Top Post Ad

तिची जिद्द आणि तिचा मार्ग ....! पुजा खेडकर


  केवळ स्वप्न पाहून चालत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते.स्वप्नांना सत्यात उतरविण्याची जिद्द असावी लागते’ वगैरे वगैरे आपण शिकत आलेलो असतो, पण स्वप्नांना पूर्ण करण्याचा मार्गही फार महत्वाचा असतो! स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी लोकांची असते पण हे काहीही म्हणजे काही तरीच नसावं!  पुजा खेडकर! अखेर आयएएस पद गेलं!! त्याबाबत बहुदा सर्वांनाच आनंद झाला असेल!!! मला मात्र दु:ख झालं; एका मुलींचं आयएएस होण्याचं स्वप्न भंगलं, त्याचं दु:ख!!! त्यांनी निवडलेल्या मार्गाचं मात्र अजिबात समर्थन करता येणार नाही, त्या खोटेपणाबाबत किंवा भ्रष्टपणाबाबत त्यांना जी शिक्षा असेल ती झालीच पाहिजे या मताचा मीही आहे पण मी व्यथित झालो ते त्यांचं स्वप्न भंगल्याने!कुणाचंही चांगलं स्वप्न भंगलं की दु:ख होणे सहाजिकच आहे !  आपण मोठं होऊन काही तरी बनायचं असं स्वप्न उराशी बाळगून अनेक मुलं प्रयत्न करत असतात.अनेकांची स्वप्न पूर्णही होतात तर अनेकांच्या आड गरीबी,सामाजिक (अ)व्यवस्था, प्रशासकीय गाढवपणा,नैसर्गिक संकट आणि असंच काहीतरी आडवं येतं.दिल्लीतील कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या चार मुलांचं उदाहरण तर ताजंच आहे. त्यांच्या आड तर निसर्ग आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार आला.त्यातील एकाच्या स्वप्नाचा शॉक लागून कोळसा झाला तर तिघांच्या स्वप्नांचा गटाराच्या पाण्यात घुसमुटून चिखल होऊन गेला. ही मुलंही आयएएस बनण्यासाठी मेहनत करत होती !

पुजा खेडकर यांनी आएएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं, आणि ते पूर्ण करण्यासाठी अभ्यास केला, मेहनत घेतली, अनेक प्रयत्न केले, कदाचित दिवस-रात्र एक केली असेल. एकदा अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्द सोडून दिली नाही, सर्व पर्याय संपताहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला असावा असे सद्यातरी दिसत आहे. जिद्दीने एका मुलीला भ्रष्ट बनवलं!! मुळात त्यांच्या वडिलांचा यात मोठा दोष वाटतो. एक बाप म्हणून विचार केला तर आपल्या ‘लेकराची’ इच्छा पूर्ण करण्यासाठी एक  ‘बाप’ काय करु शकतो हेही या प्रकरणातून दिसून येत असलं तरी त्यांनी आपल्या मुलीला समजविले पाहिजे होते. स्वप्न पुर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करुन, आयुष्य घडविण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असल्याबाबत तिचे प्रबोधन करायला हवे होते. पण त्यांनी तिला ‘भ्रष्टाचाराचं बाळकडू’ पाजलं! शासकीय सेवेतील आपला ‘अनुभव’ कामी आणून त्यांनी हाती असलेल्या पैशातून मुलीसाठी स्वप्न विकत घेण्याचा मार्ग निवडला. हाच मार्ग पुजा यांच्या स्वप्नांना अशा भयानक पद्धतीने चक्काचुर करणारा ठरला। दिलिप खेडकर यांच्यातील भ्रष्ट मानसिकतेच्या माजी अधिकाऱ्याने एका प्रेमळ बापाला फसवलं आणि एका लाडक्या मुलींच्या तोंडाला काळं फासलं !

या प्रकरणात काय केवळ पुजा खेडकर किंवा त्यांचे वडिल दिलीप खेडकर हेच दोषी आहेत ? ज्यांनी पुजा खेडकर यांना खोटी प्रमाणपत्र दिली,ज्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करताना डोळेझाक केली,ज्यांनी कॅटने हरकत घेतल्यानंतरही आयएएस होण्याचा मार्ग खुला करुन दिला,ज्यांनी त्यांच्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविले ते सर्व सर्व दोषी आहेत.त्या सर्वांच्या पार्श्वभागावर लाथा मारुन हाकलून दिलं पाहिजे, (लाथ मारण्याची ताकद असलेला प्रामाणीक व नैतिक असला तरच हे शक्य आहे म्हणा!)यात युपीएससीपासून ते राज्यातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांपर्यंत जे कुणी सहभागी असतील त्या सर्वांचाच दोष आहे. चोराचे साथीदार चोरच ठरविले जातात. देशाच्या राष्ट्राध्यक्षापासून ते ग्रामपंचायतीच्या चपराशापर्यंत सर्वांची नियुक्ती हे कायद्याचं रक्षण करण्यासाठी असते, भ्रष्टाचाराला रोखण्याची व निमयांचं पालन करण्याची जबाबदारी जनतेने विश्वासाने त्यांच्यावर टाकलेली असते, त्यासाठी जनता टॅक्समधून पैसे देते व त्यातून या सर्वांचा पगार होतो.असे असतानाही जर एवढी मोठी यंत्रणा पूजा खेडकर यांची जिद्द पूर्ण करण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब साळसुदपणे करत असेल तर यंत्रणाच सडून गेल्याचे स्पष्ट होते.

मला या अनुषंगाने काही प्रश्न पडतात ते म्हणजे,अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांपासून ते अगदी युपीएससीतील संबंधीत बाबू-अधिकाऱ्यांपर्यंत कुणीही आपल्या कामाप्रती निष्ठा व नैतिकता जपली असती तर? दिलीप खेडकर व पुजा खेडकर यांना रोखले असते तर? एका तरी माणसाने चुकीचे काम करण्यास नकार दिला असता तर? एकाने तरी दिपील खेडकर वा पुजा खेडकर यांना भानावर आणलं असतं तर ? की या सर्व यंत्रणांमध्ये कुणीच प्रामाणिक नाही? कुणीच नैतिक नाही? सर्वच भ्रष्टाचारी आहेत? सर्व यंत्रणा आपल्याला हवी तशी वळविता येते याचा स्वविश्वास पुजा खेडकर किंवा त्यांच्या वडिलांना होता याचा अर्थ काय? यंत्रणेने ‘आपली बोली’ लावून ठेवलेली असावी असाच याचा अर्थ निघत नाही काय ? काय या यंत्रणेतील कुणावरही लहानपणापासून नैतिकतेचे संस्कार झाले नसतील ? काय शिक्षणातून नैतिकमुल्य पेरली जात नाहीत ?

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुढाकार घेईपर्यंत ही सर्व मंडळी ‘अळी मिळी गुप चिळी’ राहिली होती. हे प्रकरण त्यांनी प्रकाशात आणलं तेव्हा कुठे युपीएससीला जाग आली हे विशेष लक्षात घ्यायला हवं. पुजा खेडकर यांनी दिव्याच्या गाडीसाठी व केबीनसाठी मस्ती केली त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी फारफार तर गोपनिय अहवाल पाठवून दिला असता आणि त्यांची बदली केली गेली असती, (जशी वाशिमला करण्यात आली) व पांघरुन घातलं गेलं असतं (हे असं बदली करणं म्हणजे आपल्याकडची घाण दुसऱ्याच्या दारात टाकण्यासारखं असतं), पूढे जावून त्या जिल्हाधिकारी, राज्याच्या सचिवही झाल्या असत्या! पण विजय कुंभार यांनी हिंमत दाखविली, त्यांना माध्यमांनी साथ दिली. ही हिंमत साखळीतील एकाही अधिकाऱ्याने दाखविली असती तर दिव्याच्या गाडीतून ताठ मानेने जगण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या मुलीवर अपमानीत झाल्याने तोंड दडवून परागंदा होण्याची वेळ आली नसती. पुजा खेडकर यांच्यापेक्षा त्यांचा बाप आणि त्याला साथ देणारे यंत्रणेतील सर्वच जास्त जबाबदार आहेत ! बापाच्या कर्माची फळं पोरांना भोगावी लागतात ती अशी ! स्वप्नांच्या पूर्तीसाठी जिद्द बाळगली पण चुकीचा मार्ग धरला तर काय होते याचा यातून सर्वांसाठी धडा आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो योग्य मार्ग निवडतो तोच सन्मानास पात्र ठरतो,जो भ्रष्ट मार्ग निवडतो त्याची स्वप्न पूर्ण होतीलही पण तो पकडला जाताच त्याची छीं-थु होते, कधी कधी स्वप्न भंगून जातात, जसं पुजा खेडकर या मुलींचं झालं !!!

- संदीप बंधुराज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com