बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’ अशी मोठी होर्डींग लावण्यात आली. भगिनींचे रक्षण करणारा अशी प्रतिमा यातून दाखवली आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा वसई-विरार उपजिल्हाध्यक्षांसह तिघांनी नालासोपारा येथे एका 22 वर्षांच्या तरूणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. या अत्याचाराचीही जबाबदारीही देवेंद्र फडणीसांनी घ्यावी, आणि त्यांचाही एन्काऊंटर करून बदलापुरा करावे, नालासोपाऱ्यातील घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत निष्क्रिय व बेजबाबदार मंत्री ठरले आहेत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे पण गृहमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत.
‘बदलापुरा’ अशा होर्डींगवर राज्याच्या गृहमंत्री हातात पिस्तुल घेतलेला दाखवला आहे. मग हे पिस्तुल भाजपा पदाधिकारी भगिनींवर अत्याचार करतात तेव्हा कुठे जाते? तेव्हा बदला घेता येत नाही का? असे प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील भगिनींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, बदलापूरच्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांचीच मागणी होती पण या प्रकरणातील इतर आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय पीडित कुटुंबीयांना न्यायही मिळणार नाही. या संपूर्ण प्रकरणात लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बदलापूर शाळेचे विश्वस्त आपटे अजूनही फरार का? त्यांना संरक्षण कोण आणि का देत आहे? त्या व्यक्तीचा भाजपशी थेट संबंध असल्याने त्याच्यावर कारवाई न करण्याचा दबाव पोलिसांवर टाकला जात आहे का? बदलापूर शाळेचे CCTV फुटेज गायब का झाले? याला कोण जबाबदार? कोणाला पाठीशी घातले जात आहे? पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास उशीर का केला? त्यावेळेस त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही आणि या क्रूर गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. या गुन्ह्याचा निषेध करणाऱ्या नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
एन्काऊंटर प्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. चकमकीत अक्षयच्या डोक्याला गोळी लागली होती. या प्रकरणी न्यायालयाने सरकारी वकिलांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. सर्वसाधारणपणे अशा प्रकरणात पोलिसांकडून काय मार्गदर्शक नियमांचे पालन केले जाते? अशा घटनेत तुम्ही (पोलीस)आरोपीच्या डोक्याला गोळी मारता का? न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलेल्या या प्रश्नावर सरकारी वकीलांनी उत्तर दिले की, व्हॅनमध्ये अक्षयने पिस्तुल हिसकावली तेव्हा त्याच्या सोबत झटापट झाली. तेव्हा व्हॅनमधील दोन पोलीस चालकाच्या दिशने पळत गेले आणि पोलीस अधिकारी निलेश माने यांनी उत्स्फूर्त रिअॅक्शन दिली ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गोळी लागली. सरकारी वकिलांच्या या उत्तरानंतर न्यायमूर्ती चव्हाण यांनी आणखी काही प्रश्न उपस्थित केले. अक्षय शिंदे हा सामान्य व्यक्ती होती. त्याने ३ गोळ्या फायर करेपर्यंत पोलिस काय करत होते.
प्रशिक्षित पोलीस व्हॅनमध्ये असून देखील त्यांना नियंत्रण कसे मिळवता आले नाही. मागे चार पोलीस होते, मग एका दुबळ्या व्यक्तीला ते ताब्यात ठेऊ शकले नाहीत हे कसे शक्य आहे. ते देखील गाडीच्या मागील भागात आरोपीच्या बाजुला दोन आणि पुढे दोन पोलीस होते. पिस्तुलवर हाताचे ठसे असायला हवेत आणि हात धुतलेला असायला हवा. पुढच्या तारखेला सर्वकाही सादर करा, पोलिसांच्या म्हणण्यानुसार शिंदे याने तीन गोळ्या झाडल्या. पण एकच गोळी लागली. उरलेल्या दोन गोळ्या कुठे गेल्या? त्याने केलेला गोळीबार थेट पोलिसांवर होता की इकडे तिकडे केलेला, पोलिसाला कोणती दुखापत झाली आहे, छेद देऊन जाणारी की स्पर्श करून जाणारी, असा सवाल न्यायामूर्तींनी पोलिसांना केला आहे. हायकोर्टानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करत हे एन्काऊंटर होऊच शकत नाही असं म्हटलं. दरम्यान याप्रकरणी आजची सुनावणी संपली असुन पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी एन्काऊंटर प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल तसंच एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या सर्व पोलिसांचे सीडीआर सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, "पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरणार आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार आहे. ज्यामुळे भविष्यात भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आम्हाला आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे. त्यासाठी कुटुंबाचा हा प्रयत्न आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करुन ठेवू. म्हणून आम्ही दहन करणार नाही तर पुरणार आहे".
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या कारकीर्दीवर देखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या 20 दिवसांआधीच संजय शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटमध्ये बदली झाली होती. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये सामील होण्यासाठी यापूर्वी संजय शिंदे यांना विशेष शाखेत नियुक्त करण्यात आले होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेमुळे त्यांना पुन्हा आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आले आणि त्यानंतर अक्षय शिंदेच्या पत्नीने दाखल केलेल्या आरोपाचा प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून संजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. संजय शिंदे यांनी यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे देखील होते. संजय शिंदे यांनी यापूर्वी मुंबई पोलिसातही काम केले आहे.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर मुंब्रा बायपास वर ज्या ठिकाणी झाला. त्यापासून तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात मनसुख हिरेनला संपवण्यात आलं होतं, त्या घटनेमुळं चर्चेत आला होता. विशेष म्हणजे या संपूर्ण भागावर सीसीटीव्ही पाळत नाहीय. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याचं प्रकरण मार्च 2021 मध्ये घडलं होतं. त्या प्रकरणात मनसूख हिरेन मुख्य साक्षीदार होता. दरम्यान, या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे महत्त्वाचे आहे, कारण ते तपास आणि पुरावे गोळा करण्यात मदत करते. आम्ही यासाठी आधीच सरकारला एक प्रो पोस्टल पाठवले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
0 टिप्पण्या