Top Post Ad

‘स्वच्छता ही सेवा’... मुख्यमंत्र्यांनी दिली स्वच्छतेची शपथ

केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालय, श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय सागरी किनारा दिनानिमित्त तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर  ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत जुहू समुद्रकिनारा येथे आज  २१ सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात  महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री. दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष. सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव  तन्मय कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली 

मान्यवरांच्या हस्ते यावेळी किनारा स्वच्छतेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.  राज्यपाल, मुख्यमंत्री  यांच्यासह मान्यवर, सामाजिक संस्था, विद्यार्थी,  महानगरपालिकेचे कर्मचारी आदींनी यावेळी जुहू किनाऱ्याची स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी बीच क्लिनिंग वाहनाचे सारथ्य करीत समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता केली. दरम्यान, जुहू चौपाटीवर सादर केलेले नुक्कड नाटक, स्वच्छता चित्रकला स्पर्धा आदी उपक्रमांच्या ठिकाणी मान्यवरांनी भेटी दिल्या तसेच उपस्थित नागरिकांशी संवादही साधला.
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान-लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे आश्वासक प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या सामूहिक कृतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल  राधाकृष्णन म्हणाले की, तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब आहे. सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच समुद्रात सोडले पाहिजे. तसेच समुद्र किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे, असे सांगून एकल वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानात महाराष्ट्र राज्याचे पूर्ण सहकार्य असेल, असेही राज्यपालानी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात ‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला आहे. राज्यात ४ हजार ५०० ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्याला ७२० किलोमीटर लांबीमध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी उत्तम प्रयत्न सुरु आहेत. महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत सखोल स्वच्छता मोहीम निरंतर राबविण्यात येत आहे. यामुळे मुंबईतील वायू प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे. पावसाळ्यानंतर ही मोहीम नियमित सुरू राहणार आहे. तसेच, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये महानगरपालिकेने दीड लाख झाडे लावली आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. शासनाच्या सर्व यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून हे शहर आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी जगभर जनजागृती अभियान राबविले जात आहे. देशात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून मिशन लाईफ या संकल्पनेतील स्वच्छ भारत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. ‘एक पेड मॉं के नाम’ या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी किमान एक झाड लावावे, असे आवाहनही यादव यांनी केले. पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या स्टार्टअपसाठी केंद्र सरकारमार्फत मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तर प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी समुद्र किनारा स्वच्छतेबाबत माहिती देऊन मुंबईतील सर्व चौपाट्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून स्वच्छ केल्या जात असल्याचे सांगितले तन्मय कुमार यांनी केंद्र सरकार मार्फत केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. ढाकणे यांनी या अभियानात सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com