Top Post Ad

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा' अभियान


  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत देशभरात 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक १३, १४ आणि १५ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईकर नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. तसेच दिनांक १३ आणि १५ ऑगस्ट २०२४ रोजी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात (वॉर्ड) तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या तिरंगा यात्रेतही मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.   यंदाच्या 'घरोघरी तिरंगा' राज्यस्तरीय अभियानाची दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरुवात झाली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही संपूर्ण मुंबई महानगरात तिरंगा रॅली, तिरंगा शपथ, तिरंगा यात्रा, तिरंगा मेळा,  मानवंदना सोहळा आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

 'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्टदरम्यान नागरिकांनी आपापल्या घरी तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २०२२ मध्ये नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करुन दिले होते. तसेच राष्ट्रध्वजांचा योग्य सन्मान करुन ते सुस्थितीत जपून ठेवण्याचे आवाहनही केले होते. नागरिकांनी यंदा त्यांच्याकडे सुस्थितीत असलेले ध्वज फडकवावे. ध्वज उपलब्ध नसल्यास जवळचे विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच मंडईंमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा मेळा’ मधून किंवा नजीकच्या टपाल कार्यालयातून तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर फडकवावा. तिरंगा ध्वज घरावर फडकवताना राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान राखावा. राष्ट्रध्वजावरील केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम स्वातंत्र्य दिनापर्यंत अर्थात १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईकरांनी राष्ट्रभावनेने 'घरोघरी तिरंगा' अभियानात स्वयंस्फूर्तीने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. राष्ट्रभक्तीच्या या अभियानाप्रती जनजागृती करण्यासह नागरिकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मुंबई महानगरात ठिकठिकाणी सेल्फी बूथ आणि नागरिकांच्या स्वाक्षरी प्राप्त करण्यासाठी कॅनव्हास लावण्यात आले आहेत. सेल्फी बुथवर उभे राहून नागरिकांनी सेल्फी काढून https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. तसेच कॅन्व्हासवर स्वाक्षरी करुन या अभियानाप्रती आपली भावना नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

 दरम्यान. महानगरपालिकेच्या सर्व २५ प्रशासकीय विभागांमध्ये तिरंगा यात्रेचे दिनांक ११ ऑगस्ट आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, चित्रपट कलाकार यांच्यासह मुंबईतील असंख्य आबालवृद्धांनी या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.   यात विविध विभागांतील नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, कलाकार, अधिकारी, कर्मचारी यांनीही सहभाग नोंदवला. यापूर्वी दिनांक ९ ऑगस्ट रोजीही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. आतापर्यंत मुंबईत ४७ तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.  राष्ट्रभक्तीच्या या अभियानाप्रती जनजागृती करण्यासह नागरिकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या सुमारे १०७० वाहनांवर 'घरो घरी तिरंगा' अभियान गीत वाजविण्यात येत आहे. त्या माध्यमातून या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच मुंबई महानगरात आतापर्यंत १३४ ठिकाणी सेल्फी बूथ आणि १०६ ठिकाणी नागरिकांच्या स्वाक्षरी प्राप्त करण्यासाठी कॅनव्हास लावण्यात आले आहे. सेल्फी बुथवर उभे राहून नागरिकांनी सेल्फी काढून https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. तसेच कॅन्व्हासवर स्वाक्षरी करुन या अभियानाप्रती आपली भावना व्यक्त नोंदवायची आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com