गेल्या १० वर्षात भारतीय जनता पार्टी प्रणीत मोदी सरकारने देशपातळीवर मुस्लीम आणि मागासवर्गीयांच्या विरोधात संविधान विरोधी कृती कार्यक्रम आखलेला होता धार्मिक व जातिय तेढ निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करून मुस्लीम समाजाची प्रतिमा मलीन केली व त्याच बरोबर हिंदू- मुस्लीम तेढ निर्माण करीत मतांचे ध्रुवीकरण करून राजकीय लाभ उठविला. देशामधील अल्पसंख्यांक समाजाची धर्म, भाषा, संस्कृती आणि इतिहास संपविण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने सातत्याने होत आहे. या सर्व गोष्टींवर गांभिर्याने विचार करण्याकरिता तसेच राज्यातील मुस्लीम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्व, शिक्षण आरक्षण संरक्षणासाठी २५ ऑगस्ट रोजी मुंबईत राज्यव्यापी मुस्लीम विचार मंथन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
देशात २०१४ ते २०२४ पर्यंत मुस्लीम व दलितांचे १७७ झुंड बळीने खून करण्यात आले. गेल्या ३ महिन्यात साधारण ८-१० घटना झुंड बळीच्या झालेल्या आहेत. एकंदरीत या सर्व परिस्थितीचे आकलन व्यवस्थितपणे मुस्लीम समाजाला झाले. देशभरात इंडिया व महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीमागे लोकसभा निवडणुकीत धार्मिक गट, बिरादरी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांची एकत्रित मुठ बांधून प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडीला निवडून आणण्यामध्ये मुस्लिमांनी सिहांचा वाटा उचलला. देशात आणि राज्यात मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे. महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही आणि मुस्लीम विरहीत विधानपरिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आणली, याच्या तीव्र वेदना समाजाला आहेत.
राज्यात किमान ३५ मतदार संघ मुस्लीम बहुल असून त्याठिकाणी मुस्लीम उमेदवार दिल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठींब्यावर मुस्लीम निवडून येवू शकतात. त्यापैकी किमान २५ तरी विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीने विभागून घेवून मुस्लीम समाजाला द्याव्यात, अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याचबरोबर टप्प्या टप्प्याने आघाडीतील घटक पक्षाने एकत्रितपणे विधानपरिषदेच्या पर्याप्त जागाही मुस्लीम कार्यकर्त्यांना द्याव्यात. मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्तेतील वाटा, सन्मानजनक समानतेचा हक्क मिळणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाज महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा राहावा अशीच आमची भूमिका आहे.
त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांच्या शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्टपणे आपल्या जाहिरनाम्यात आश्वासन देण्यात यावे. गेल्या महिन्यात छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत विशालगड येथे मस्जिद व मुस्लिमांच्या घरांची सामुदायिक रित्या तोडफोड करण्यात आली. यापूर्वीही राज्यात खटाव, तासगाव, मायणी, वर्धनगड, इस्लामपूर, सातारा, सांगली, त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे मुस्लीम तरुणांना शुल्लक कारणावरून मारहाण करून काही ठिकाणी धिंड काढण्यात आली. हडपसर येथे मोहसीन शेख, पुसेसावळी नुरुल हसन शिकलगार, इगतपुरी येथे अन्सारी व कुरेशी अशा युवकांची राज्यात सामुदायिकरित्या झुंडीद्वारा हत्या करण्यात आल्या. त्याचबरोबर नाशिक, औरंगाबाद, अकोला, सोलापूर, नागपूर याठिकाणी द्वेषमुलक वक्तव्य करून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली. जात-धर्माची तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती पक्ष संघटनांच्या विरोधात महाविकास आघाडीने स्पष्टपणे भूमिका घेवून घटनांचा निषेध करून सनदशीर मार्गाने आंदोलने केली पाहिजेत, तरच राज्यातील मुस्लीम व मागासवर्गीयांमध्ये विश्वास संपादन होवून शांतता पूर्ण, भयमुक्त वातावरणात वास्तव्य करतील. मुस्लीम समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महाविकास आघाडी बरोबर सर्व ते प्रयत्न करून न्याय मिळवून देऊ.
या सर्व मागण्यांसाठी मुंबई येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी मुस्लिमांची राज्यव्यापी विचारमंधन परिषद मौलाना आझाद विचार मंच व मुस्लिम समाज कृती समितीच्या वतीने आयोजित करीत आहोत. याच प्रश्नावर राज्यभरात ठिकठिकाणी परिषदा आंदोलने आयोजित केले आहेत या सर्वांना आमचा क्रियाशील पाठिचा असून मी स्वतः काही ठिकाणी या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे. मुंबई येथील परिषदेसाठी मुस्लिमांनी गट-तट, राजकीय पक्ष व संघटना बाजूला सासरून प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही मौलाना आझाद विचार मंच व मुस्लीम समाज कृती समितीच्या वतीने करीत आहोत.- हुसेन दलवाई अध्यक्ष - मौलाना आझाद विचार मंच, माजी राज्यसभा सदस्य, उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
0 टिप्पण्या