भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीनतम पुतळा लोकार्पणानंतर अवघ्या ९ महिन्यात पडला, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला कधी नव्हे एवढा प्रचंड धक्का बसला आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी प्रचंड दुर्दैवी आहे. प्रत्येक शिवप्रेमी याबाबत संताप व्यक्त करीत आहेत. या घटनेमुळे राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांचाच पुतळा पडल्याने याबाबत आता सरकारच्या एकूणच कामाच्या बाबतीत लोकांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी पुतळ्याच्या बांधकामामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण साहित्याचा दर्जा, बांधकामाची पद्धती आणि त्याची देखभाल याबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रकल्पांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे, राज्य सरकारने मागील १० वर्षांत पूर्णत्वास नेलेल्या सर्व मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे सखोल लेखापरीक्षण करणे आज अत्यंत गरजेचे आहे. ते शासनाने विनाविलंब करावे अशी मागणी तरुण तगडा भारत या राजकीय पक्षाचे अध्यक्ष अशोक एन.जे.यांनी केली याबाबतीत अधिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज ९ सप्टेंबर रोजी ठाण्यातील शासकीय विश्राम गृह येथे तरुण तगडा भारत या पक्षातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
स्मृती स्मारकांच्या संदर्भातील मंजूर डिझाईन्स, वैशिष्ट्ये आणि गुणवत्ता मानकांनुसारच कार्यान्वित करण्यात आले होते याची पडताळणी करणे. स्मृती स्मारकांच्या बांधकामाशी संबंधित झालेला एकूण खर्च कोणत्याही विसंगती किंवा जादा खर्चाची उदाहरणे ओळखण्यासाठी प्रारंभिक बजेट वाटपाच्या तुलनेत या प्रकल्पांवरील एकूण खर्चाचे परीक्षण करणे . प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण झाले की नाही किंवा अवाजवी विलंब झाला हे निर्धारित करण्यासाठी प्रकल्पाच्या वेळेचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. बांधकामाच्या टिकाऊपणाचे आणि गुणवत्तेचे मूल्यांकन, विशेषतः पुतळ्यांसारख्या सार्वजनिक स्मारकांसाठी, सुरक्षितता आणि टिकाऊपणाच्या मानकांची पूर्ततेची खात्री करणे. खर्चाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि खर्च सुनिश्चित करण्यासाठी निधी, सामग्री, श्रम आणि इतर संसाधनांच्या कार्यक्षम वापराचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. अशा मागण्यां अशोक एन.जे. यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केल्या आहेत. असे लेखापरीक्षण केल्याने शासकीय अनियमितता, गैरव्यवहार किंवा सुधारक्षम क्षेत्रे ओळखण्यास मोलाची मदत होईल. शिवाय, पडलेल्या पुतळ्याच्या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय महानतेबद्दल सरकारने योग्य तो आदर सन्मान आणि त्यांचा प्रेरणादायी वारसा जपल्याचा संदेश देता येईल. या घटनेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे महत्त्व शेवटी तरुण तगडा भारतचे संस्थापक अध्यक्ष अशोक.एन.जे. यांनी विषद केले आहे.
भारतात अनेक ठिकाणी अनेक पुतळे आहेत सरदार वल्लभ भाई पटेल यांचा भव्य पुतळा तसेच आंध्र प्रदेश मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अति भव्य पुतळा आजही दिमाखात उभा आहे... आपल्या देशातल्या विविध राज्यातले मोठमोठे पुतळे कधी कोसळल्याचे ऐकिवात नाही मात्र महाराष्ट्राभिमानी तमाम जनतेत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असणाऱ्या अतिसंवेदनशील भावना आणि छत्रपतींना दैवत मानणारी महाराष्ट्रीयन जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या एका घटनेने दुखावल्याचे महापाप नेमके कोणी आणि का केले याचा संशोधनात्मक विचार जरूर झाला पाहिजे. कारण हा पुतळा लोकार्पणानंतर नऊ महिन्यातच कोसळला, ही छत्रपतींच्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी अस्मिता जपणाऱ्या माणसासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम अर्थातच त्या कामात झालेला भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराचा परिणाम आपण साऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि हे होत आहे छत्रपतींच्याच महाराष्ट्रात नेमका महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतच असा दुजाभाव का केला जातो आहे ? महाराष्ट्रातील महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीत हा भ्रष्टाचार हा दुजाभाव का आणि कोण करतो आहे , याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे असल्याचे मत सर अशोक यांनी मांडले.
लक्षात ठेवा शिवाजी नाव हे जर उलट केलं तर जीवाशी हा शब्द तयार होतो आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील ज्यांनी खायचं सोडलं नाही अश्या भ्रष्टाचाऱ्यांच्या जीवाशी आल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच महाराष्ट्रातील मराठी मातीची जाण असलेली आणि छत्रपती शिवरायांचा मान ठेवणारी जनता त्यांना याच मराठी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच भारतातील तरुणांनो आपण आणि फक्त आपणच जागरूक राहिलात तर आपल्या भारत देशात अशा घटना वारंवार घडणार नाहीत, असे आवाहनही देशातील तरुणांना सर अशोक यांनी केले आहे. सत्तेपासून तर प्रशासनापर्यंत सर्व सूत्र भारतातील तरुणांच्या हाती दिली तरच हा देश खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि प्रत्येकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. मात्र विद्यमान प्रस्थापित पक्ष हे तरुणांच्या हाती सत्ता द्यायला तयार नाहीत. जगात सर्वात जास्त तरुण भारतात तरीही तरुणांचै नेतृत्व नाही देशात असा परिस्थितीत देशाचा विकास होणे शक्य नाही. म्हणूनच देशातील एकूण तरुण वर्गाला ५० टक्के आरक्षण देण्यात यावे. प्रत्येक पक्षाने यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही सर अशोक एन.जे यांनी यावेळी केले.
0 टिप्पण्या