Top Post Ad

धारावीच्या ५५० एकर जमिनीसाठी अदानीला मुंबईतील १५०० एकर मोक्याची जमीन

    भाजपा सरकारची सर्व यंत्रणा लाडक्या उद्योगपतीसाठी काम करत आहे. धारावीची जमीन अदानीला देऊन बीकेसी पार्ट २ करण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र आहे पण धारावीकरांना विस्थापित करून अदानीचे टॉवर धारावीत उभे करण्याचे मनसुबे कदापी यशस्वी होणार नाहीत. भ्रष्ट भाजपा सरकार आणि त्यांच्या लाडक्या मित्रांपासून धारावी व मुंबईला वाचवण्यासाठी सडक ते संसदेपर्यंत लढा देऊ पण धारावी सोडणार नाही, असा निर्धार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

 धारावी बचाव आंदोलनात भाग घेतल्यानंतर प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, धारावीची फक्त ५५० एकर जमीन असून त्याच्या नावावर अदानीला मुंबईतील १५०० एकर जमीन देण्याचा घाट घातला जात आहे, हा कुठला न्याय आहे?  अदानीसाठी मुलुंड जकात नाका, बीकेसी, कुर्ल्याची मदर डेअरीची जागा, मुलुंड जकात नाक्याची जागा, डंपिंग ग्राऊंडची जागा, मोतीलाल नगरची जागा, रेल्वेची जागा दिली जात आहे. कसलाही सर्वे नाही, ब्ल्यू प्रिंट नाही, नियोजन नाही, किती चौरस फुटाचे घर देणार याची माहिती नाही आणि ७ लाख लोकांना धारावीतून विस्थापित करण्याची चर्चा सुरु आहे, हा आकडा कसा आला? आता हा लढा धारावी बचाव नाही तर मुंबई बचाव झाला आहे. २०१४ पर्यंत अदानीला कोणी ओळखतही नव्हते पण त्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा अदानीसाठी काम करत आहेत. अदानीला मुंबईतील जमिनी देण्यासाठीच भाजपाने महाराष्ट्रातील मविआ सरकारही पाडले असे गायकवाड म्हणाल्या.

अदानी प्रश्नावर सरकारला प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उत्तर देत नाहीत. अदानीच्या पाठिशी राजकीय नेते व प्रशासन उभे आहे. पंतप्रधानांनाही यात जास्त रस आहे असे दिसते पण धारावीकरांच्या हक्काच्या घरासाठी हा लढा सुरु आहे, धारावीकरांना त्याच ठिकाणी घर मिळाले पाहिजे. धारावीत अदानीचे टोलेजंग टॉवर बांधण्याचा प्रयत्न आहे पण धारावीकरांची एकजूट असल्याने टेंडर पास होऊनही दिड वर्ष झाले तरी त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. हक्काच्या लढाईत कोणताही समझोता केला जाणार नाही, धारावीप्रश्नी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रश्न विचारु, असे प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com