'थंगलान' हा पा रंजिथचा सिनेमा पाहिला. कोलार येथील सोन्याच्या खाणीचा शोध घेणाऱ्या समूहाचा सिंधू संस्कृतीपासून ब्रिटिश वसाहती काळापर्यंतच्या संघर्षाचा, जीवन मरणाचा पट हा सिनेमा उलगडतो. इथे सोनं हे प्रतीकात्मक आहे. सोन्याचे रक्षण करणारे नाग आणि मातृसत्ताक मायावी देवी आरथी ही प्रतीकात्मक आहे. सोन्याचा खजिना आणि त्या खजिन्याचे रक्षण करणारा नाग किंवा नागीण हे आपल्या अनेक लोककथेत आपण ऐकलेले आहेत. हे सगळं मौखिक आहे. पण हे सोने, हे गुप्तधन आणि हे नाग आपल्या नेणिवेत दफन झालेले होते. त्याचे खोदकाम 'थंगलान' च्या माध्यमातून पा रंजिथ ने हाती घेतलेले आहे. म्हणूनच हा सिनेमा आपल्या नेणिवेला खिंडार पाडायचे काम करतो आहे. सोनं! आपल्याकडे दसऱ्याला सोनं लुटतात. या सिनेमातही सोनं लुटलं जातं. पण हे सोनं लुटलं जाताना शुद्रातिशूद्रांना युद्धात हरवून, ब्राह्मणी कपट करुन, गुलाम करून लुटलं गेलेलं आहे. हे सोनं लुटताना गोतम बुद्धाचे मुंडके छाटले गेलेलं आहे. बुद्धाचे शिर धडावेगळं करणे ही इथल्या शुद्रातिशुद्रांच्या पराभवाची खूण आहे. त्यामुळे हे सोनं म्हणजे नेमका काय पदार्थ आहे? असा प्रश्न केला तर आपल्याला हे लक्षात येते की, सोनं म्हणजे नुसते सोनं नाही तर ते स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रेम, अहिंसा, विनय, विद्या, सृजन आणि विश्वासाचे हे सोनं आहे. हे सोनं म्हणजे शोषित-पीडितांचे आत्मभानाचे सोनं आहे! त्यामुळेच सोन्याचा शोध आत्मभान आल्याशिवाय केवळ अशक्य आहे. थंगलानला आत्मभान आल्यावरच सोनं हाती सापडतं. त्याआधी जरी सापडलंच तरी त्याची क्षणात माती होते! तिथं मातृसत्तेची माया आरथी आत्मभान देण्याचं काम करते. आत्मभान आणि मुक्ती यांच्यातील द्वंद्वात्मक नातं या ठिकाणी लीलया उलगडत जातं.
'थंगलान'चा आणि त्याच्या समूहाचा सोन्याचा हा शोध म्हणजे एका अर्थाने मुक्तीचाच शोध आहे. अस्पृश्यता, जातिव्यवस्था, पितृसत्तापासूनची ही मुक्ती आहे. भौतिक आणि सांस्कृतिक शोषणापासूनची ही मुक्ती आहे. ही सर्व दुःखापासूनची मुक्ती आहे. ही मुक्ति हजारो वर्षे या भूमीत गाडल्या गेलेल्या गोतम बुद्धाला पुन्हा जमिनीतून खोदून बाहेर काढल्याशिवाय आणि त्याचे छाटलेले मुंडके परत जोडल्याशिवाय अशक्य आहे! त्यामुळेच या चित्रपटातील थंगलानचा मुलगा "अशोक" जो बुद्धाचे शिर पुन्हा जोडतो तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहे! आपल्या समाजाच्या आजच्या दुःखाचा ऐतिहासिक उलगडा करताना पा रंजिथ ही चर्चा जाणिवेच्या पातळीवरुन नेणिवेच्या पातळीवर नेण्यात यशस्वी झाला आहे. हा सिनेमा केवळ प्रतिमा आणि प्रतिकांच्या पातळीवर थांबत नाही; तर तो नेणिवेचा कोयंडा तोडून नेणिवेला प्रस्फोटित करून जातो. पा रंजिथ चे आत्तापर्यंतचे महत्वाचे चित्रपट काला, कबाली, सारिपट्टा आदींच्या पुढे जाऊन थंगलान जाणीव नेणीवेच्या तर्कशास्त्रापर्यंत झेप घेताना दिसतो. गुलामाला गुलामीची जाणीव करून देताना नेणिवेच्या घमासान उलाढाली करत 'थंगलान' दासप्रथा, सामंतीप्रथा, वासाहातिक समाजाच्या विविध अवस्थेतून आपल्याला गरागरा फिरवून आणतो. या सिनेमानं भारतातील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौतिक आणि राजकीय संघर्ष हा ब्राह्मणी-अब्राह्मणी आहे हे ठामपणे अधोरेखित केलेले आहे. भारतीय सिनेमाला या सत्याचे प्रतिपादन करायला शतकाहून अधिक काळ वाट पाहावी लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा "क्रांती आणि प्रतिक्रांती" ची थिअरी पा. रंजिथ यांनी आपल्या कलाकृतीत अत्यंत संवेदनशील पणे प्रवाहित केलेली आहे.
तत्कालीन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही विषमतावादी वर्णव्यवस्था आणि तिचा नित्पात केल्यावर उगवलेली जातिव्यवस्था पाहून बुध्दाने समतेसाठी मातृसत्तेकडे तोंड केले होते. असे कॉ. शरद पाटील यांनी म्हंटलेले आहे. त्याची प्रचिती थंगलान बघताना येते. थंगलान आत्मभान गमवतो, स्वाभिमान गमवतो. स्वातंत्र्य गमवतो. पण मातृसत्ताक आरथी मात्र "सोन्याचे" प्राणांतिक रक्षण करते. किंबहुना थंगलानला जागवण्याचा प्रयत्न करते. प्रसंगी त्याच्याशी झुंजते. त्यामुळे माया करणारी "मायावी" मातृसत्तेची नायिका आरथी आणि थंगलान यांच्यातील संघर्ष हा मातृसत्ता आणि पितृसत्ता यांच्यातील एक मूलभूत संघर्ष म्हणूनही पुढे येतो. आजच्या काळात स्वातंत्र्य समता आणि बंधुता निऋतीकडून का घ्यावी लागणार आहे? याचे उत्तर या ठिकाणी मिळते.
थंगलान आणि त्याच्या पूर्वजांच्या हातून भूमी जाते तसा आत्मसन्मान, अभिमानही जातो. त्यांचे स्वातंत्र्य जाते आणि त्यांचे रूपांतरण गुलामात होते. सिंधू संस्कृतीच्या विध्वंसनापासून आम्ही भूमी गमावत आलो ही खंत थंगलानच्या मनात खोलवर रुतलेली आहे. त्यामुळे हा भूमी संघर्ष एका प्रलंबित भूक्रांतीचे सूतोवाचही कथेच्या माध्यमातून करतो आहे. कर्मठ सामंती जातीव्यवस्था आमच्या आया बायांना अंगावर चोळी नेसू देत नाही पण वासहातीक साम्राज्यशाही ही तिचा स्वार्थ साधण्यासाठी आया बायांना चोळीचा आहेर द्यायला तयार आहे! भांडवलशाहीचे पुरोगामित्व म्हणावे!! परंतु ही साम्राज्यशाही सोनं सापडल्याची नुसती कुणकुण लागताच ते गिळंकृत करण्यासाठी जीवघेणा संघर्ष लादायला मागे पुढे बघत नाही. त्यामुळे 'थंगलान'ला ब्रिटिश साम्राज्यशाहीशी दोन हात करण्यासाठी त्याची नवजागृत समूहाची फौज घेऊन उभे ठाकावेच लागते.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितले होते की, ब्रिटिश आगमनाने शुद्रातिशूद्रांना, अस्पृश्यांना बंधविमोचनाची संधी निर्माण झाली. "थंगलान"च्या भाषेत सोनं शोधण्याची संधी निर्माण झाली. पण या शोधाच्या पोटातच ब्रिटिश साम्राज्याशी एका महान संघर्षाची बीजं देखील रोवली गेलेली होती. आमच्या आया बायांना चोळी देणं असो की 'थंगलान'ला साहेबाचा वेश परिधान करायला देणं असो, हे म्हणजे साम्राज्यशाहीच्या हातातील अमृताचा प्याला हेंडकाळल्यावर जे शिंतोडे उडाले होते त्याचा तो परिणाम होता. म्हणून शेवटी थंगलानला साम्राज्यशाहीच्या हातातला अमृताचा संपूर्ण प्याला आज ना उद्या हिसकावून घ्यावाच लागणार आहे! मुक्तीदायी सांस्कृतिक राजकारणाच्या दृष्टीने दक्षिण खूपच पुढे निघून गेला आहे. आपले सांस्कृतिक भांडवल शोधून त्याच्यावर दावा ठोकून त्याची पुनर्मांडणी करत दक्षिणेतून नवनव्या कलाकृती येत आहेत. खरे तर पेरियार दक्षिणेत रुजलाय म्हणून इतिहासाची पुनर्मांडणी त्यांच्या कलेतून भेदकपणे मुखर होते आहे. पण महाराष्ट्रात "गुलामगिरी" लिहून इतिहासाची पुनर्मांडणी करणारे महात्मा जोतीराव फुले अजुनही अस्पृश्यच राहीलेले आहेत. मग इतिहासाची पुनर्मांडणी कलेतून करणारे कलाकार कसे निपजतील? फुल्यांनी बळीराजाची, खंडोबाची गुलामगिरीत पुनर्मांडणी केलेली आहे. "खंडोबाचे एक गाणं आहे,
"सोन्याची जेजुरी गडाला नवलाख पायरी!"
ही सोन्याची जेजुरी आपल्याला पा.रंजिथ सारखे धाडस दाखवून शोधावी लागणार आहे!
- - सचिन माळी
- शाहीर, नवयान महाजलसा
- १० सप्टेंबर २०२४
0 टिप्पण्या