नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चांगलाच गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रश्नावर आक्रमक झाले होते. दोषी अधिकाऱ्यांना तुरुंगात टाका, असे आदेशच दिले. परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात, खालचे निर्ढावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अद्यापही या प्रश्नावर ठाणे महानगर पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याचा प्रत्यय नुकताच लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत पहायला मिळाला. प्रथम दर्शनी ठाणे महानगर पालिकेने येथे अनधिकृत बांधकाम असलेले घर घेऊ नका असा बोर्ड लावला आहे. त्याच्या पाठीमागे चक्क निर्धास्तपणे अनधिकृत बांधकाम खुले आम सुरु आहे. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक जीव गेले आहेत, तरीही महापालिकेला जाग येत नसल्याने ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीच्या हद्दीत आई माता मंदिर समोर पालिकेने अनधिकृत बांधकाम असलेलेल घर घेऊ नका असा गेटवरच बोर्ड लावला आहे. गेटच्या आतमधे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरु आहे. पालिकेच्या सहा आयुक्तांनी या विशेष बांधकामास परवानगी दिली का असा प्रश्न येथील परिसरातील नागरिक विचारत आहेत. ठाण्यात अनधिकृत बांधकामे उभारण्यासाठी आणि वाचवण्यासाठी प्रती चौरस फुटाने पैसे घेतले जातात. याबाबत अधिकाऱ्यांवरही ठोस कारवाई होत नाही. हे आता काही नवीन राहिले नाही. नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असताना आणि दुर्घटनांची टांगती तलवार डोक्यावर असताना या बांधकामांवर ठोस कारवाई होणार की नाही? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. शहरात अनेक भागात अनधिकृत इमारतींची बांधकामे झाली असून काही सुरू देखील आहेत. पण खालचे निर्ढावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटीसा बजावतात आणि त्यांना पाठीशी घालत असल्याने सर्व सामान्य ठाणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे.
0 टिप्पण्या