयाची अट पूर्ण करणाऱ्या व प्रत्याक्षात भाग घेणाऱ्या गोविंदाची माहिती तपासून व प्रमाणित करुन विमा कंपनीस देणे आवश्यक राहील.
(२) गोविंदांच्या विमा संरक्षणाचा कालावधी हा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांनी संबंधित विमा कंपनीसोबत चर्चा करुन अंतिमतः निश्चित केल्यानुसार राहील.
(३) दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजक संस्थेने, सदर आयोजनाकरिता स्थानिक प्रशासनाच्या तसेच अन्य विहित प्राधिकारी यांच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक राहील.
(४) दहीहंडी आयोजनासंदर्भात मा. न्यायालय, शासन, स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा इ. कडून वेळोवेळी देण्यात आलेल्या/येणाऱ्या सूचनांचे/आदेशांचे पालन करणे आयोजक संस्था तसेच सहभागी गोविंदा पथकांना/संस्थांना बंधनकारक राहील.
(५) दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या संस्थेने, सहभागी गोविंदांच्या सुरक्षेविषयी आवश्यक सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्यात.
(६) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचण्यासाठी सहभागी झालेल्या गोविंदांना अपघात होऊन अशा गोविंदांचा मृत्यू/दुखापत झाल्यास, त्यांना विमा संरक्षण अनुज्ञेय राहील. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात / दुर्घटना झाल्यास सदर विमा सरंक्षण अनुज्ञेय असणार नाही.
(७) दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांबाबत मा. न्यायालयाच्या आदेशानुसार विहीत केल्यानुसार गोविंदांच्या किमान वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक राहील.
(८) दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याबाबत आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने आवश्यक ती कार्यवाही करावी.
(९) दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन तसेच संबंधित पोलिस यंत्रणा व महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन, अंधेरी (पूर्व), मुंबई या समितीकडे अहवाल सादर करणे आवश्यक राहील.
(१०) मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे एकविध खेळांच्या संघटनांनी विविध स्तरावर स्पर्धा आयोजित करणे व नियमावली करणे व त्या नियमावलीनुसार स्पर्धेचे आयोजन करणे अभिप्रेत आहे. त्याप्रमाणे दहीहंडी उत्सव स्पर्धा आयोजनाकरिता विविध स्तरावर या साहसी खेळांच्या संघटना स्थापन करणे व त्याद्वारे या साहसी खेळाचे नियम व अटी, स्पर्धापद्धती व उपक्रम याबाबत आयोजनासंदर्भात विस्तृत व स्वयंस्पष्ट नियमावली तयार करणे आवश्यक आहे.
(११) शासनामार्फत विविध क्रीडा संघटनांना स्पर्धा आयोजनाकरिता नियमानुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यासंदर्भात क्रीडा विभागाकडे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या स्पर्धेचे आयोजन सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन, अंधेरी (पूर्व), मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात यावे.
0 टिप्पण्या